लेख : स्वामिनिष्ठ आणि महापराक्रमी

3

>>प्रज्ञा कुलकर्णी<<

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः।

कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः।।

अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत. हनुमान हा चिरंजीव असून त्याचे वास्तव्य आजही या पृथ्वीतलावर आहे. म्हणूनच जेथे जेथे रामकथा, रामाचे भजन, कीर्तन, रामनाम चालले असेल तिथे तिथे हनुमंत सूक्ष्म रूपाने आपल्या आराध्य दैवताचे, प्रभू रामचंद्रांचे गोडवे ऐकण्यासाठी हजर असतो. हनुमंताला अनेक शक्तींपासून वरदान लाभले आहे. इंद्रापासून शक्ती, सूर्यापासून तेज, अग्नीपासून संरक्षण,  अस्त्र्ा-शस्त्र्ाांपासून निर्भयता प्राप्त झाली. यम, वरुण, वायू अशा देवांकडूनही हनुमंताला दैवी शक्ती आणि सामर्थ्याचे वरदान लाभले आहे. या सर्वांमुळेच हनुमंताला बलभीम बजरंगबली, महारुद्र, महाबली अशी नावे आहेत. हनुमंत इतका शक्तिशाली असूनदेखील तो तितकाच प्रामाणिक, नम्र, विनयशील आणि श्रीरामाशी एकनिष्ठ आहे. आपल्या शक्तीचा, सामर्थ्याचा त्याला अजिबात गर्व नाही की अहंकार नाही. म्हणूनच अशा गुणी हनुमंताला प्रत्यक्ष श्रीरामानेच ‘पुरुषोत्तम’ ही पदवी बहाल केली आहे.

‘‘यो हि मृत्यो नियुक्त ः सत् भर्या कर्माणि दुष्करे।

कुर्यात तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तम्’’।।

संपूर्ण रामायणात हनुमंताने श्रीरामाला अनेक घटना, प्रसंगात अनेक प्रकारे मदत केली आहे. सीता शोध, अशोकवनातून सीतामाईची सुटका, सेतूबंधन, राम-रावण युद्ध, युद्धात लक्ष्मण जेव्हा मूर्च्छित होऊन पडतो तेव्हा हनुमंत वायुवेगाने जाऊन द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी ही औषधी वनस्पती घेऊन येतो आणि लक्ष्मणाला जीवदान मिळते. या साऱ्या घटनांमध्ये हनुमंताची स्वामिनिष्ठा आणि पराक्रम दिसून येतो. हनुमंताने अनेक बलाढय़ राक्षसांचा संहार केला. अहिरावण-महिरावण यांच्या बंदिवासातून रामलक्ष्मणाची सुटका केली. हनुमंताचा हा सर्व पराक्रम आणि त्याची स्वामिनिष्ठा पाहूनच श्रीरामाने प्रसन्न होऊन त्याला ‘पुरुषोत्तम’ म्हटले आहे आणि त्याचा गौरव केला आहे.

प्रभू श्रीरामाला भेटण्यापूर्वी हनुमंत एक साधा वानर होता. अंगिरस ऋषींनी दिलेल्या शापामुळे त्याने आपले सामर्थ्य, शक्ती गमावले होते. हनुमंत लहान असताना अंगिरस ऋषींच्या आश्रमात तो वेदाभ्यास करण्यासाठी राहिला होता. हनुमंत खूप हूड आणि खोडकर होता. तो आश्रमातील ऋषींची आणि आपल्याबरोबर वेदाभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या सतत खोडय़ा काढत असे. ऋषींना त्रास देत असे. एकदा एक ऋषी ध्यानधारणा शिकवीत असताना हनुमंताने त्यांची खोड काढली. ते पाहून अंगिरस ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी हनुमंताला तू तुझी दैवी शक्ती, मुझे सामर्थ्य गमावशील, तुला त्याचा विसर पडेल असा शाप दिला. हनुमंताने आणि त्याची माता अंजनीने ऋषींची क्षमा मागून उःशाप मागितला तेव्हा अंगिरस ऋषींनी हनुमंताला ‘‘तू जेव्हा एखाद्या श्रेष्ठ पुरुषाची सेवा करशील तेव्हा तो श्रेष्ठ पुरुष तुला या शापातून मुक्त करेल’’ असा उःशाप दिला. आपला वेदाभ्यास संपवून हनुमंत किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव याच्या सैन्यात दाखल झाला. किष्किंधा नगरीजवळील ऋष्यमूक पर्वतावर वनवास काळात श्रीराम आणि लक्ष्मण सीतेला शोधत आले असता सुग्रीव आणि त्याच्या सैन्याची श्रीरामाशी भेट झाली. सीतामाईच्या शोधकार्यात आम्ही तुम्हाला सहाय्य करू असे सुग्रीवाने श्रीराम, लक्ष्मण यांना वचन दिले. सुग्रीवाने श्रीराम-लक्ष्मणाची सेवा करण्यासाठी हनुमंताची नेमणूक केली. हनुमंताने श्रीराम-लक्ष्मणाची मनोभावे सेवा केली. हनुमंताची ती सेवाभावी वृत्ती, त्याचा प्रामाणिकपणा पाहून श्रीराम प्रसन्न झाले आणि एक दिवस श्रीरामांनी हनुमंताच्या मस्तकावर आपला आशीर्वादाचा हात ठेवला आणि तक्षणीच हनुमंताला अंगिरस ऋषींच्या शापाने गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त झाले. श्रीरामाच्या अनुग्रहाने हनुमंत पुन्हा बलवान आणि सामर्थ्यवान झाला. हनुमंत धन्य झाला आणि श्रीरामाला सारसर्वस्वाने शरण आला. श्रीरामाचा परमभक्त झाला. आपल्या प्रत्येक श्वासात श्रीरामाचे नाव गुंफून आपले अवघे आयुष्यच हनुमंताने श्रीरामाच्या सेवेसाठी अर्पण केले