वेगळ्या ‘Type’चा माणूस!

>>ज्योत्स्ना गाडगीळ.

आनंद मिळवण्यासाठी काम कराल, तर कदाचित दु:ख मिळेल, मात्र मिळालेले काम आनंदाने कराल, तर निश्चितच सुख मिळेल. ह्या सुविचाराला अनुरुप एक व्यक्ती, मध्यंतरी माझ्या परिचयात आली. त्यांचे नाव चंद्रकांत भिडे. ह्यांनी आयुष्याची ३४ वर्षे टायपिस्ट म्हणून काम केले आणि टायपिंगच्या कामातून गेली ५१ वर्षे ते टंकचित्रकलेची आवड जोपासली. कशी ते पहा…

‘जे. जे. इन्स्टिट्यूटमध्ये तुला उच्च शिक्षण देण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत, त्यापेक्षा टायपिंग-शॉर्टहँड शिक, नोकरीला लाग आणि कुटुंबाला हातभार लाव.’ हे वडिलांचे बोल शिरोधार्य मानून चंद्रकांत भिडे ह्यांनी सर्वसामान्य मुंबईकर म्हणून आयुष्याचा प्रवास सुरू केला. भिडे, मुळचे रत्नागिरीच्या जामसंड्याचे. वडील अर्थाजर्नासाठी मुंबईत आले. काही काळ गिरगावच्या संतीण बार्इंच्या चाळीत राहिले, मग कायमस्वरूपी दादरकर झाले. एस.के.बोले रोड येथील ‘पालन सोजोपाल’ चाळीत चंद्रकांत ह्यांचा जन्म झाला. पिंटो विला हायस्कुल येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे चित्रकलेत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता, परंतु कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्यामुळे, वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी टायपिंगशी मैत्री केली आणि टायपिस्टचा शिक्का लावून घेतला.

bhide-jyo-1

दीड वर्ष टायपिंगचे प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना ‘चिफ प्रेसिंडेंन्सी मॅजिस्ट्रेट’ येथे टायपिस्टची नोकरी मिळाली. ७-८ महिने काम केल्यावर `मुंबई (तेव्हाच्या बॉम्बे) युनिव्हर्सिटी’त नोकरी मिळाली. तिथे दोन वर्षे अनुभव घेतल्यावर `युनियन बँके’ची नोकरी मिळाली. युनियन बँकेत तीस वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ह्या सगळ्या प्रवासात त्यांची चित्रकला बहरली, ती टाईप रायटरवर!

saheb-sketch

अचूक, नेटके आणि जलद टायपिस्ट अशी भिडे ह्यांची कार्यालयात ओळख होती. त्यामुळे दैनंदिन कामाबरोबरच ऑफिसची महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडूनच टाईप करून घेतली जात असत. एकदा साहेबांनी त्यांना इंटरकॉमची यादी टाईप करायला सांगितली. भिडे ह्यांनी कल्पकतेने सर्व क्रमांक टेलिफोनच्या आकारात टाईप केले. त्यांचा हटके अंदाज सर्वांना आवडला. सहज केलेल्या कृतीतून भिडे ह्यांना आपला चित्रकलेचा छंद जोपासण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ‘टंकचित्रे’ काढण्याचा `श्रीगणेशा’ केला.

गणपती बाप्पा आकार-उकार अॅडजेस्ट करून घेतो. म्हणून टंकचित्राचा सराव करण्यासाठी भिडे ह्यांनी टाईपराईटरवर तऱ्हेतऱ्हेचे बाप्पा साकारले. बाप्पा पावला. भिडेंना आणखी नवनव्या क्ऌप्त्या सुचू लागल्या. ऑलिम्पिक खेळातील चिन्हे, क्रिकेटर्सच्या मुद्रा, कार्टुन कॅरेक्टर त्यांनी टाईपरायटरवर रेखाटले. चांगला सराव झाल्यावर, कागदाचा अंदाज आणि चिन्हांचा अचूक वापर होऊ लागल्यावर त्यांनी व्यक्तिचित्रे रेखाटायला घेतली. चित्रकलेत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे प्रमाणबद्धता! ही प्रमाणबद्धता त्यांना अभ्यासाने आली. प्रत्यक्ष चित्रे काढण्याचा सराव नसला, तरी चित्रकार मारिओ मिरांडा, आर. के. लक्ष्मण, मंगेश तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या चित्रांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. ह्या सर्व दिग्गज कलाकारांनी काढलेली चित्रे तासनतास न्याहाळण्याचा भिडेंना छंद होता. त्यामुळे त्यांची चित्रकलेची दृष्टी तयार झाली होती. मनातली छबी कुंचल्याद्वारे कागदावर न उतरता, थेट टाईपरायटरद्वारे कागदावर उतरली, एवढाच काय तो फरक!

