मुळ्येकाका

>>शिरीष कणेकर

रंगकर्मी (म्हणजे नाट्य व्यवस्थापक, नाट्य ‘प्रमोटर’ व नाट्य निंदक) अशोक मुळ्ये यांना सतत प्रसिद्धीच्या धबधब्याखाली बसायला आवडतं. (आणि आम्हाला नाही आवडत?) पण प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ होत असताना ते अतिशय मानवतावादी कार्य पोटतिडिकीने व सहजगत्या करून जातात हे कसं विसरून चालेल? मी पदरचे दहा पैसे कोणाला उचलून दिल्याचं स्मरत नाही. कोणाला स्मरत असेल तर मला सांगावं. मी जाऊन परत घेऊन येईन. दहा पैसे म्हणजे काय लहानसहान रक्कम झाली? मुळ्यांकडे गोरगरीबांना व गरजवंतांना वाटण्याएवढे पैसे नाहीत, पण त्यामुळे त्यांचे काहीही अडलेलं नाही. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यासाठी खिसा मोकळा करणारी अनेक माणसं आहेत. मी त्यातला नाही. अहो, माझंच भागवता भागवता माझ्या नाकीनऊ येतात. मी कोणासाठी काय करणार?

देवानं मला एक गोष्ट मागायला सांगितली तर मी म्हणेन, देवा रे, तेवढं मुळयेंचं तोंड राखेच्या तोबऱयानं बंद कर. खंडोबल्लाळासारखं! नुसतं चिकटपट्टीनं बंद करून काही होणार नाही. त्यांची टकळी अखंड चालू असते. मुळये अविरत, अखंड बोलतात. त्यात विरामचिन्हे टाकायलाही तुम्हाला वाव नसतो. राघोबादादा, रामशास्त्री प्रभुणे व पडद्यामागील गलबला हे सर्व आवाज एकटयानं काढणाऱया पु.लं.च्या कुशाभाऊंचा मुळये हे आधुनिक बाप म्हणावे लागतील. झोपेतही ते सतत बोलत असतील का? कोणाला तरी झापत असतील का? त्यांच्या जिभेच्या पट्टयावर वीजनिर्मिती केली तर अख्ख्या शहराला प्रकाश मिळेल.

देवानं त्यांना तोंड दिलंय तसे तुम्हाला कान दिलेत ही दैवी व्यवस्था समजून घ्या. त्यांनी बोलायचं आणि तुम्ही निमूटपणे ऐकून घ्यायचं. कधी कधी वाटतं की आपल्याला बेफाम बेलगाम बोलता यावं व त्यासाठी बंदिस्त असहाय श्रोते मिळावेत केवळ एवढयासाठी ते शिवाजी मंदिरात काय काय कार्यक्रम आयोजित करतात. त्यांचा कालचा मित्र आजचा शत्रू असू शकतो; नव्हे असतोच. त्यांनी ज्येष्ठ रंगकर्मींचा मेळावा घडवला. जेवणबिवण दिलं. मी ज्येष्ठही नव्हतो व रुढार्थानं रंगकर्मीही नव्हतो, पण मित्र म्हणून गेलो होतो. (रातोरात त्यांनी मला शत्रू ठरविलं नसावं अशी मी प्रार्थना करीत होतो.)

