खगोल शिक्षिका

[email protected]

युरोप, अमेरिकेत औद्योगिक क्रांतीनंतर महिला कामासाठी घराबाहेर पडू लागल्या. पारंपरिक, पठडीतलं जीवन मागे पडून त्यांचं स्वत्त्व त्यांना गवसायला लागलं. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधन आणि त्याचा विस्तार होण्याच्या काळात अनेक महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. राजकीय पटलावर एक राणीपद वगळता युरोपातही महिलांना मतदानाच्या हक्कासाठी चळवळ करावी लागली आणि मार्गारेट थॅचर ‘प्रगत’ इंग्लंडच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री व्हायला विसाव्या शतकाचं सातवं दशक उजाडलं. थोडक्यात जगभरच्या महिलांसाठी विसावं शतक हे आत्मभान जागृत होण्याचं, संघर्षाचं आणि त्यातून प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचं होतं.

अशा काळात खगोलशास्त्रासारख्या तुलनेने सर्वपरिचित नसलेल्या विषयामध्ये महिलांचा सहभाग असणं ही एक अपवादाची गोष्ट होती. परंतु त्याही परिस्थितीवर मात करून आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव सिद्ध करणाऱ्या महिला होत्याच. धूमकेतूंचा धांडोळा घेणाऱ्या मारिया मिशेल यांची शिष्या मेरी वॉटसन व्हिटनी हिचं नाव खगोल अभ्यासाच्या बाबतीत महत्त्वाचं ठरतं.

मेरीचा जन्म १८४० मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेटस् राज्यात झाला. तिचं घर सुखवस्तू होतं. त्या काळाच्या मानाने श्रीमंत होतं. त्यामुळे घरात शिक्षणाची परंपरा होतीच, पण मुलींनाही शिक्षणात समान संधी देण्याची उदारताही होती. मेरीने भरपूर शिकावं असं तिच्या आईवडिलांना वाटत होतं. मेरीने भौतिकशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडला. १८६३ मध्ये तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि दोनच वर्षांत तिची मारिया मिशेलशी गाठ पडली. या भेटीमुळे खगोलीय अभ्यासासाठी तिला योग्य गुरू आणि गुरूला चिकाटीने काम करणारी शिष्या मिळाली. या दोघी गुरू-शिष्यांचा वेसार वेधशाळेतला एकत्र काम करतानाचा फोटो प्रसिद्ध आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट लक्षात घेता त्याचं महत्त्व लक्षात येईल.

१८७० मध्ये मेरी व्हिटनी यांनी ‘क्लासिकल मेकॅनिक्स’चा अभ्यास करण्यासाठी काही काळ झुरिक विद्यापीठात प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुन्हा वेसार वेधशाळेत परतल्या. तिथे त्यांनी खगोलभौतिकाच्या विद्यार्थ्यांना द्वैती तारे (बायनरी स्टार्स), रूपविकारी तारे (व्हेरिएबल स्टार्स) तसंच पृथ्वीभोवतीच्या अवकाशात इतस्ततः फिरणारे अशनी (ऍस्टेरॉइडस्) आणि धूमकेतू (कॉमेटस्) या अवकाशातील विविध वस्तूंची ओळख करून दिली.

आजच्या काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे अंतराळातही प्रभावी दुर्बिणी भिरभिरत आहेत आणि कित्येक उपग्रह आणि अंतराळ मोहिमांमधून विश्वातील अनेक रहस्य उलगडण्याला वेगाने चालना मिळत आहे. मात्र एकोणिसाव्या शतकात ‘अंतराळ’ किंवा ‘स्पेस’चा प्रत्यक्षानुभव माणसाच्या गाठी नव्हता. केवळ निरीक्षणे आणि गणिती प्रमेयांवर आधारित आडाख्यातून काही गोष्टी स्पष्ट होत होत्या. आपल्या सूर्यासारखे अब्जावधी तारे विश्वात आहेत आणि त्यापैकी काही द्वैती किंवा जोडतारे (वायनरी) आहेत हे निरीक्षणातून नोंदवणं जिकिरीचं काम होतं. अनेक अभ्यासकांची सातत्याने रात्र-रात्र निरीक्षणं करून ही नोंद (डेटा) पुढच्या पिढीतील अभ्यासकांसाठी करून ठेवली. त्यामध्ये मेरी व्हिटनी या वेसार वेधशाळेच्या प्रमुखपदी आलेल्या संशोधिकेचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. गुरू मारिया मिशेल यांच्या पश्चात हे पद मेरी यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळलं.

प्रकृतिअस्वास्थ्यामुळे १९१५ मध्ये वेधशाळेच्या प्रमुखपदावरून निवृत्त होईपर्यंत मेरी यांनी वेधशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शंभराहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. अवकाशातील वस्तूंचे फोटो घेतलेल्या फोटोग्राफिक प्लेटचं मापन कसं करावं याचे धडे दिले. त्यांच्या या कार्यामुळे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेची फेलोशिप त्यांना मिळाली. ऍस्ट्रॉनॉमिकल ऍण्ड ऍस्ट्रोफिजिकल सोसायटीच्या त्या ‘चार्टर’ सभासद झाल्या.

या सर्व कार्यकर्तृत्वाबरोबरच महिलांनी विज्ञानाच्या क्षेत्रात सहभागी झालं पाहिजे असं नुसतं सांगून त्या थांबल्या नाहीत तर या क्षेत्रातील संधी महिलांना कशी मिळेल यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केलं. उत्तम व्यक्ती होण्यासाठीही विज्ञानाचा अभ्यास उपयुक्त ठरतो हे त्यांनी सांगितलं. परिणामी पुढच्या काळात जगभरात अनेक महिला खगोल भौतिकीच्या क्षेत्रात आल्या. मेरी व्हिटनीचं कार्य त्यासाठीच उल्लेखनीय ठरतं.