लेख : प्रभू श्रीरामांचे धर्मसंस्थापनेचे कार्य

4

>>डॉ. रामनाथ खालकर<<

अधर्मी, राक्षसी सत्तेची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी परदेशात जाऊन तेथील सामर्थ्यशाली सत्ता उलथवून टाकणारे प्रभू श्रीराम हे हिंदुस्थानचे पहिले राष्ट्रपुरुष म्हणायला हवेत. त्यानंतरही हिंदुस्थानवर परकीयांची आक्रमणे झाली, येथे परकीय सत्ता प्रस्थापित झाल्या. रामानंतर इतक्या प्रभावी व यशस्वीपणे परकीय सत्तांचे उच्चाटन करण्याचे काम दुसरे कोणी केल्याचे दिसून येत नाही. यास अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवरायांनीसुद्धा परकीय मोगल सत्ता उखडून टाकली व स्वराज्य स्थापन केले. हिंदुस्थानचा प्रदीर्घ इतिहासातील मर्यादापुरुषोत्तम राम व छत्रपती शिवाजी महाराज ही विजिगिषु वृत्तीची दोन ठळक उदाहरणे होत.

महर्षी वाल्मीकींनी रामायणात रामाचे जीवन व अवतारकार्याचे अतिशय सविस्तर वर्णन केले आहे. राम हे विष्णूचा सातवा अवतार होय. ते अयोध्याधिपती दशरथाचे ज्येष्ठ पुत्र होत. वाल्मीकींनी रामायणात मानुषी व दैवी अशा दोन्ही रूपांतील रामांचे चरित्र चित्रीत केले आहे. राजपुत्र म्हणून जन्मास आलेले राम धर्मसंस्थापनेच्या राष्ट्रकार्यामुळे देवत्वास पोहोचले. वाल्मीकींनी रामांचे मनुष्यत्व व देवत्व रामायणातून जगासमोर ठेवले आहे. रामातील मनुष्यत्वामुळे त्यांच्या देवत्वास हीनत्व येत नाही. उलट रामाच्या उन्नत व धीरोदात्त वर्तनामुळे त्यांच्या मनुष्यत्वास देवत्वाचे परिमाण प्राप्त झाले आहे. प्रभू रामांचे वर्तन कधी मनुष्यत्वाच्या स्तरावरून तर कधी देवत्वाच्या स्तरावरून होताना दिसते. अवतारी पुरुष असूनही रामाने मनुष्यत्व जपले आहे. वेदांमधून मनुष्यत्वाच्या नीतिमर्यादा स्वीकारून व त्या मर्यादांमध्ये वर्तन करून श्रीरामाने लोकांसमोर उच्च नैतिक आदर्श ठेवले. आपल्या वर्तनातून लोकांसाठी मर्यादा निर्माण केल्या. सीतेशी रामाविषयी बोलताना हनुमानाने श्रीरामांचे ‘मर्यादानां च लोकांना कर्ता कारयिता च!’ असे वर्णन केले आहे. अशा प्रकारे हनुमानाने सीतेशी रामाविषयी बोलताना ‘लोकांसाठी धर्ममर्यादा निर्माण करून त्याचे पालन करणारा व करविणारा’ असा परिचय करून दिला आहे.

ज्या काळात श्रीरामांचा जन्म झाला त्या काळात हिंदुस्थानात राक्षसांनीच नव्हे तर राक्षस स्त्र्ायांनीही ठिकठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यमुनेच्या काठावरील मधपुरीमध्ये लवणासुराची, बंगाल प्रांतात ताटकेची तर मध्य हिंदुस्थानातील दंडकारण्यात शूर्पणखेची सत्ता होती. खर, दूषण, त्रिशिरादी राक्षस शूर्पणखेचे सेनापती होती. ताटका व शूर्पणखा यांना रावणाने हिंदुस्थानात पाठविले होते. त्यांच्या दुराचरणास रावणाची आतून फूस होती. हे राक्षस व राक्षस स्त्र्ाया ऋषींचे आश्रम, वने व उपवने यांचा विध्वंस करत. त्यांच्या यज्ञात विघ्ने निर्माण करत. सामान्य लोकाचा वध करत. सर्वत्र राक्षसांची दहशत पसरली होती. राक्षसी सत्तेमुळे हिंदुस्थानात अधर्म प्रभावी झाला होता. किष्किंधेतील वानरांचा राजा वाली पराक्रमी होता. तो राक्षसांना प्रतिबंध करू शकला असता, परंतु तसे न करता तो रावणाचा मित्र होतो. तसा तोही दुराचरणीच होता.