atre-pula-sketch

भिडे सांगतात, `टंकचित्र’कलेने मला वेगळी ओळख दिली, मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची, बोलण्याची संधी मिळाली. अन्यथा मी एक सर्वसामान्य मुंबईकर राहिलो असतो. माझे काम मी श्रद्धेने केले, त्याचेच फळ म्हणून माझ्या कामाने मला प्रसिद्धी दिली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, मंगेश तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर, मारिओ मिरांडा, शंकर-जयकिशन, सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे अशा अनेक मोठमोठ्या लोकांना भेटून त्यांची टंकचित्रे भेट दिली. त्यांची स्वाक्षरी घेऊन एक प्रत त्यांना भेट दिली, तर दुसरी माझ्याकडे संग्रही ठेवली. जवळपास १५० टंकचित्रांचा माझ्याकडे संग्रह झाला आहे. आजवर अनेक ठिकाणी मी त्याची प्रदर्शने भरवली. आता त्या सर्व माहितीचे, चित्रांचे, अनुभवाचे पुस्तक करण्याचा मानस आहे. प्रकाशकांनी पुढाकार घेतला,तर माझ्या हयातीत ते स्वप्नही साकार होईल.’

lata-sachin-sketch

बँकेत नोकरी करत असल्यापासून कागदपत्रांचे टापटीप फायलिंग करण्याची सवय भिडेंच्या अंगात भिनली आहे. त्यांनी संग्रही केलेल्या बातम्या, फोटो, चित्रे, स्वाक्षरी, प्रासंगिक अनुभव हा सर्व साठा पाहताना त्याची साक्ष पटते. ह्या सर्व संकलनाचे पुस्तक काढून `एक वेगळ्या Type चा माणूस’ असे शीर्षक देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे

भिडे ह्यांच्यावर सुविचारांचा चांगलाच पगडा आहे. त्यांच्या बोलण्यात दर दहा वाक्यांमध्ये एखादा सुविचार हमखास डोकावतो. सुविचारांचे गाठोडे वाचकांच्या हाती लागावे, म्हणून त्यांनी १५०० हिंदी, मराठी, इंग्रजी सुविचारांचे स्वहस्ताक्षरात संकलन केले आहे. त्याचेही छान पुस्तक होऊ शकेल. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी भिडेंनी ऑक्सफर्ड शब्दकोश तीनदा वाचून काढला आणि त्यातूनच त्यांना शब्दांच्या गमती-जमती उमगल्या. मराठी-इंग्रजी बाराखडी आणि काही शब्द ह्यातून शब्दचित्रे तयार केली. जी काही काळ `संध्यानंद’ तसेच `मिड डे’ वृत्तपत्रातून प्रकाशित झाली. त्यावरही स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. भिडे ह्यांच्याकडे विविध कल्पना आहेत, फक्त त्या साकार करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ नाही. परंतु, त्यासाठी थांबून न राहता त्यांनी स्वत:पुरते कागदाचे बार्इंडिंग करून त्यांच्या संग्रहाला पुस्तकाचा ढोबळ आकार दिला आहे.

