किमोथेरपी आणि केस गळणं…


कर्करोग, किमोथेरपी ही नावं नुसती ऐकली तरी चिंतेचे सावट प्रत्येकाच्या चेहऱयावर दिसू लागतं. किमोथेरपीत केस गळणं हा एक वेदनादायी भाग… कसे तोंड द्यावे याला…

केस ही स्त्री-पुरुषांच्या सौंदर्याची ओळख. मात्र कर्करोगादरम्यान कराव्या लागणाऱया किमोथेरपीदरम्यान हळूहळू रुग्णांचे केस गळतात. अशा वेळी ‘‘डॉक्टर, माझे केस पुन्हा येतील ना?’’ अशी शंका बऱयाच रुग्णांना सतावते. त्यामुळे निराशा, नकारात्मक मानसिकता, भीती, काळजी मनात असते. यावेळी नातेवाईकांनी धीर देणे आवश्यक असले तरीही रुग्णालाही या प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे किमोथेरपी शरीरातील कर्करोगाच्या वाढणाऱया पेशींना मारण्यासाठी दिली जाते. अशा रुग्णाच्या शरीरात 80 ते 90 टक्के जलद वाढणाऱया पेशी या कर्करोगाच्या असतात, पण याचबरोबर शरीरातील लाल आणि पांढऱया रक्तपेशी आणि केसांच्या पेशीही दररोज वाढत असतात. किमोथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींसह लाल रक्तपेशी आणि पांढऱया रक्तपेशीसुद्धा मरतात. असे होत असले तरी शरीरात त्यांची वाढ होतच असते. त्याकरिता डॉक्टर या रुग्णांना सीबीसी करायला सांगतात. त्यादरम्यान पंधरा दिवसांत लाल आणि पांढऱया रक्तपेशी कमी झाल्या तरी त्या पुन्हा वाढतात. म्हणून त्याकरिता तीन आठवडय़ांचा काळ जाऊ दिला. त्यानंतर पुन्हा केमोथेरपी केली जाते, पण केसांच्या पेशी वाढण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे दुसरी केमोथेरपी येईपर्यंत केसांची वाढ दिसत नाही. असे असले तरीही किमोथेरपीमुळे केसांवर साईड इफेक्ट (दुष्परिणाम) झाला असे म्हणता येत नाही. या उपायामुळे होणारी केसगळती ही घडणारी एक सहज प्रक्रिया आहे. किमोथेरपी संपली की, स्त्री-पुरुष सर्व रुग्णांना पुन्हा पूर्वीसारखे केस येतात.

केसगळती टाळण्यासाठी किमोथेरपीदरम्यान वापरण्यात येणाऱया एका यंत्रामुळे केसांना थंड हवा मिळते. यावेळी होणारा रक्तस्राव होऊ नये यासाठी बर्फाच्या गादीचा वापर केला जातो, पण हा उपाय फक्त किमोथेरपीदरम्यान करता येण्यासारखा असतो. त्यामुळे केसगळती कमी होऊ शकते. तरीही रुग्णाने किमोथेरपीवेळी स्वतःचे केस गळणार आहेत हे गृहितच धरावे. स्तनांच्या कर्करोगावेळी कराव्या लागणाऱया किमोथेरपीवेळी वापरण्यात येणाऱया ड्रग्जमुळे (रासायनिक द्रव्यांच्या वापरामुळे) केस संपूर्ण गळतात. काही वेळा या उपचारांवेळी केस कमी-जास्तही गळू शकतात हेही लक्षात घ्यावे.

केस वाढू लागतात तेव्हा
– त्यानंतर आलेल्या बारीक, लहान मुलांसारख्या कुरळ्या केसांची काळजी घ्यावी.
– डोक्याला खोबरेल किंवा आयुर्वेदिक तेलाने मसाज करावा.
– मनःशांतीसाठी ध्यानधारणा किंवा योग करावा.
– आयुर्वेदिक औषध, मसाज, स्पा असे उपचार केल्यास केसांचे सौंदर्य अबाधित राखता येते.
– संतुलित आहार घ्यावा. व्यसनांना दूर ठेवावे.

मानसिकता कशी असावी?
– किमोथेरपीवेळी केस गळणार आहेत, या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायचे आहे याची मानसिक तयारी करणे गरजेचे आहे.
– स्त्री-पुरुषांनी किमोथेरपी सुरू करण्यापूर्वी एक विग बनवून घालावा, जेणेकरून समाजात वावरताना त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
– किमोथेरपी झाली की, सर्वच रुग्णांना शंभर टक्के नवे केस पुन्हा नव्याने येतात याची खात्री बाळगा.
– ज्यांचे केस लांब असतील त्यांनी ते केस काढायचे आणि स्वतःच्याच केसांचा विग बनवून वापरू शकतात.
– केसगळती तात्पुरती असते. केस कमी गळणं किंवा जास्त गळणं हा उपचाराचा एक भाग आहे. केसगळतीवर उपचारांचा प्रभाव अवलंबून नाही. त्यामुळे अशा अवस्थेत अजिबात निराश होऊ नये.
– किमोथेरपीमुळे होणारे गैरसमज समाजात जास्त आहेत. त्याऐवजी या थेरपीची व्यवस्थित माहिती करून घ्यावी. म्हणजे गैरसमज टाळता येतील.
– तात्पुरत्या स्वरूपातच ही थेरपी त्रासदायक ठरते. किमोथेरपीनंतर केस गळणे, मळमळणे, रक्त गळणे हे त्रास तात्पुरते असतात. हे लक्षात घ्यावे.
– किमोथेरपी संपली की, तीन ते सहा महिन्यांत केस येऊ लागतात. 2

किमोथेरपी आणि आहार
किमोथेरपीवेळी इन्ट्राव्हेनस, कॅथेटर किंवा औषधी गोळ्यांच्या स्वरूपात रासायनिक द्रव्ये रक्तात सोडली जातात. ही औषधे काही अंतराच्या विश्रांतीने दिली जातात. किमोथेरपी सेरेब्रोस्पायनल फ्ल्युईडमध्ये दिले जाते. या किमोथेरपीमध्ये दुष्परिणाम जास्त असतात. उदा. केस गळणे, मळमळणे, उलटय़ा होणे, भूक न लागणे, रक्तस्राव, संसर्ग होणे. यासाठी मऊ आणि हलका आहार रुग्णास उपयुक्त ठरतो.
– तुपावर भाजलेल्या तांदळाची पेज, मुगाचे वरण, साजूक तुपाची फोडणी दिलेल्या उकडलेल्या भाज्या, फुलके, भाज्यांचे सूप, गोड ताजे ताक, लोणी, नाचणीचे सत्त्व यांचा आहारात मोठय़ा प्रमाणात वापर करावा.
– गाईचे दूध, गोड ताजी द्राक्षे, डाळिंब, अंजीर अशी रसाळ व गोड फळे, साळीच्या लाह्या, चंदन व वाळा घातलेले, उकळून थंड केलेले पाणी यांचा आहारात समावेश असावा.

डॉ. धैर्यशील सावंत, एशियन कॅन्सर इन्स्टिटय़ूट.