वऱ्हाडी ठसका

2

>> विष्णू मनोहर

कामानिमित्त कितीही बाहेर फिरावे लागले तरी आपल्या मातृभाषेचा हात भारत गणेशपुरेने घट्ट धरून ठेवला आहे.

भारत गणेशपुरे यांच्याबरोबर जेवणाची संधी केव्हा मिळते याची मी बऱयाच दिवसांपासून वाट बघत होतो. याचे कारण म्हणजे एक तर त्यांची वैदर्भीय बोली भाषा, या माणसाचं एक कौतुक वाटतं की विदर्भाशी असलेलं नातं कायम ठेवून तो मुंबईत वावरतो तेही वैदर्भीय वऱहाडी भाषेसकट. म्हणून मी म्हटलं याच्याशी वऱहाडी भाषेतच गप्पा मारायच्या आणि त्या तशाच तुमच्या समोर मांडायच्या.

भारत गणेशपुरे यांची माझी ओळख जवळपास 15 वर्षांपूर्वीपासून आहे. मी पाहात आलो की खाण्याच्या बाबतीत त्याच्या तशा विशिष्ट आवडी-निवडी नाहीत. सगळेच पदार्थ जवळपास त्याला चालतात.

आता राजे हो! गंमत कशी असते की, एखाद्या माणसाशी बोलाले जातो तवा जर त्या बापूसाहेबाबद्दल आपल्याले ठाव हाय आणि त्याले भी आपल्याबद्दल मालूम हाय, मग असा जांगडगुत्ता बनते राजे हो! का मगं येरच पुरत नाही. तरी आम्ही मात्र जवळपास तीनेक घंटे बसलो. त्यानं गेल्या-गेल्या आपल्या विदर्भातले रचमच पदार्थ मागवले. त्याले तसं सर्वच चालते, फक्त तो पदार्थ थोडा तिखट-मिखट, रचमच असला पाहिजे. आता मात्र त्यानं सांगितले की तब्बेतीले जपा लागतेहो भाऊ, तरीपण अधून-मधून थोडं तिखट-मिखट खाऊनच घेतो. तोपर्यंत फराळाचे वेगवेगळे पदार्थ आमच्या समोर आले. तेही थोडे चटपटीतच होते, तो म्हणाला भाऊ तसं म्हाय जेवनावर प्रेम हाये आणि मायावाल्या बायकोले मायापासून जेवणाबद्दल काय भी त्रास नाय, कावून का? ती जे बनोते ते आनंदानं खातो.

आता थोडं मोठय़ा लोकांसारखं मोड आलेलं, बिना तेलाचं, हिरव्या पालेभाज्या, वगैरे-वगैरे घेत राहितो. थे ग्रीन टी का हिरवा चाहा म्हणजे ते भी पितो, त्यानं उगाचच मोठं झाल्यासारखं वाटते. कधी-कधी माया आवडीचं जेवणं मीच बनून घेतो, आता महिन्यातून पूर्ण दिवस तर काही काम राहात नाही. मग का कराचं रिकामटेकडय़ासारखं बसून तर मगं मी खाण्याचे पदार्थ बनोतो आणि बायकोले भी चारतो. मी नुसते बनोतो असं भी नाही, मी लक्षात घेतो कशामधे काय टाकलं तर काय बनल म्हणून त्या स्वयपाक कट्टय़ाच्या आसपासच फिरतं राहितो. त्यानं दुसरा फायदा असा होते की बायकोले वाटते का बा, मायावाल्या नवऱयाले मी लईच आवडते, अनं ते भी खुशीनं काय-बाय छानं-छानं बनवते.

मी ताटात अन्न कधीही टाकत नाही.
शेवटी बोलता बोलता तो म्हणाला की, एक गोष्ट माया मनातली तुले सांगतो राजा, मी जर नट नसतो झालो तर पीनट् बनवले असते, म्हणजेच तुयासारखा शेफ झालो असतो. एकडाव कोणत्या तरी देशात आम्ही गेलो असतांना त्यानं आमच्यासाठी पोळ्या बनवल्या, आता पोळ्या कायच्या त्या? मैद्याच्या गोल-गोल वातड, अधर्वट कच्च्या, चादरा आणून समोर टाकल्या. मग म्या एक डोस्कं लावलं मी तो तुकडा घेतला अनं ब्रेडटोस्ट करायच्या मशीनमध्ये ठेवला. त्यानं तो रप्कन अंदर घेतला आणि फिरून वापस आला तर मस्त कडक रोटी तयार झाली. मग का पाहा लागते, मी त्यावर लोणी चोपडलं आणं थोडं मीठ घालून अंडय़ासोबत खायला लागलो. अंड मला लय आवडतं. जसा मले जेवण बनवण्याचा इंट्रेस्ट आहे तसाच लोकाले बोलवून त्यायले चांगलं-चुंगलं खावू घालायचा जास्त इंट्रेस्ट आहे.

एकदा मक्या (मकरंद अनासपुरे) घरी असतांना, त् मगं मिनं टोपलीत पाहालं काही हाय का, दोन-चार वाळले-वूळले वांगे अनं आलू होते, मी शिळी भाजी आहे म्हणून मसाले गी थोडे जास्त टाकले अनं आलू-वांग्याचा रस्सा बनवला. तर मक्याला तो ऐवढा आवडला राजे हो की काय विचारू नका!

गिल्लावडा

gilla-wada

साहित्य – भिजवलेली उडदाची डाळ, बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर, बेकिंग पावडर, लिंबाचा रस.
शेंगा चटणीकरिता – भाजलेले शेंगदाणे, तिखट, मीठ, भाजलेले जिरे, दही साखर हे मिश्रण एकत्र करून चटणी करून घ्यावी.

कृती – सर्व प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ घाला. वाटलेली उडदाची डाळ फेटून त्याचे चपटे वडे चिरलेल्या कांद्यात तळून घ्या. लगेच उकळत्या पाण्यात घाला. बाहेर काढून निथळले की चटणीबरोबर खायला द्या. …

भरडा भात

bharda-bhaat

साहित्य – शिजवलेला भात 2 वाटय़ा, जाडसर वाटलेला चण्याच्या डाळीचा भरडा 1 वाटी, जिरे पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार, तिखट, हिंग, मोहरी, पाव-पाव चमचा, तेल 2 चमचे, कढीपत्ता 8-10 पाने.

कृती – प्रथम थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, धणे जिरे पावडर, हळद, तिखट इ. घालून डाळीचा भरडा घालून खरपूस भाजा. त्यानंतर यात मीठ गरजेनुसार गरम पाणी घालून वाफ येऊ द्या. शिजवल्यावर हा भरडा भाताबरोबर कालवून खायच्या वेळी असा हा कालवलेला भात. त्यावर हिंगाचे पाणीवरून मोहरी-लसणाची फोडणी घालून कढीबरोबर मसाल्याच्या मिरचीबरोबर खायला द्या.