आकाशाएवढे योगदान

7

प्रतीक राजूरकर

मनुष्यप्राण्याहून लहान असलेल्या मुंगीचे मनुष्याच्या अगोदरपासूनचे अस्तित्व दखल घेण्याजोगे आहे. ४ ऑक्टोबर या जागतिक प्राणी दिनानिमित्त सृष्टीचक्रातील या महत्त्वाच्या घटकाचे योगदान जाणून घ्यायला हवे. प्राणी हा सृष्टीचक्रातील महत्त्वाचा घटक, विविध आकार, गुणधर्म लाभलेले प्राणी पर्यावरणातील समतोल साधत असतात, त्यांचा आकाराचा कुठलाच संबंध नसून आपल्या नैसर्गिक सामर्थ्यावर प्रत्येकाने सृष्टीचा भार उचलला आहे, तसे बघितल्यास प्राण्यांत सर्वश्रेष्ठ हा मनुष्यप्राणीच, पण मनुष्यप्राण्याहून लहान असलेल्या मुंगीचे मनुष्याच्या अगोदरपासूनचे अस्तित्व हे निश्चितपणे दखल घेण्याजोगे आहे. मनुष्यप्राण्याचा आणि मुंगीचा संबंध तसा साखरेचा डबा बरोबर बंद करून ठेवणे इतका मर्यादित आहे, इतर वेळी किडय़ामुंग्यांकडे मनुष्य दुर्लक्षच करत आलेला आहे.

पण मुंगीचे कार्य आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असून निसर्गाच्या अनेक श्रेष्ठ आविष्कारांपैकी एक आहे याच मुंगीचे गुणधर्म, कार्य, व्यवस्थापन इत्यादी अनेक गुणधर्मांवर नजर टाकल्यास सूक्ष्म आकारातील विशाल सामर्थ्याचे आकलन होते. वैज्ञानिकांच्या मते साधारणतः १२० दशलक्ष वर्षांपूर्वी मुंग्यांची पृथ्वीवर उक्रांती झाली, तेव्हा त्या आजच्याइतक्या प्रचलित नव्हत्या, त्यांच्या जीवाश्म ( इदेग्त्) नोंदीनुसार त्यानंतर ६० दशलक्ष वर्षांनी काही मुंग्यांच्या प्रजातींचा पर्यावरणात वैविध्यपूर्ण प्रभाव दिसू लागला, तेव्हापासून मुंगीचे पृथ्वीवर यशस्वी अस्तित्त्व आहे.

मुंग्यांच्या शारीरिक, सामाजिक, पर्यावरण व नैसर्गिक इतिहासाची विस्तृत माहिती बर्ट होलडोब्लर आणि एडवर्ड विल्सन या दोन कीटकशास्त्रज्ञांनी ‘द आँट्स’ या पुस्तकात लिहिली आहे शिवाय एडवर्ड विल्सनचा सहभाग असलेली ‘लिट्ल क्रियेचर्स हू रन द वर्ल्ड’ या डॉक्युमेंटरीत मुंग्यांच्या आयुष्याचे अचंबित करणारे रहस्य उलगडले आहे. जगात मुंग्यांच्या २० हजारांहून अधिक प्रजातींचे वास्तव्य आहे, त्यापैकी ११ हजारांच्या वर वर्गीकरण शास्त्रज्ञांनी (Taxonomist) केले आहे, त्यांचा आकार हा मिलीमीटरपासून दीड इंचापर्यंत आढळतो, उल्लेखनीय म्हणजे जगातील प्रत्येक मानवाच्या भाषेत मुंगीला शब्द आहे, जे अनेक कीटकांच्या बाबतीत दुर्मिळ असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

मुंग्या या मनुष्याप्रमाणेच सामाजिक प्राणी असल्याचे अभ्यासकांनी वर्णन केले आहे. मनुष्याप्रमाणेच आपल्या वसाहती वसवणे, इमारती बांधणे, वाहतुकीसाठी रस्ते, बोगदे बांधणे, बुरशीची शेती करणे, इतकेच नाही तर इतर मुंग्यांच्या समूहापासून स्वतःच्या समूहाच्या रक्षणार्थ सैन्यबांधणी करणे यात विशेष असे की, डोक्यावर अँटिना असलेल्या मुंग्यांचा समावेश असतो.

मुंग्या या कुशल रचनाकार पण आहेत. आपल्या सूक्ष्म शरीराचा समूहातील मुंग्या विविध प्रकारच्या तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी निवास उभे करण्यासाठी, अन्न गोळा करण्यास, थोडक्यात उदरनिर्वाहाकरिता जबाबदाऱ्या वाटून वापर करतात, इतकेच नाही तर त्यांच्यातील ऐक्याच्या सर्वश्रेष्ठ गुणामुळे मुंग्या स्वतःच्या शरीराचा नियोजनबद्ध वापर करून प्रतिकूल परिस्थितीत उपयोगात आणतात, स्थलांतर करताना अथवा तापमान नियंत्रणासाठी आपल्या शरीराला एकमेकांशी जोडून कठीण अडथळ्यांवर मात करतात, इतर कीटकांच्या तुलनेत मुंग्याचे याबाबतचे कौशल्य अधिक वरचढ आहे. पेंटागॉनसारखी संस्था आज मुंग्यांच्या संरक्षण प्रणालीचा अभ्यास करते आहे.