भिडे ह्यांनी छंद जोपासला, परंतु नोकरीच्या वेळेत नाही, तर कधी वेळेआधी येऊन, नाहीतर वेळेनंतर थांबून! कारण, त्यांच्या घरी टाईपरायटर नव्हता आणि तो विकत घेण्याइतकी परिस्थिती नव्हती. स्वेच्छानिवृत्ती घेत असताना त्यांच्या वापरातला टाईपरायटर विकत घेण्यासाठी बँकेकडे विनंती अर्ज केला, तेव्हा त्यांचा टाईपरायटर त्यांना भेट म्हणून देण्यात आला. भिडे आपल्या यशाचे श्रेय बँकेच्या अधिकाऱ्यांना देतात. ते सांगतात, `टंकचित्रांचे प्रदर्शन भरवण्याची कल्पना मला मारिओ मिरांडा यांनी दिली होती. एवढेच नव्हे, तर माझ्या टंकचित्राचे पुस्तक तयार झाल्यावर ते कव्हरपेज रेखाटणार होते. दुदैवाने तसे होऊ शकले नाही, मात्र बँकेने माझी पहिली चार प्रदर्शने त्यांच्या राखीव हॉलमध्ये भरवल्यामुळे मारिओ ह्यांच्या हातून प्रदर्शनाचे उद्घाटन होऊ शकले. एचढेच नाही, तर चित्राचा कागद खराब होऊ नये, म्हणून माझ्या सर्व चित्रांना लॅमिनेशन करून घेतले. तेव्हा एक पेज ३८ रुपयांत लॅमिनेट करून दिले जाई. असा एकूण १६,००० रुपयांचा खर्च आमचे वरिष्ठ पनीर सेल्वम साहेबांनी केला. बँकेने मला केवळ छंद जोपासण्याची संधी दिली नाही, तर वेळोवेळी माझ्या कार्यालयीन कामाची दखल घेऊन उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविले.’

r-k-bhide

अस्सल दादरकर असलेले भिडे ह्यांना दादरच्या `अमर हिंद मंडळाने’ त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी सुखद धक्का दिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई महापालिकेने `मानपत्र’ देऊन सत्कार केला. २०१० मध्ये आशियातील `मूड इंडिगो’ ह्या आशियातील मोठ्या प्रदर्शनात हिंदुस्थानतर्फे भिडे ह्यांना त्यांचे `युनिक आर्ट’ प्रदर्शित करण्याची संधी मिळाली होती. अनेक ठिकाणी पुरस्कार मिळूनही `महाराष्ट्र कला पुरस्कारा’पासून भिडे आजही वंचित आहेत. मात्र, ह्याबद्दल फार वाच्यता न करता, टंकचित्रांमुळे जोडली गेलेली माणसे आणि त्यांनी केलेले कौतुक हेच आपल्यासाठी पुरस्कार आहे, असे भिडे सांगतात.

संगीतकार शंकर-जयकिशन, संगीतकार श्रीकांत ठाकरे, चित्रकार आर.के. लक्ष्मण ह्यांच्याशी भिडेंची जवळीक होती. मात्र, त्यांच्याशी ओळखीचा त्यांनी कधीही व्यावसायिक उपयोग करून घेतला नाही, तर निखळ मैत्री सदैव जपली. ७२ वर्षांचे भिडे आजही ५-६ तास बसून न कंटाळता, न थकता टंकचित्रांचा सराव करत असतात. त्यांनी आजवर आपले आदर्श टंकचित्रात उतरवले. पैकी कुसुमाग्रजांचे चित्र रेखाटून त्यांच्या हयातीत द्यायचे राहून गेले, ह्याचे शल्य आजही भिडे ह्यांना वाटते. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, राणी एलिझाबेथ ह्यांची टंकचित्रे काढायची आहेत. भिडे ह्यांच्या अनोख्या कलेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. स्वाभाविक आहे, त्यासाठी लागणारी एकाग्रता, संयम आणि कलेवर निष्ठा एकाच ठिकाणी बघायला मिळणे दुर्मिळ आहे. त्यांच्या कलेबद्दल गौरवोद्गार काढताना लेखक व.पु.काळे ह्यांनी म्हटले आहे – `प्रिय चंद्रकांत, टायपिंग हा व्यवसाय, टायपिस्टची नोकरी आणि टाईपरायटर हे यंत्र….ह्या सगळ्याचा तुम्ही गौरव केलात.’