मंदिर स्वच्छता अभियान राबवावे

>> सुनील लोंढे

सध्या देशात हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासणारी सरकारे राज्याराज्यांत आहेत. गंगा स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सरकारने स्वच्छ भारत मिशनमध्ये मंदिर स्वच्छता अभियानही राबवण्याचा प्रयत्न केल्यास मंदिरेही सत्यं शिवं सुंदरम होतील. लोकप्रतिनिधीही मंदिर स्वच्छतेला निधी पुरवू शकतात. कीर्तनकार, प्रवचनकार हे प्रवचनात भगवंताचे गुणवर्णन रसाळ भाषेत वर्णन करून सांगतात. त्यांनी त्यासोबतच प्रवचनात मंदिरातील अस्वच्छतेमुळे मंदिरातील चैतन्य कसे घटत जाते, हे भाविकांच्या मनावर बिंबवले पाहिजे. आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवनशैलीही बदलून जाते. इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे पाहता तेथील स्वच्छता नजरेत भरते. तसे सर्व मंदिराविषयी का होत नाही? मंदिरातील छताला असलेली जळमटे, धूळ, दिव्यातील तेल, काजळी यामुळे पसरलेला चिकटपणा, निर्माल्य कुठेही टाकून देणे आदी गोष्टींमुळे मंदिर अस्वच्छ होऊन तेथील सात्विकता कमी होत जाते. तसेच मंदिराच्या बाहेर असलेले भिकारी, मद्यमांसाची दुकाने हे घटकही अस्वच्छतेला हातभार लावतात. मंदिरे ही हिंदू धर्मीयांची आधारशीला आणि चैतन्याची स्रोत आहेत. या मंदिरांनी हिंदू संस्कृतीचे जतन, रक्षण आणि संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

भाविकांची भक्ती आणि दानशूर वृत्ती यांच्या आधारे जपली गेलेली मंदिर संस्कृती हे जगातील सगळ्या संस्कृती लयाला जाऊनही हिंदू संस्कृती टिकून राहण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे; परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सरकार ग्राम स्वच्छता अभियान राबवते. गांधी जयंतीला स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करते; परंतु देशातील काही मंदिरांचा अपवाद वगळता मंदिरातील स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले जात नाही असे दिसून येते. मंदिरातील अर्पणावर डोळा ठेवून सरकार ती ताब्यात घेते. भक्तांसाठी काही सुविधा पुरवतांना स्वच्छतेच्या सूत्राकडे मात्र कानाडोळा करते. मंदिर स्वच्छतेकडे हिंदू धर्मीयांचे अक्षम्य दुर्लक्ष होण्याला कारण म्हणजे स्वच्छतेकडे आपण गांभीर्याने पाहत नाही. रस्त्यांवर थुंकणे, लघुशंका करणे, कुठेही कचरा टाकणे, अशा कितीतरी गोष्टीतून हिंदुस्थानींची स्वच्छतेविषयीची अनास्था दिसून येते. एरव्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केरसुणीने घर स्वच्छ करतात, कारण लक्ष्मीला स्वच्छता आवडते. त्या रात्री लक्ष्मी येऊन ज्याचे घर स्वच्छ असेल त्या घरात निवास करते अशी समजूत आहे आणि त्याप्रमाणे चालून लोक घर स्वच्छ ठेवतात. स्वच्छतेचा दृष्टिकोन हा तात्पुरता राहतो. जिथे स्वच्छता आहे तिथे प्रसन्नता वाटते. त्याठिकाणी थांबून रहावेसे वाटते. भाविक दर्शनाला येतात ते मंदिरातील चैतन्याचा लाभ घेण्यासाठी. मंदिरातील अस्वच्छतेमुळे तेथील वातावरणातील सात्विकता कमी होत जाते. वार्षिक उत्सवाला आणि काही प्रसंगी महाआरतीला भाविक एकत्र येतात, तसेच मंदिर स्वच्छतेच्या सेवेसाठीही आठवड्य़ातून अथवा महिन्यातून एकत्र आले पाहिजे. यामुळे संघटनशक्ती वाढण्याबरोबरच मंदिराची सात्विकता वाढते, तसेच मंदिर स्वच्छतेचा उपक्रमही उत्तमरीत्या पार पडतो. यासाठी मंदिर विश्वस्तांनी देवाला धन अर्पण करण्यासह शरीरही अर्पण करण्याचे महत्व भाविकांच्या मनावर बिंबवायला हवे. ईश्वरप्राप्तीसाठी भक्त देवाला तन, मन, धन प्रसंगी प्राणही अर्पण करतो. मंदिराची स्वच्छता केली असता देवाला शरीर अर्पण करण्याचे पुण्यफळ भक्ताला प्राप्त होते. मुख्य म्हणजे धन अर्पण केले असता जो अहंकार मनाला शिवतो, तसा अहंकार शरीर अर्पण केले असता न होता उलट अहं कमीच व्हायला मदत होते. संत चोखामेळाने विठ्ठल मंदिर परिसर स्वच्छ करून देवाला प्रसन्न करून घेतले, हे उदाहरण सर्वांना परिचित आहे. संत गाडगेबाबा यांनीही स्वतः झाडू हाती घेऊन अनेक परिसर स्वच्छ केले. मंदिर व्यवस्थापन वैद्यकीय सुविधा, वृद्धाश्रम, दुर्बल घटकांना आपत्कालीन मदत अशा काही गोष्टीवर भावनिक स्तरावर मदत करत असते; परंतु ‘सत्यं शिवं सुंदरम’ या वचनाची आठवण ठेवून मंदिर स्वच्छतेसाठी धनाचा विनियोग करत नाही. वर्षातून देवतेच्या वार्षिक उत्सवाला स्वच्छता केली की आपले कर्तव्य संपले अशी मानसिकता असते. मंदिर स्वच्छतेसाठी विश्वस्त मंदिराच्या आकारमानानुसार कचरा टाकण्यासाठी डबे, अत्याधुनिक मशिन्सचा उपयोग करून स्वच्छता करणे, योग्य ठिकाणी शौचालये, भाविकांना पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी आणि निरीक्षक यांची पुरेशी संख्या किंवा खासगी आस्थापनांबरोबर स्वच्छतेचा वार्षिक करार करणे असे उपाय करू शकतात.

