… या रानाची पाखरं!

>> आसावरी जोशी

निसर्गाशी, प्राण्यांशी मनस्वी बांधिलकी जपणारा बिष्णोई समाज… हे त्यांचे निसर्गाशी इमान खरेच लोभस… या निमित्ताने महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी आदिम जमातींचा मनोरंजक परामर्श…

प्राण्यांवर त्यांचं निरतिशय प्रेम… निसर्ग म्हणजे त्यांचा हिरवा देव… त्यांची सारी बांधिलकी निसर्गाशी… सारं इमान निसर्गाशी… कारण ही निसर्गदेवता त्यांच्या हर एक सुखदुःखात सामील… हा निसर्ग त्यांचं पोट भरतो… त्यांना संकटापासून वाचवतो… येणाऱ्या प्रत्येक आपत्तीपासून त्यांचं रक्षण करतो.

त्यांचे सण-उत्सवसुद्धा या हिरव्या देवाला समर्पित… ज्याच्याकडून घेतलं… ते त्याचं त्याला दिलं… इतकी साधी-सोपी कृतज्ञतेची भावना. ऊन, पाऊस, वारा या साऱ्यांपासून रक्षण करणारी त्याची झोपडी… त्या झोपडीत पेटणारी त्याची चूल, चुलीवर शिजणारं त्याचं अन्न… सारं सारं निसर्गाचं दान… सगळा व्यवहार निसर्गाशी… त्यामुळे जगणं कसं… अगदी सहज… सुलभ… कोणताही आडपडदा न ठेवणारं… त्याचा लोभ निसर्गावर… रुष्टता निसर्गावर… मागणंही निसर्गाशी… बोलणंही निसर्गाशी… सारं जगणंच निसर्गाशी…

नागर संस्कृतीच्या जराही अध्यात, मध्यात नसणारा हा आदिम समाज. नागरी बडेजाव, पैशाची मुजोरी, फुकटचा भपका… श्रीमंतीचा माज… हे सारे या आदिमातेच्या गावीही नाही… आणि त्यांना या साऱयाची गरजही नाही. ना ते कधी शहरात डोकावत… ना तुमच्या तथाकथित नागरी चालीरितींशी त्यांना काही देणंघेणं… त्यांच्या समृद्ध… पाचूच्या जगात प्राणी-पक्ष्यांच्या मैत्रीत ते रममाण… मश्गूल… पण नागर संस्कृतीला मात्र नसत्या उठाठेवी करण्याचं विकृत वेड. निष्पाप, मुक्या प्राण्यांची शिकार, बेसुमार वृक्षतोड, त्यांना निसर्गानेच बहाल केलेल्या अधिवासावर बिनदिक्कत अतिक्रमण… आणि अक्षरशः बरंच काही…

या साऱ्या मानवनिर्मित संकटांशी हा आदिम समाज त्याच्या जन्मजात चिवटपणे लढतो आहे… याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तथाकथित बॉलीवूड स्टार सलमान खानच्या नसत्या, रक्तरंजीत उपद्व्यापांना चिवटपणे कायदेशीर आव्हान देणारा बिष्णोई समाज. सदोष मनुष्यवधाच्या गुह्यातून हे अभिनेता महाशय पैशाच्या मुजोरीवर सहज सुटले. पण निष्पाप काळवीट मात्र त्याला खरोखरच भारी पडलं. अर्थात काळवीटाची ही लढाई लढतोय बिष्णोई समाज.

आपल्या देशातील अनेक आदिम जमातींपैकी एक हा समाज. या साऱ्या निमित्ताने ‘फुलोरा’नेही बिष्णोई आणि आपल्या महाराष्ट्रातील आदिम समाजाची गुणवैशिष्ट्ये वाचकांसमोर आणायचे ठरवले.

कातकरी समाज

ही महाराष्ट्रातील भटकी, आदिवासी जमात आहे. कात तयार करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. कोळसा बनवणे, जंगलातील मध व लाकडे गोळा करून विकणे हाही त्यांचा जोडधंदा. कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात व नेहमी वस्ती बदलतात. त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते. तिला परसा म्हणतात. या जमातीत पूर्वीपासून विधवा विवाह रूढ आहेत. गांधर्व विवाहाचीही प्रथा आहे. कातकरी कुटुंबात स्त्रियांची हुकमत असते. या स्त्रिया गुंजाच्या माळा दागिने म्हणून घालतात. फळझाडे, भाज्या, कंदमुळे, औषधी वनस्पती, सर्पदंशावरील उतारा यांचे त्यांना उत्तम ज्ञान असते.

