लेख – जीवनाला व्यापणारे खगोलशास्त्र

>> सुजाता बाबर

विज्ञान हा खरं तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शरीराच्या कणाकणांत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र ठासून भरले आहे. जीवनाला एक ताल आहे, लय आहे. ती अनेक गोष्टींनी येते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खगोलशास्त्र. दिवस, रात्र, महिना, वर्ष, सूर्योदय, सूर्यास्त, पौर्णिमा, अमावस्या, चंद्राच्या विविध कला या सर्वांनी रोजच्या दिवसाला नियमितता आणि ताल येतो. अगदी बालवयातली चिमुकली मुले असू देत नाहीतर काठी टेकत चालणारे आजीआजोबा, सर्वांना आवडणारे, कुतूहल असणारे, जिज्ञासा वाढवणारे एक शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. माणसाची निसर्गाची ओळख होतानाच आकाशतारेसूर्यचंद्र याबद्दल आकर्षण वाटू लागते.  

हजारो वर्षांपासून पृथ्वी, तिची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती, ग्रहणे, उल्का वर्षाव याविषयी लोकांना विशेष आकर्षण असते. खगोलशास्त्राला ‘सर्व शास्त्रांची जननी’ असेही संबोधले जाते. या शास्त्रामध्ये विश्वाइतकीच अफाट शक्ती आहे. यात भविष्यातील अनेक संशोधनांची आणि जीवनाला मदत करणाऱ्या नवीन गोष्टींची शक्यता आहे. सध्या या विज्ञानाविषयी विशेष जागरुकता निर्माण झाली आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची क्षमताही या शास्त्रामध्ये आहे. सध्या चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात तर खगोलशास्त्रामध्ये अनेक प्रयोग होऊ शकतात. अंतराळवीर व्हावे हे अनेक मुलांचे स्वप्न असते. तरीही आजवर साधारण केवळ पाचशे जणांना अंतराळामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. यामुळे हे विज्ञान लहानपणापासून शिक्षणात असावे असा आग्रह करणे चुकीचे ठरणार नाही.

सध्याची पुस्तके जर पाहिली तर काहीच बोर्डांनी ठरविलेल्या पुस्तकांमध्ये खगोलशास्त्राविषयी काही पाठ आहेत, परंतु ते अगदी जुजबी माहिती देतात. अर्थातच यामुळे मुलांची अजून शिकण्याची इच्छा वाढवली जाते, परंतु त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात तरी संधी नाही. खगोलशास्त्र हे भूगोलाच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले असते. खरे म्हणजे भूगोल हा खगोलाचा एक भाग आहे. असे असले तरी भूगोलाचे शिक्षक हा विषय शिकविण्यासाठी प्रशिक्षित नसतात. या विषयाची व्याप्ती आणि भविष्यातील संशोधनाच्या आणि करीअरच्या शक्यता पाहता या विषयाकडे एक स्वतंत्र शाखा म्हणून पाहिले गेले पाहिजे. शालेय स्तरावर किमान एक पर्यायी विषय म्हणून तरी असावा. म्हणजे ज्यांना या विषयात पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांना प्राथमिक ओळख तरी होईल. अभ्यासक्रमात सध्या जो भाग आहे त्यात सातत्याने बदल होत असतात. हे बदल लगेच सुधारित स्वरूपात पुस्तकात मांडणे आवश्यक असते, जे सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये अवघड आहे. त्यामुळे या विषयाची मुलांची जिज्ञासा पूर्ण करण्याची क्षमता त्यात नाही.

