‘बाहुबली’च्या यशाचा मतितार्थ

  • समीर गायकवाड

बाहुबलीच्या दोन्ही भागांना हिंदुस्थानीय चित्रपट रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बाहुबलीच्या यशाने रसिकांचं चित्रपटप्रेम तर अधोरेखित झालं आहेच पण याबरोबरच चित्रपटविषयक मापदंडांचा तौलनिक अभ्यासही झाला आहे. या अभ्यासात उलगडलेल्या रंजक तथ्यांचा वेध घेणारा हा लेख.

बाहुबली द बिगिनिंग व बाहुबली – द कन्क्लुजन या चित्रपटांनी हिंदुस्थानीय जनतेला चर्चेला एक नवा विषय दिला आणि चित्रपटविषयक तमाम परिमाणे मोडीत काढली. याआधीही अनेक चित्रपटांनी तुफान गल्ला गोळा केला होता. आमीरच्या ‘पीके’ने पाचशे कोटींचा पल्ला जेमतेम गाठला होता. पण ‘बाहुबली’ने त्याला मात देत हजार कोटींचा टप्पा लीलया पार केला. २७ एप्रिलला रिलीज झालेल्या ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ या दुसऱ्या भागाची घोडदौड दोन हजार कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल असे अंदाज वर्तवला जात आहे. हिंदुस्थानीय चित्रपट रसिकांनी ‘बाहुबली’च्या दोन्हीही भागांना इतके का उचलून धरले असावे याचा अभ्यास करता काही रंजक तथ्ये समोर आली त्याचा हा आढावा.

bahubali-1

देश स्वतंत्र होण्याआधी ‘मायथॉलॉजिकल’ चित्रपटच जास्त संख्येने निर्मिले गेले. त्यानंतर मेलोड्रामा आणि रोमान्स यांनी भारलेले चित्रपट, आर्ट फिल्म्स, ऐतिहासिक, सायन्स फिक्शन, थ्रिलर,हॉरर आणि अगदी मागच्या दशकात हॉलीवूडपासून प्रेरित होऊन अतिशक्तिमान (सुपरपॉवर) अशा व्यक्तिरेखाचा मागोवा घेणारे फॅन्टसीवर आधारित चित्रपट असा एकंदर प्रवास झाला.

फॅन्टसीवर आधारित चित्रपट बनवताना त्याचे बजेट हाच सर्वात मोठा अडथळा ठरत होता आणि त्यांची स्पर्धा किंवा तुलना हॉलीवूड मूव्हीजशी केली जात होती. हॉलीवूड डिजिटलाईज्ड होऊन सायफाय मूव्हीजच्या लाटेवर तरंगत होते आणि आपण त्यांच्या तुलनेत कुठेच नव्हतो. स्टीव्हन स्पीलबर्गचे चित्रपट नवा इतिहास रचत होते आणि हिंदी सिनेमा केवळ मूकदर्शक होऊन पाहत होता. ‘टायटॅनिक’ किंवा ‘ज्युरासिक पार्क’ची संपूर्ण शृंखला असो, हिंदुस्थानीय उपखंडात त्याने अफाट गल्ला गोळा केला आणि बॉलीवूडच्या पोटात गोळा आला. यासोबत ‘एलियन’च्या सीरिजपासून ते ‘प्रोमिथिअस’पर्यंतचा हॉलीवूडचा साय फाय प्रवास असो किंवा ‘इंटरस्टेलर’, ‘ग्रॅव्हिटी’पासून ते आताच्या ‘गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी’चे डिजिटलाईज्ड स्वरूप असो, ज्याचा आत्मा व्हीएफएक्समध्ये दडला होता. अशा चित्रपटांना कसे तोंड द्यायचे याचे बॉलीवूडकडे उत्तर नव्हते. पण याच काळात छोटय़ा पडद्यावर एक ठळक घटना घडली होती त्याची नोंद काही चाणाक्ष चित्रपट निर्मात्यांनी घेतली होती. ही घटना म्हणजे ‘छोटा भीम’ची अफाट लोकप्रियता.

२००८ मध्ये पोगो या कार्टून्सला समर्पित असलेल्या वाहिनीवर ‘छोटा भीम’हे कार्टून सिक्वेल दिवसभर दाखवले जाऊ लागले. त्याने सर्व इंग्रजी, जपानी, चिनी व अमेरिकन कार्टून्सना धोबीपछाड दिली. डोरेमॉनपासून पोराटोरांनी फारकत घेतली आणि आपला देशी सुपरस्टार जो आपल्या पुराणकथातून, आपल्या महाकाव्यातून आपल्या परिचयाचा झाला होता त्याला आबालवृद्धांनी डोक्यावर घेतले होते, तसे पाहिले तर ही अत्यंत छोटीच बाब होती जी फक्त बालविश्वाशी निगडीत होती. एस.एस.राजामौली यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या माणसांनी यातील मतितार्थ अचूक हेरला. याआधी २००५ मध्ये राजामौली यांनी प्रभासला घेऊन ‘छत्रपती’ हा ऍक्शनपट निर्मिला होता. विशेष बाब म्हणजे, यातील नायकाचे नाव शिवाजी होते.

राजामौलींवर इतिहासाचा प्रभाव कसा आणि किती होता याचे हे बोलके उदाहरण होय. याच विचारधारेतून २००९ मध्ये त्यांचा ‘मगधिरा’ हा चित्रपट आला. यात त्यांनी इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली होती. तर २०१२ मध्ये डिजिटल तंत्र व व्हीएफएक्सचा वापर केला गेलेला त्यांचा ‘इगा’ (हिंदी आवृत्ती – मख्खी) आला होता. या दोन्ही चित्रपटांनी त्यांना प्रचंड यश दिले, यापुढे जाऊन त्यांनी‘मगधिरा’प्रमाणे पौराणिक स्टोरीबेस आणि ‘इगा’सारखे डिजिटल तंत्रज्ञान यांचा संगम असलेला उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये असलेला ‘बाहुबली’ पडद्यावर आणला व हॉलीवूडसह जगभरात त्याची दखल घेतली गेली.