वास्तविक, त्यावेळी हिंदुस्थानात शेकडो राजे होते. ते तसे धर्माचरणीही होते, परंतु ते दुर्बल होते. ते राक्षसी सत्तेशी लढू शकत नव्हते. त्यांनी एकत्र येऊन राक्षसी सत्तेशी प्रतिकार करण्याचा विचारही केला नाही. राम चित्रकूट पर्वतावर व दंडकारण्यात जात असताना हजारो ऋषी प्रभू रामास भेटतात व ते रामास त्यांचे राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंती करतात. ‘‘आम्ही याअगोदर इतर राजांकडे याच कारणास्तव गेलो होतो, पण आमचे स्वसामर्थ्याने रक्षण करू शकेल असा राजा भेटला नाही. विश्वामित्रांबरोबर जाऊन तू ताटकेस व सबाहूस मारले व मारीचास पळवून लावले असे समजल्याने तू आमचे रक्षण करू शकशील या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे आलो आहोत’’असेही ऋषी रामास सांगतात. तत्कालीन बव्हंशी हिंदुस्थानी राजे बाह्यतः धर्माचरणी होते. राष्ट्ररक्षण व प्रजारक्षण या मुख्य राजधर्माचा त्यांना विसर पडला होता. येथील राजांच्या दुर्बलतेमुळे धर्मही दुर्बल झाला होता. तसेच परकीय राक्षसी सत्तेमुळेही अधर्म प्रभावी झाला होता.

श्रीरामांनी निश्चयपूर्वक हे चित्र बदलले. विश्वामित्र ऋषींच्या आदेशाने बंगाल प्रांतातील ताटकेचा वध करून तिची सत्ता संपुष्टात आणली. ताटकेबरोबर रामांनी सुबाहू नावाच्या तिच्या पुत्रास मारले व मारीच नावाच्या तिच्या दुसऱया पुत्रास पळवून लावले आणि विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले. रामांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ताटकेस मारून व विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करून धर्मसंस्थापनेस सुरुवात केली.

वनवासकाळात गोदावरीकिनारी जनस्थानात राहत असताना नरमांसभक्षक शूर्पणखेस विद्रूप केले. ती रामाकडे येऊन तिचा भार्या म्हणून स्वीकार करावयास सांगते व सीतेचा वध करण्याची भाषा करते. तेव्हा रामांनी लक्ष्मणास तिला विद्रूप करण्याची आज्ञा केली. ती तेथून खर राक्षसाकडे जाते. राम व लक्ष्मणाविषयी सर्वकाही सांगते. तेव्हा खर आपल्या सेनापती व सैन्यास राम-लक्ष्मणाशी युद्ध करण्यास पाठवितो. लक्ष्मणास सीतेचे रक्षण करण्यास सांगून एकटय़ा रामांनी खराचे सैन्य व सेनापतींना युद्धात मारले. दूषण व खर या बलाढय़ राक्षसांनाही युद्धात मारले व दंडकारण्यातील राक्षसी सत्ता नष्ट केली. यानंतर रामांनी किष्किंधेतील वाली  या वानर राजाचा वध केला. वाली हा दुप्रवृत्त राजा होता. त्याने धर्मशील सुग्रीवास हाकलून दिले व सुग्रीवाच्या भार्येस आपल्या जवळ ठेवून घेतले. त्याने रावणाबरोबर मैत्री केली. त्यामुळे रावणाचे सामर्थ्य वाढले. म्हणूनच रामांनी प्रतिज्ञापूर्वक वालीचा वध करून सुग्रीवास राजा बनविले. वालीचे अधर्माधिष्ठत  राज्य नष्ट करून त्या ठिकाणी सप्रवृत्त सुग्रीवास राजा बनविले व किष्किंधेत धर्मराज्याची स्थापना केली. रावणाचीही सत्ता उलथवून त्याचा वध करून लंकेत बिभीषणाची धर्मसत्ता प्रस्थापित केली. रामचंद्रांनी केलेले हे सर्वात महत्त्वाचे सत्तांतर होते.