मात्र अनेक खासगी संस्था हे कार्य स्वयंसेवी स्वरूपात करत आहेत. संपूर्ण भारतात अशा अनेक संस्था आहेत. खगोल मंडळ हे गेली 37 वर्षे महाराष्ट्रात अधिक कार्यरत असल्याने ते काही शहरांमध्ये खगोलशास्त्राची व्याख्याने, कार्यशाळा, आकाशदर्शनाचे कार्यक्रम नियमित आणि सातत्याने घेत आले आहे, परंतु असे कार्य करणाऱ्या बऱ्याचशा संस्था शहरी भागांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, याविषयी प्राथमिक ज्ञान मिळते. मूलभूत तयारी होऊ शकते, परंतु ग्रामीण भागात एकूण शिक्षणाची अवस्था पाहता तेथील मुलांना खगोलशास्त्र हा दूरदूरचा पर्यायदेखील राहत नाही. अर्थातच काही सरकारी संस्था बाल वैज्ञानिक तयार व्हावेत यासाठी ग्रामीण भागात कार्यरत आहेत, परंतु त्यांची पोहोच पुरेशी नाही. खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी, जागरुकतेसाठी कितीही तज्ञ संस्था कार्यरत असल्या तरी संस्थांच्या कार्याला विशिष्ट मर्यादा असतात. आपल्याकडची शालेय व्यवस्था पाहता खगोलशास्त्र अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतील.

मानवी बुद्धीची चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता संशोधनासाठी असलेली मूलभूत वृत्ती आहे. याच वृत्तीने दिवस-रात्र, पृथ्वीचे परिभ्रमण, परिवलन, परांचन अशा अनेक गतींची गणिते शोधली. कालगणनेपासून ते दिशादर्शक तारा मंडळ अवकाशाचा अभ्यास केला. अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी खगोलाविषयी भाकिते मांडली. आज आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याचे प्रत्यय येत आहेत. या विषयाच्या अज्ञानामुळे पूर्वी अनेक गैरसमज निर्माण झाले होते. ग्रहणात घरातच बसावे, त्या काळातील पाणी वापरू नये, गरोदर स्त्रीने ग्रहण पाहू नये, धूमकेतू येणे म्हणजे संकट अशा अनेक गैरसमजुती निर्माण झाल्या. याची शास्त्रीय उत्तरे आज आपल्याकडे आहेत. खगोलशास्त्राचे लहानपणापासून शिक्षण असेल तर ही चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण होऊ शकेल.

राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रम 2020देखील या शास्त्राच्या अभ्यासक्रमातील समावेशाचे समर्थन करते. सध्याच्या पुस्तकांमध्ये सूर्यमालेविषयी जुजबी माहिती देणारा पाठ आहे. तारकासमूहांची अगदीच प्राथमिक माहिती आहे. ती या शास्त्राची व्याप्ती समजण्यासाठी पुरेशी नाही.

खगोलशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनाशी जवळचा संबंध आहे. तो मुलांना समजला पाहिजे. हा विषय जर शालेय अभ्यासक्रमात आला तर मुलांना निश्चितच तो अधिक समजेल. या विषयात प्रत्यक्ष करून पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अवकाशासारखी मोफत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. ती पाहताना तिचे निरीक्षण करणे, तारकासमूह, त्यांची रचना, त्यांचे बारकावे, ताऱ्यांचे जीवनक्रम समजून घेणे मुलांना शिकण्याचे नवीन आयाम उलगडून देते. आमच्या अनुभवात मुलांना या विषयाची एकदा ओळख झाली की, अनेक फायदे जाणवतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याचा अभ्यास केल्याने जीवनाविषयी नवीन जाणीव होते. संपूर्ण विश्वामध्ये आपले नगण्य स्थान असूनही माणसाला त्याचा किती अहंकार आहे हे समजते. विश्वाची व्यापकता समजल्यास अहंभाव गळून पडतो.

खगोलशास्त्र आणि ऋतू, सण, उत्सव यांचा संबंध लक्षात येतो. परंपरा केवळ प्रथा नसून त्यामागे असलेली वैज्ञानिक कारणे लक्षात येतात. आपली वैविध्यपूर्ण संस्कृती समजायला मदत होते. शिवाय या विज्ञानामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतील असले तरी या विज्ञानामध्ये त्याला वाव आहे हे मुलांना समजणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात एखादा विषय आला की, तो सर्वच मुलांसाठी उपलब्ध होतो. त्यामुळे संधींच्या शक्यता सर्वांसाठी खुल्या होतात. म्हणून तो अभ्यासक्रमात येणे महत्त्वाचे आहे. अन्यथा शहरी मुलांना खासगी संस्थांमधून संधी मिळत राहतील आणि इतर मुले या विषयापासून वंचित राहतील. आपणही अनेक संशोधकांना हरवून बसू.