‘‘मुळये, मोहन वाघ दिसत नाहीत?’’ मी सहज विचारलं.
‘‘मोहन वाघ?’’ मुळये महाराणा प्रतापच्या अवखळ वारूसारखे खिंकाळले, ‘‘मी कसा बोलवीन त्याला?…’’
काही कळलं? मला नाही कळलं. ते विचारावं तर मुळये बोलायचे थांबतील तेव्हा ना? म्हणजे नाहीच.
मध्यंतरी त्यांच्या डोक्यात आलं की माझ्या पंचाहत्तरीनिमित्त माझा मुळये शैलीत सत्कार करायचा. त्यांचे नेहमीचे यशस्वी कलाकार प्रेक्षकात बसणार. रंगमंचावरून मुळये एकटेच बोलणार. ‘‘चांगलं-चुंगलं, नाजुक-साजुक सगळेच बोलतात’’ मुळये गरजले. पुढील धोका मला स्पष्ट दिसत होता, ‘‘मी वाईट-वाईट बोलणार. तुमचे मी वाभाडे काढणार.’’
त्यांना एक कळत नव्हतं किंवा कळून घ्यायची इच्छाच नव्हती की माझ्या सत्कार सोहळयात माझी नालस्ती, माझं वस्त्र्ाहरण, माझा उपमर्द करणारा एकमेव वक्ता मला कसा चालेल? मी त्यांना उत्तर देत बसलो व त्यांच्या कमरेचं वस्त्र फेडलं तर या कुस्तीला, जुगलबंदीला, सामन्याला सत्कार सोहळा कसं म्हणायचं? मुळयांच्या नजरेला हे काही दिसत नाही. कारण आपलं बोलणं हे भृगू ऋषीच्या लाथेसमान समोरच्याचा उद्धार करणारं असतं असं त्यांना मनापासून वाटत असावं.

पण या पलीकडेही अशोक मुळये आहेत. त्यांची जीभ तलवारीसारखी असेल, त्यांचं काळीज सोन्याचं आहे. ते दिसायला व कळायला थोडा वेळ लागतो इतकंच. त्यांनी ‘माझा पुरस्कार’ नावानं पुरस्कार द्यायला सुरुवात केली. तेव्हा या एकखांबी तंबूला लोक हसले. त्यांच्यात मीही होतो. एक माणूस स्वतःचा असा ‘माझा’ नावाचा पुरस्कार देतो याला काय अर्थ आहे? एकदोन वर्षात हा आचरट प्रकार आटोपेल, पण वर्षागणिक ‘माझा’ पुरस्काराचं वलय, लोकाश्रय व कलाकारांचा सहभाग वाढत गेला. वृत्तपत्रांतून सणसणीत बातम्या आल्या. मुळयेकाका एका अनोख्या प्रथेचे संस्थापक व प्रचारक झाले. मग त्यांनी अन्य उपक्रम सुरू केले. त्यात ‘असं एक साहित्य संमेलन’ होतं. त्यांनी मतिमंद मुलांच्या आयांचं संमेलन भरवलं. त्यांच्या नवोदितांच्या साहित्य संमेलनात कर्करोगग्रस्त सृष्टी कुलकर्णीला सन्मानानं व मायेनं पाचारण केलं. बापडी हरखून गेली. मोनिका मोरेनं रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावले. ‘व्हॅलेंटाइन डे’ला भरत जाधवला हॉस्पिटलात आणून मुळयेंनी तिची इच्छा पूर्ण केली अन् वर मोनिकाला सांगितले, – ‘‘काळजी करायची नाही. यापुढे मी तुझे दोन्ही हात असेन.’’ तेजश्री वैद्य रेल्वे अपघातात जबर जखमी झाली. मुळ्यांनी यथाशक्ती तिला आर्थिक मदत केली व इतर कनवाळू दानशूरांना मदतीसाठी पुढे येण्यासाठी प्रेरित केले. सौ. अनिता दामलेंनी तर रोख दोन लाख रुपये काढून दिले.

मुळयेंना कल्पना असेल नसेल की ते सहजगत्या मोठं पुण्याचं काम करतायत. जिभेनं केलेलं पाप पूर्णपणे निस्तरतायत.
माझ्या मनात आलं की गरजूंना लाखो रुपयांची मदत मिळवून देणारा हा श्वेतवस्त्रधारी सडाफटिंग चाळीच्या व्हरांडयात लाकडी पेटीवर झोपतो आणि कोणाचीही मदत न करणारा मी ए.सी.मध्ये गुबगुबीत गादीवर झोपतो, हा देवाचा न्याय आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या