कर्क ही फक्त रास असावी…

5

>> डॉ. अमित गांधी 

आज जागतिक कर्करोग दिन. कर्करोग म्हटले की भीतीचे मळभ दाटून येते. त्याची लक्षणे, उपचार, सारे खूपच वेदनादायीसामान्य माणसांच्या आकलनापलीकडलेपण आपल्या रोजच्या जीवनशैलीला थोडी शिस्त लावलीतणावमुक्त जगण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतीलआणि खऱ्या अर्थाने कर्क ही केवळ रासच राहील.

कॅन्सर  का कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. कर्करोगाच्या काही प्रकारांवर अजूनही उपाय शोधले जात आहेत. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. ती जाणून घेतली आणि ती टाळण्याचा प्रयत्न केला तर हा रोग नक्कीच दूर ठेवता येतो. हा रोग होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट. पण याव्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत. जंक फूड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, पराकोटीचा तणाव, प्रदूषण यासारख्या गोष्टीच कर्करोगाला निमंत्रण देतात. प्रशिक्षित डॉक्टरच या रोगाचे अचूक निदान करू शकतात. कर्करोगाची तपासणी करताना सर्वात निश्चित पद्धत म्हणजे बायोप्सी. बायोप्सीमुळे अत्यंत तपशीलवार विश्लेषण मिळते.

उपचाराचा कालखंड

कर्करोगाच्या उपचाराचा कालखंड हा अतिशय वेदनादायी आणि गुंतागुंतीचा असतो. या काळात स्वतःला अत्यंत सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी अत्यंत जवळच्या व्यक्तींना आणि तुम्हाला सकारात्मकता देतील अशा व्यक्तींच्या सहवासात राहा. चांगले वाचा, चांगले संगीत ऐका. समाजमाध्यमं व इतर माध्यमे यांचा कमीतकमी वापर करा. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

केस परत येतात

 • कर्करोगामध्ये किमो थेरेपी प्रामुख्याने केली जातेच. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचे केस हळूहळू गळू लागतात. पण ही थेरेपी पूर्ण झाली की हे केस पूर्ववत येतात. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही.
 • किमोथेरपीमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे ही थेरपी सुरू केल्यानंतर केस जातात. म्हणजेच केसांची निर्मिती करणाऱ्या पेशींवर त्यांचा विपरित परिणाम होतो. म्हणूनच किमो थेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो. मात्र किमो थेरपीचे उपचार बंद झाल्यावर साधारणतः पाच ते सहा महिन्यांनंतर केस पुन्हा येतात.
 • केस जाणे हा केवळ त्या उपचार पद्धतीचा परिणाम असतो.

किमो थेरपी महत्त्वाची

मोठमोठय़ा शस्त्रक्रिया करून घेताना न डगमगणारे लोकही किमो थेरपीला घाबरतात. किमोथेरपी टाळता येईल का हे आधी विचारले जाते. वास्तविक किमो थेरपी म्हणजे कर्करोगावर रसायनांद्वारे केलेले उपचार. इतर आजारांवर ज्याप्रमाणे गोळ्या वा इंजेक्शन्स असतात, तशीच किमो थेरपी ही कर्करोगावर वापरण्यात येणारा उपचार आहे. फक्त गोळ्या-इंजेक्शन्स आहेत. यामध्ये कर्करोगाच्या पेशींमध्ये शिरून पेशींवर उपचार केले जातात. शस्त्रक्रियेमुळे दृश्य स्वरूपातील गाठ काढून टाकलेली असली तरी या रोगाच्या सूक्ष्म पेशी शरीरात इतरत्र पसरू शकतात व हा रोग पुन्हा उद्भवतो. ही आपत्ती टाळण्यासाठीच ऑपरेशननंतर किमो थेरपी दिली जाते.

जीवनशैली सुधारा!

 • नियमित व्यायाम करा.
 • झोपण्या-उठण्याच्या वेळा नियमित ठेवा
 • संतुलित आणि सकस आहार घ्या. आहार शक्यतो घरचा आणि सात्विक असेल तर उत्तम.
 • तणावरहीत आयुष्य जगा.
 • या रोगाचे निदान व्हायला उशीर लागतो. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसले की डॉक्टरांना भेटा.
 • स्वत:ची वैद्यकीय तपासणी नियमित करा.
 • मनाला उभारी द्या
 • मनाने ठरवले तर अशक्य गोष्टही आपण साध्य करू शकतो.
 • कर्करोग झाला म्हणजे अंत ठरलेला… हा विचार मनातून काढून टाका.
 • दुर्दैवाने कर्करोग झालाच तरी खचून जाऊ नका.
 • तुमची मन:शक्ती व वैद्यकीय उपचार या दोन गोष्टींच्या आधारे कर्करोगाला यशस्वी मात देता येते.

वेदना कशी सहन कराल?

 • कर्करोगामध्ये असह्य वेदना होतात हे पूर्ण सत्य नाही.
 • योग्य उपचारपद्धतीमुळे वेदना का होतात याची कारणे कळू शकतात. एक तर कर्करोगाच्या गाठींमुळे वेदना होतात, या रोगावरील शस्त्रक्रियेमुळे, किमो थेरेपी व रेडिओ थेरेपीमुळे वेदना होतात.
 • वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ठणका लागणे, जळजळ होणे, सुया टोचल्यासारखे वाटणे. अधूनमधून किंवा सतत या वेदना होत राहातात.
 • या वेदनांवर उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेली औषधे काटेकोरपणे घेणे.उपचारांचा मनावरील ताण सकारात्मक रितीने कमी करणे. कुठे वेदना होते ते तज्ज्ञांना वेळोवेळी सांगणे.

ही पहा टक्केवारी…

 • तंबाखू सोडला तर ३३ टक्क्यांपर्यंत कर्करोग टाळता येतो.
 • वजनावर नियंत्रण ठेवाल तर २० टक्क्यांपर्यंत कर्करोग टळेल.
 • विषाणूंपासून दूर राहिल्यास १६ टक्के कर्करोग बरा होईल.
 • निष्क्रिय वृत्तीमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण ५ टक्के आहे.
 • ५ टक्के कर्करोग हे खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात.
 • उन्हात सतत राहिल्याने सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे कर्करोग झाल्याचे निदान २ टक्के प्रकरणांत दिसून आले आहे.

कर्करोगाची लक्षणे

 • स्तनात वा शरीरातील काही भागांत गाठी तयार होणे.
 • खोकला किंवा सतत घसा दुखणे
 • दीर्घकाळापासूनची दुखणी
 • वारंवार बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणे
 • तोंडातली बरी न होणारी जखम
 • अपचन किंवा अन्न गिळताना त्रास होणे
 • अचानक आवाजात बदल होणे
 • सतत खोकला किंवा आवाजात घोगरेपणा येणे
 • लघवी किंवा शौचातून रक्तस्त्राव होणे
 • मूत्रविसर्जनाचा त्रास होणे.
 • वारंवार चक्कर येणे किंवा भूक न लागणे
 • वजनात अचानक घट होणे.
 • त्वचेवर तिळांची संख्या किंवा आकार वाढणे.

लेखक कर्करोग विशेषज्ज्ञ आहेत.

[email protected]