रावणाच्या वधानंतर राम अयोध्येत अनभिषिक्त राजा होतो. यानंतरही रामांनी शत्रुघ्नास मधुपरीस पाठवून तेथील दुष्टाचरणी लवणासुराचा वध करून तिथे शत्रुघ्नास राजा बनविले. लवणासुर अत्यंत उन्मत्त राक्षस होता. ऋषींच्या तक्रारीवरून रामांनी त्यास शत्रुघ्नाकरवी मारले. सिंधू नदीच्या किनाऱयावरील गंधर्वाचे राज्यसुद्धा हिंदुस्थानकडून नष्ट केले. काही काळानंतर तिथे भरताच्या तक्ष व पुष्कल या दोन्ही पुत्रांना तक्षशिला व पुष्पकलावत नावाच्या नगरींमध्ये राज्याभिषेक केला. सरस्वती नदीच्या किनाऱयावरील प्रदेशात अंगदिया व चंद्रकांता नावाच्या नगरींमध्ये लक्ष्मणाच्या अंगद व चंद्रकेतू या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक केला. महानिर्वाणाच्या अगोदर भरताच्या आग्रहावरून रामाने कोसल प्रांतातील कुशावती व श्रावस्ती नगरींमध्ये कुश व लव या स्वपुत्रांना राज्याभिषेक केला. महानिर्वाणाप्रसंगी रामाने शत्रुघ्नास अयोध्येत बोलावले. शत्रुघ्नाने आपल्या सुबाहू व शत्रुघाती या दोन्ही पुत्रांना अनुक्रमे मधुरा आणि विदिशा या दोन नगरींमध्ये राज्याभिषेक केला व तो अयोध्येत येतो. उत्तर हिंदुस्थानात रामादी भावंडांनी स्थापन केलेली ही सर्व राज्ये धर्माधिष्ठत होती. अशा प्रकारे दशरथ राजाच्या काळात अयोध्येत प्रस्थापित झालेल्या धर्मराज्याचा रामांनी विस्तार केला. सप्रवृत्त व धर्माचरणी राजांमुळे उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र धर्माचा प्रभाव वाढला व अधर्म निप्रभ झाला.

अधर्मी, राक्षसी सत्तेची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी परदेशात जाऊन तेथील सामर्थ्यशाली राक्षसी सत्ता उलथवून टाकणारे प्रभू श्रीराम हे हिंदुस्थानचे पहिले राष्ट्रपुरुष म्हणायला हवेत. त्यानंतरही हिंदुस्थानवर परकीयांची आक्रमणे झाली, येथे परकीय सत्ता प्रस्थापित झाल्या. रामानंतर इतक्या प्रभावी व यशस्वीपणे परकीय सत्तांचे उच्चाटन करण्याचे काम दुसरे कोणी केल्याचे दिसून येत नाही. यास अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवरायांनीसुद्धा परकीय मोगल सत्ता उखडून टाकली व स्वराज्य स्थापन केले. हिंदुस्थानचा प्रदीर्घ इतिहासातील मर्यादापुरुषोत्तम राम व छत्रपती शिवाजी महाराज ही विजिगिषु वृत्तीची दोन ठळक उदाहरणे होत. आज देशाला मर्यादापुरुषोत्तम रामांची व छत्रपती शिवरायांची गरज आहे.

(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक व रामायणमहाभारताचे अभ्यासक आहेत.)