संरक्षण सिद्धता आणि पूर्वांचल विकासाचा ‘पूल’


>> सारंग लेले

दळणवळणाची सशक्त साधनं हा कोणत्याही प्रदेशाच्या विकासाचा मूलभूत पाया असतो. गेली सत्तर वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या उत्तरपूर्व प्रदेशाकडे विद्यमान केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर विशेष लक्ष दिले. दळणवळणाच्या साधनांवर काम केले आणि ईशान्येच्या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बोगीबिल पूल हा त्यातलाच एक यशस्वी प्रकल्प आहे. याद्वारे उत्तर पूर्वेच्या विकासाचा रस्ता अजून प्रशस्त होईल, यात शंका नाही. ईशान्येची संरक्षण सिद्धता आणि पूर्वांचलाचा विकास यांचा मेळ साधणारा हा ‘पूल’ म्हणावा लागेल.

साधारण दीडेकशे वर्षांपूर्वी सुएझचा कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला. त्यापूर्वी केप ऑफ गुड होपला वळसा घालून जहाजे आशियात प्रवेश करत असत. सुएझ कालव्याने दक्षिण आफ्रिकेला होणारा मोठा फेरा वाचवला आणि युरोप व आशिया जवळ आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या वाहतूक क्रांतीशी मिळताजुळता हिंदुस्थानातला राष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा बदल म्हणून नुकत्याच उद्घाटन झालेल्या बोगिबील या पुलाकडे पाहता येईल.

1997 मध्ये बोगिबील पुलाची कल्पना मांडली गेली. 2002 मध्ये तत्कालीन दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात पुलाच्या कामाचा आरंभ झाला. मात्र त्यानंतर आलेल्या दोन्ही वेळच्या यूपीए सरकारच्या काळात या कामाची तसूभरही प्रगती झाली नाही. शेवटी विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळात 4.9 किलोमीटर लांबी असलेला हा पूल बांधून तयार झाला आणि योगायोगाने वाजपेयींच्या वाढदिवशी या पुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

ईशान्य हिंदुस्थानचा नकाशा नीटपणे पाहिला तर ब्रह्मपुत्रा नदीचं महापात्र त्या भागाचं भौगोलिक विभाजन करतं. डोंगराळ प्रदेशाचं वर्चस्व असलेला हा सुपीक आणि हिरवागार भाग आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर ईशान्येत जे पूल आहेत, त्यातला बोगिबील हा सर्वात उत्तरेकडचा पूल. याआधी 2017 साली नरेंद्र मोदींनी भूपेन हजारिका पुलाचं उद्घाटन केलं होतं. हजारिका अर्थात ढोला साधिया पूल, नरनारायण सेतू आणि कोलिया भोमरा सेतू हे तिन्ही आसाम राज्याच्या दक्षिण भागात आहेत. बोगिबील सेतू उत्तर भागात आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडतो. या भागात ब्रह्मपुत्रेच्या एका बाजूला इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे तर दुसऱया बाजूला आसाममधलं दिब्रूगढ हे शहर आहे. ईशान्येतल्या या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील अंतर गुगल मॅप्सनुसार फक्त दोनशे बारा किलोमीटर आहे. बोगिबील पूल तयार व्हायच्या आधी ब्रह्मपुत्रेचं पात्र नावेतून पार करणे आणि नंतर पुढे रस्त्याने शहर गाठणे हाच पर्याय दोन्ही बाजूच्या लोकांना उपलब्ध होता. त्यातही पावसाळा आणि ब्रह्मपुत्रा नदीला येणारा पूर यावेळी हा मार्ग कुचकामी ठरे. प्रवासाची ही अनिश्चितता बोगिबील पुलामुळे आता राहणार नाही. शिवाय प्रवासाचा कालावधी सरळ दोन तासांनी कमी होईल.

रोजच्या हजारो वाहनांची होणारी सोय, त्यामुळे वाचणारा वेळ आणि महत्त्वाचं म्हणजे त्याद्वारे इंधन बचत हा मोठा हेतू यामुळे साध्य होईल. इंधनासाठी कच्च्या तेलाची निर्यात करणाऱया आपल्या देशासाठी हे फार आवश्यक आहे.

एचसीसी कंपनीने बनवलेला बोगिबील हा दुमजली पूल असून वरच्या भागात रस्ता आणि खालच्या भागात रेल्वे ट्रक्स अशी त्याची रचना आहे. सामान्यांना परवडणारा, रस्त्यापेक्षा जलद आणि मास पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी रेल्वे हा फार उपयुक्त पर्याय असतो. पॅसेंजर ट्रान्सपोर्टसोबत मालवाहू कंटेनर्स आणि बल्क कॅरियरसाठी रेल्वे तितकीच उपयुक्त असते. ईशान्य भागाला इंधन व इतर मालाचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा वेळेत होण्यासाठी ही फार मोठी सोय होईल.

जलद वाहतूक ही नाशवंत पदार्थासाठी फार गरजेची असते. ईशान्येत पिकणारी चांगल्या दर्जाची आणि जिओग्राफिकल इंडेक्स टॅग (जीआय टॅग) मिळालेली फळे व इतर शेतमाल देशभर उपलब्ध होण्यासाठी रेल्वे फार उपयोगी असणार. ईशान्येतल्या स्थानिक शेतकऱयांना याचा फार मोठा फायदा होईल.

दळणवळणाची सशक्त साधनं हा कोणत्याही प्रदेशाच्या विकासाचा मूलभूत पाया असतो. गेली सत्तर वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या उत्तरपूर्व प्रदेशाकडे विद्यमान सरकारने सत्तेत आल्यावर विशेष लक्ष दिलं, दळणवळणाच्या साधनांवर काम केलं आणि ईशान्येच्या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बोगिबील पूल हा त्यातलाच एक यशस्वी प्रकल्प आहे. याद्वारे उत्तरपूर्वेच्या विकासाचा रस्ता अजून प्रशस्त होईल यात शंका नाही.

दळणवळणाची सशक्त साधनं हा कोणत्याही प्रदेशाच्या विकासाचा मूलभूत पाया असतो. गेली सत्तर वर्षं दुर्लक्षित राह्यलेल्या उत्तरपूर्व प्रदेशाकडे विद्यमान केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर विशेष लक्ष दिलं. दळणवळणाच्या साधनांवर काम केलं आणि ईशान्येच्या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बोगीबिल पूल हा त्यातलाच एक यशस्वी प्रकल्प आहे. ह्याद्वारे उत्तर पूर्वेच्या विकासाचा रस्ता अजून प्रशस्त होईल, ह्यात शंका नाही. ईशान्येची संरक्षण सिद्धता आणि पूर्वांचलाचा विकास यांचा मेळ साधणारा हा ‘पूल’ म्हणावा लागेल.

युद्धासाठी मोठा सपोर्ट
हिंदुस्थानची एक मोठी सीमा ईशान्येस चीनला लागून आहे. डोकलाम प्रदेशात चीनबरोबर वाद निर्माण झाल्यावर चीनने ल्हासा, हेपिंग शिगातसे इत्यादी भागात हवाई तळ बांधायला सुरुवात केली. त्यामुळे अरुणाचल प्रदेशचं मोठं सामरिक महत्त्व लक्षात घेता हिंदुस्थानी भूभागात दळणवळणाची सशक्त साधनं तयार असणं फार गरजेचं आहे. साठ टनाच्या रणगाडय़ापासून ते थेट लढाऊ विमानं उतरवण्यासाठी बोगिबील पूल डिझाईन केला गेला आहे. युद्धाच्या प्रसंगी हा फार मोठा सपोर्ट असणार आहे.