पावरा समाज

हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात यांच्या सीमा भागात राहणारा समाज आहे. लाजरी, बुजरी असणारी ही जमात अजूनही पारंपरिक राहणीमानच ठेवते. पावरी ही त्यांची बोली भाषा असून आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचाही तिच्यावर प्रभाव आढळतो. अजूनही जुन्या पिढीतील पुरुष कमरेला फक्त लंगोट लावतात. त्यावर धोतराने कंबर बांधून वर बंडी घालतात. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात. वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण असे दागिने घालतात. या जमातीत होळीला खूप महत्त्व दिले जाते. या सणाला पुरुष पाच दिवस उपवास पाळून जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. इतर सणांमध्ये नवाई, वाघदेव, विदेव इ. निसर्गदेवांच्या पूजा होतात. त्यामुळे स्त्रियांना आदराचे स्थान असते. लग्नसोहळ्यात मोहोच्या फुलांपासून बनवलेले मद्य महत्त्वाचे असते.

अजूनही हिरवाईच्या विश्वातच ही आदीम जमात रमते. खुश असते. छानछोकीचा तिला गंधही नाही. ते आणि त्यांचा हिरवा देव… मग आपण शहरी माणसांनीही ही सीमारेषा सांभाळून त्यांच्या संस्कृतीचा आदर करायला हवा…

बिष्णोई समाज

जोधपूरमधील खेडजली गावात १७३६ सालापासून हा समाज खेजरीच्या झाडांचे रक्षण करतोय. हा गाव नेहमीच हिरवळीने सजलेला असायचा. परंतु काही विघ्नसंतोषी लोक खेजरीची झाडं कापण्यासाठी खेडजलीत पोहोचले. परंतु बिष्णोई लोकांनी त्यांना विरोध केला. शेवटी खेडजलीची राणी अमृतादेवी बिष्णोईने गुरू जांभेश्वरांची शपथ घेत झाडांना मिठी मारली आणि झाडं तोडू न देण्याचा इशारा दिला. इतर गावकऱ्यांनीही तिच्या पाठोपाठ झाडांना आलिंगनं दिली. पण हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं नाही. या घटनेनिमित्त दरवर्षी खेडजली गावात एका जत्रेचं आयोजन केलं जातं.

निसर्गाबद्दल प्रचंड आस्था ठेवणारे हे लोक राजस्थानातील… राजस्थानात पाण्याच्या एका थेंबासाठी लोक व्याकुळतात. पण बिष्णोई समाज जेथे राहतो तेथे पाण्याचे पाणवठे असतात. पशू, पक्षी, प्राणी आनंदात नांदतात. बिष्णोई पाणी अडवतात. जिरवतात. वाचवतात.

बिष्णोई निसर्गाचं संवर्धन करतात. त्याच्या परिसरात विपुल वृक्ष, भरपूर प्राणी आणि निसर्गसंपन्नता दिसते. सद्गुरु जंभेश्वरजी पवार यांनी १५४२ मध्ये हा समाज स्थापन केला. पर्यावरण संरक्षण, भूतदया या दोन गोष्टी या समाजाचा आत्मा आहेत. २० आणि ९ तत्त्वं मिळून बिस नोई अर्थात ‘बिष्णोइ’ हे नाव या पंथाला पडले. या समाजातील मुलं प्राण्यांबरोबर खेळत मोठी होतात.

या महिला प्राण्यांचेही पालनपोषण करतात. त्यांचा आपल्या मुलांप्रमाणे संभाळ करतात. केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषही बेवारस प्राण्यांचे घरातील सदस्यांप्रमाणे पालनपोषण करतात. संपूर्ण शाकाहार हे या आदिम समाजाचे वैशिष्ट्य़.

महादेव कोळी समाज

सह्याद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिकपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे. यांचे पूर्वज श्रीलंकेच्या रावणाच्या दरबारात संगीतकार होते. शिवरायांच्या स्वराज्यकार्यात महादेव कोळी ही जमात सहभागी होती. वाघ्या देव, हिरवा देव, महादेव, खंडेराय हे त्यांचे दैवत. कमळजा देवी, कळसूबाई, रानाई देवीला मानतात. शेतात खूप गवत माजले तर कणसरीची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही या समाजात आढळतात. या लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातील रानमेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यात खूप मोठ्य़ा प्रमाणावर हिरडा गोळा करतात.

वारली समाज

महाराष्ट्रातील ठाणे जिह्यात वास्तव्य. चित्रकला ही या जमातीची खासियत. दक्षिणेतील सात कोकणांपैकी बरलाट या कोकणात राहणारे ते वारली. अशी त्यांची व्युत्पत्ती. त्यांची चित्रकलाही निसर्गाशी निगडित. सूर्य, चंद्र, पर्वत, झाडे… तसेच शिकार, मासेमारी, शेती, नृत्य, प्राणी हे सारे त्यांच्या चित्रात येते. प्रत्येक झोपडीत ही चित्रे असतात. भिंती बनविण्यासाठी झाडाच्या फांद्या, माती आणि शेण यांचे मिश्रण वापरतात. तांदळाचे पीठ आणि डिंक यांच्या मिश्रणातून ही चित्रे आकाराला येतात. दुर्मिळ पालेभाज्यांचे त्यांना ज्ञान असते. नित्याचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे, एखादी हिरवी पालेभाजी. मांसाहार म्हणजे गोड्या पाण्यातील मासळी.

[email protected]