राणी मुंगीच्या नेतृत्वात लाखो मुंग्यांची वसाहत उभी राहते, त्यात मुंग्यांचे वय, लिंग या निकषांवर कार्याचे विकेंद्रीकरण केले जाते, त्यात बाळ संगोपन, सैन्य, विणकाम, वास्तुविशारद अभियंता इत्यादी जगण्याच्या गरजांनुसार नेमणुका केल्या जातात, मुंग्यांचे वारूळ हे प्राचीन काळापासून उत्कृष्ट असे वास्तुशिल्प आहे. त्यात राणी आणि तिचे अंडे, तापमान नियंत्रणाच्या दृष्टीने केलेली नैसर्गिक वातानुकूलित रचना, अन्न साठविण्याची जागा इत्यादी. आसपासच्या वसाहतींचे अनेकदा एकमेकांशी संघर्ष होत असतात, एका राणी मुंगीच्या एकापेक्षा अधिक वसाहतीसुद्धा असतात व त्यांचा आपसांत उत्तम असा सुसंवाद प्रस्थापित असतो. राणी मुंगीचे सुरक्षाकवच हा मुंगी समाजातील आपल्या राणीच्या प्रति निष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण आहे, विपरीत हवामान आणि परिस्थितीत राणीला मध्यभागी ठेवून समूहातील मुंग्या आपल्या शरीराचे गोल आकाराचे कुंपण करून राणी मुंगीचे रक्षण करतात, या सुरक्षा कवचाचा आकार हा पाच सेंटीमीटरहून अधिक असू शकतो.

बाल मुंग्यांचे संगोपन करणाऱ्या आणि वारूळाच्या आत कार्य करणाऱ्या मुंग्या या तरुण असतात, तर वारूळाच्या बाहेर रक्षणाचे धाडस व इतर कार्य करणाऱ्या मुंग्या या वयस्क असतात. मुंगीसमूहात मादी मुंगी ही सर्व प्रकारचे कार्य करते तर नर मुंगीचे कार्य प्रजननापुरते मर्यादित आहे. काही मुंग्यांच्या प्रजातींतील राणी मुंगीचे आयुष्य २०-३० वर्षे तर कामगार मुंगीचे वय १-३ वर्षे असू शकते, नर मुंगीचे आयुष्य हे काही आठवडे इतकेच असते. जी मुंगी अंडी घालून प्रजनन करू शकते तिलाच राणी मुंगीचा दर्जा प्राप्त होतो. वसाहतीतील इतर मुंग्या या राणी मुंगीची अपत्ये असतात अथवा इतर वसाहती जिंकून त्या वसाहतीतील मुंग्यांना गुलाम केले जाते. एका राणी मुंगीत दिवसाला हजारो तर काही दिवसांत ३ लाख अंडी घालण्याची क्षमता निसर्गाने बहाल केली आहे, त्यातूनच मुंगी वसाहतीची वाढ होते.

मुंगीचे व्यवस्थापन, संघटन, शेती, योग्य संगोपन इत्यादी. याव्यतिरिक्त ज्या झाडावर मुंग्या आपले घर करतात त्या झाडाला इतर जीवाणूंच्या हल्ल्यापासून संरक्षण देऊन मुंगी निसर्गाची परतफेड करते, त्या बाबतीत मनुष्य कुठेतरी त्याच्या क्षमतेपेक्षा निसर्गाच्या योगदानात कमी पडतो हा एक गुण सोडला तर मनुष्य आणि मुंगीत नक्कीच साम्य आहे त्याबाबत ऑगस्टे फोरेल या जीवशास्त्रज्ञाने केलेले विधान अत्यंत मार्मिक असून मुंगी आणि मनुष्यातील समान सामाजिक राहणीमानाची पुष्टी देणारे आहे, तो म्हणतो, ‘‘मुंग्यांचा सर्वात मोठा शत्रू हा मुंगीच आहे, अगदी तसेच जसा मनुष्याचा शत्रू मनुष्य आहे. सूक्ष्म मुंगीचे निसर्गातील आकाशाएवढे योगदान म्हणून कदाचित संत मुक्ताबाईंनी ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्यासी’ असे आपल्या अभंगात वर्णन केले असावे.

संदर्भ – मुंगी एक अद्भुत विश्व
लेखक – प्रदीपकुमार माने,पद्मगंधा प्रकाशन