या आधी असे ‘अकस्मात’ यश १९७५च्या ‘जय संतोषी मां’ला मिळाले होते. या यशाची समीक्षा करताना चित्रपटक्षेत्रातील जाणकारांनी ‘मायथॉलॉजिकल’ क्लासचा मोठा गॅप आणि त्या काळातील राजकीय, सामाजिक अस्थिरतेमुळे लोकांना भासलेली धार्मिक, पौराणिक आधाराची गरज याकडे लक्ष वेधले होते. आता ‘बाहुबली’चे विश्लेषण करताना हेच मुद्दे पुन्हा समोर येताना दिसतात. या दशकात जगभरात एक अस्थिरता आहे. दहशतवादापासून ते राजकीय, सामाजिक उलथापालथी होताना दिसत आहेत. भौतिक सुखांच्या बदलत चाललेल्या व्याख्या आणि कृत्रिमतेकडे झेपावत चाललेली जीवनदशा यांचा एकत्रित परिणाम असा होऊ लागला की, जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होताना दिसू लागली. लोकांना आपला गौरवशाली इतिहास आणि चेतनादायी धार्मिक संदर्भाची प्रचंड ओढ निर्माण होताना दिसू लागली. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होण्याच्या कालावधीतच ‘बाहुबली’चं प्रदर्शित होणं त्याच्या यशाच्या पथ्यावर पडलं.

‘बाहुबली’च्या कथेचे पौराणिक संदर्भ, त्याची आधुनिक पद्धतीने केलेली मांडणी, निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस्, निर्मितीमूल्यांवर मुक्तहस्ते केला गेलेला खर्च आणि त्याला दिलेले भव्य, उत्तुंग व विकट स्वरूप हे त्याचे ‘स्ट्राँगपॉइंट’ ठरले. भविष्यात ‘बाहुबली’ची गणना ‘मायथॉलॉजिकल फॅन्टसी’च्या वर्गात केली जाईल. मूळ कथानक बदामीच्या चालुक्य घराण्यातील (वेमुलवादिक) कुटुंबाच्या संघर्षावर बेतलेली आहे. ज्या महिष्मती साम्राज्याचा उल्लेख चित्रपटात आहे त्या नावाचे साम्राज्य आताच्या मध्य हिंदुस्थानातील प्रदेशात अस्तित्वात होते. बौद्ध इतिहास साधनात माहिष्मती हे दक्षिण अवंती जनपदाचे मुख्य शहर होते. त्यातील ऐतिहासिक स्थल व कालसापेक्ष संदर्भ राजामौलींनी ‘बाहुबली’त अचूक वापरले आहेत. त्याचबरोबर ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात जशी धार्मिक प्रतिके होती तशीच ती दुसऱ्या भागातही आहेत. या खेपेस नायकाची कृष्णभक्ती दाखवून राजामौलींनी संतुलन साधले आहे. कारण पहिल्या भागात ‘शिवा’ची साधना दाखवली होती. विजयनगरचा संगीतस्तंभ वा कुंभकोणम मंदिराची प्रतिकृती असो वा कंबोडीयातील मंदिराची, प्रतिकृती राजामौलींनी अभ्यासपूर्वक वापर केला आहे.

राजाचा राजधर्म कसा असावा, राजाची दंडनीती, सैन्यनीती व युद्धनीती कशी असावी यावरही भाष्य आहे. क्लायमॅक्सच्या सीनमधला रुद्रावतार विलक्षण आकर्षक आहे. शिवलिंगास रक्ताभिषेक, भस्मलेपन, शिवतांडव स्तोत्र आणि अखेरचा खणखणाट हे सगळं अप्रतिम झालंय. हे सर्व बघताना प्रेक्षकाला एकाच वेळी पौराणिक संदर्भ जाणवत असल्याने कथानक खरे वाटू लागते, त्यातील धार्मिकता परिचयाची आणि आस्थेची असल्याने चित्रपट ‘आपला’ वाटू लागतो अन् अखेरीस नायकाचे सर्वशक्तिमान सिद्ध होणं मनाला कुठेतरी आधारदायी भासतं. या सर्व बाबींना एकत्रित स्वरूपात बघण्यास हिंदुस्थानीय प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून मुकला होता त्यामुळे ‘बाहुबली’ प्रदर्शित होताच त्यावर प्रेक्षकांच्या उडय़ा पडल्या. राजामौली येणाऱ्या काळात महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवतील असं बोललं जातंय, पण अधिकृत घोषणा काहीच झालेली नाही. बाहुबलीच्या यशाचा आणखी एक मापदंड लावताना एतद्देशीय विदेशी चित्रपटांच्या तोडीस तोड चित्रपट बनवून त्यांच्या स्पर्धेत आपणही उभं राहू शकतो ही अस्मिता जागृत होणं हा मुद्दाही सामील आहे. हॉलीवूडला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायचे आणि आपल्या रसिकांना आपल्याच पारंपरिक कथामूल्यांशी कसे बांधून ठेवायचे याचे अचूक उत्तर ‘बाहुबली’ने दिले आहे असे म्हणायला हरकत नाही. किंबहुना हाच याच्या यशाचा मतितार्थ आहे…

[email protected]