सध्या देशात हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासणारी सरकारे राज्या राज्यांत स्थापन होत आहेत. गंगा स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सरकारने स्वच्छ भारत मिशनमध्ये मंदिर स्वच्छता अभियानही राबवण्याचा प्रयत्न केल्यास मंदिरेही सत्यं शिवं सुंदरम होतील. लोकप्रतिनिधीही मंदिर स्वच्छतेला निधी पुरवू शकतात. कीर्तनकार, प्रवचनकार हे प्रवचनात भगवंताचे गुणवर्णन रसाळ भाषेत वर्णन करून सांगतात. त्यांनी त्या बरोबर दर प्रवचनात १० मिनिटे मंदिरातील अस्वच्छतेमुळे होणारी मंदिरातील चैतन्य कसे घटत जाते, हे भाविकांच्या मनावर बिंबवले पाहिजे. त्यामुळे भाविक सजग होऊ शकतील. शाळेतील विद्यार्थी एनसीसी कॅम्पच्या अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवायला विविध ठिकाणी जातात. त्यांनाही मंदिर स्वच्छतेचे उद्दिष्ट देता येईल. मंदिरात त्रिकाळ पूजा करणाऱया पुरोहित वर्गानेही विश्वस्तांना मंदिर स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात आणून दिले पाहिजेल. काही मंदिराच्या पूजा, प्रसार सांस्कृतिक समित्या असतात तशी मंदिर स्वच्छता समितीसुद्धा असायला हवी. यज्ञ, होम, अग्निहोत्र यातून प्रज्वलित होणाऱया धुरातून वातावरणाची सूक्ष्मातून शुद्धी होत असते. मंदिर विश्वस्तांनी हे धार्मिक विधी केले असता वातावरणाची शुद्धता होण्यासह मंदिरातील चैतन्यातही वाढ होत राहील. मंदिरात खऱया भक्तांचीच कार्यकारिणी पाहिजे. त्यामुळे मंदिर स्वच्छता चांगली राखली जाते. शेगावचे गजानन महाराज मंदिराचे उदाहरण यासाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणाऱया संस्था आणि संघटना याकामी पुढाकार घेत असतात. त्याला भाविकांनी साथ दिली पाहिजे, तरच सर्व मंदिरे स्वच्छ होतील !