ठसा : दीपक विभाकर नाईक

>>धनश्री देसाई<<

मराठी माणसाचं एक वैशिष्टय़ असतं की, जगाच्या पाठीवर कुठे ही का राहिना आपल्या परीने जसे, जितके आणि जेवढे जमते तेवढे तो समाजासाठी देत असतो किंवा ‘सारे विश्वची माझे घर’, ही भावना हृदयात ठेऊन आपले कर्तव्य करत असतो. मराठी माणसं कधी आपल्या समाजासाठी तर कधी फक्त मानवता हाच धर्म असं म्हणत कुठलीही जातपात न बघता सेवाभाव करत असतात. इंदूर येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते दीपक विभाकर नाईक 28 वर्षांपासून रक्तदान मोहीम निःस्वार्थीपणे राबवतात. एवढेच नव्हे तर सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. याच कार्याची नोंद नवी दिल्ली येथील बृहन्ममहाराष्ट्र मंडळाने घेतली. मंडळाचे 69 वे वार्षिक अधिवेशन बडोदा येथे 16-17 फेब्रुवारी रोजी होत असून, दीपक नाईक यांना मराठी गौरव राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे.

इंदूरचे दीपक नाईक हे ‘रक्तदान महादान’ या उक्तीस अगदी साजेसे कार्य करतात आणि आज नाही तर 28 वर्षांपासून रक्तदान ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे, एक नाही, दोन नाही तब्बल 108 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे. पण हे काही आपले नाव व्हावे या हेतूने नव्हे तर आपल्याकडून समाजासाठी चांगले काम घडावे, आपले कर्तव्य म्हणून नियमितपणे ते रक्तदान करत असतात.

याचबरोबर 12 वर्षांपासून गरजू आणि गरीब, अनवाणी मुला मुलींना देखील ते वहाना भेट करतात. आतापर्यंत त्यांनी साधारण 3600 जोडी वहाना अनवाणी पोरांच्या पायात घातल्या आहेत. घरी असो का बाहेर, ते आपल्याजकळ काही जोड वहाना ठेवतात. कुठेही गरीब आणि अनवाणी पोरं दिसली की नाईकजी त्यांच्या मापाच्या वहाना लगेच त्यांच्या पायात घालून आपले कर्तव्य बजावतात. कित्येक मुला मुलींनी पहिल्यांदाच पायात चपला किंवा बूट घालतोय असे सांगितले. याच्या या उत्तम कार्याची दखल बृहन्महाराष्ट्रानं घेतली आहे आणि त्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून राष्ट्रीय पातळीवर मराठी गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळाचे 69 वे वार्षिक अधिवेशन येत्या 16 आणि  17 फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणार असून त्यात तरुण समाजसेवी दीपक विभाकर नाईक यांना राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष मिलिंद महाजन, प्रधान कार्यवाहक दिलीप कुंभोजकर व सचिव दीपक वर्पे यांनी सांगितले की, यंदा या सामाजिक चळवळीत दीपक नाईक यांनी योगदान दिल्याबद्दल आणि फक्त रक्तदान कार्याबद्दल नव्हे तर शासकीय शाळांमध्ये देखील ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. यासाठीच त्यांचे हे सामाजिक योगदान लक्षात घेउैन त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाला मान देण्यासाठी त्यांना यंदा राष्ट्रीय पातळीकर मराठी गौरक पुरस्कार देण्यात येत आहे. दीपक विभाकर नाईक यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि बडोद्याचे महाराज श्रीमंत समरजितसिंह गायकवाड व महाराणी राधिकादेवी राजे गायकवाड यांच्या हस्ते देण्यात येत आहे. समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे.