भांडण आमुचे लुटुपुटीचे!

अनेक वर्षांचा आजी आजोबांचा संसार… मुरलेल्या लोणच्यागत नातं… संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच… तशीच आजी आजोबांतही भांडणं होत असतीलच की… कशी असतात ही भांडणं… लुटुपुटीची… की…

मतभेदाने प्रेम संपत नाही

पती-पत्नी एकमेकांचा आधार असतात. कितीही वादळे आली तरी पाय घट्ट रोवून एकमेकांसोबत उभे राहतात. खरं तर संसार म्हटला की, भांडणं आलीच, पण ती तात्पुरता असतात. आपला हक्काचा माणूस असतो, त्याला ओरडू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीवर मतभेद होतात, पण त्याने आमच्यातले प्रेम संपत नाही. कारण आपल्या जोडीदाराइतके आपल्याला आयुष्यात कोणी समजून घेत नाही. काही वेळाने सगळं विसरून जातोच. अनेकदा भांडणातून आपण भावनांना मोकळी वाट करून देत असतो.बाळकृष्ण लाड, पनवेल

 

भांडणं प्रासंगिक, पण प्रेम मात्र कायमचे

जीवनाच्या उत्तरार्धात मुलांसोबत राहताना त्यांच्याकडून गृहीत धरले जाणे, प्रायव्हसीचा अभाव आणि काहीवेळा घ्यावी लागणारी नातवंडांची जबाबदारी, मतभेद अशा अनेक कारणांचा सहजीवनावर परिणाम होतोच. यातून उद्भवणारी भांडण ही प्रासंगिक असतात आणि प्रेम मात्र कायमस्वरूपी असते. राग शांत झाला की मग जोडीदारांची गाडी पुन्हा रुळावर येते. पाण्यावर काठी मारली की तेवढ्यापुरत ते पाणी बाजुला होत असली तरीही काही वेळाने ते पुन्हा एकसंध होत. प्रेमाचेही तसेच आहे. एवढ्या वर्षात एकमेकांची साथ असते, एकमेकांची चांगली ओळख असते. तेव्हा आता या वयात होतात ते फक्त वाद… राग शांत झाला की सहजच पुढे जगायला सुरुवात होते. – राजेश गाडे, कांदिवली

आताची भांडणं मनाला लावून घेत नाही

साठीनंतर पुन्हा एकदा बालपण सुरू होतं. मग या वयात आपल्या हक्काचा व्यक्तीच आपला मित्र असतो. या वयात आपल्याला खर्‍या सोबतीची गरज असते. आपलं कोणीतरी ऐकावं, आपल्याला काय वाटतं ते समजून घ्यावे अशी आपली अपेक्षा असते आणि हे सगळं नवर्‍याशिवाय कोणीच करणार! त्याची आपल्याला सवय झालेली असते. जरा नजरेआड गेले की, हुरहूर लागते. काळजी असते. पण आम्हाला एकमेकांचा स्वभाव माहीत असल्यामुळे ते माझ्याशी कधी बोलायला येतात याची मी आतुरतेने वाट पाहत असते आणि त्यांनाही माहीत असते की मी वाट पाहत असते. मग आमचा अबोला संपून जातो. उतारवयातील ही भांडणं लुटुपुटीची असतात. दोघेही हसण्यावारी घेतो. तेच आरोग्यासाठीही या वयात चांगले. – चित्रा चंद्रकांत भेकरे, ठाणे