थोडं खाजगी आयुष्य जगूया

409

>> अमित घोडेकर

अलीकडे समाजमाध्यमांमुळे आपले जगणे अत्यंत सार्वजनिक झाले आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण 24 तास, 365 दिवस जगाशी जोडले गेलो आहोत. काय खरेदी करतो, कधी झोपतो, कधी जेवतो, काय जेवतो, कुठे जेवतो हे सगळं आवडीने चव्हाट्यावर आणलं जातं आणि यातून मग घडतात अनेक गुन्हे, अपघात… आपले वैयक्तिक आयुष्य कसे खासगी राखावे…

गेल्या वर्षात सगळ्यात जास्त गुन्हे मोबाईलवरून झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजकाल आपण जवळपास सगळ्याच गोष्टी मोबाईलवरुन करत असतो. अगदी पिझ्झाची ऑर्डर असो, विमानाचे तिकीट असो किंवा बँकेचे व्यवहार असोत सगळं काही मोबाईलवरच. याच मोबाईलवरुन आपण फेसबुकही वापरत असतो आणि व्हॉट्सअपही… अगदी याच मोबाईलवरुन आपण आपले फोटो काढत असतो आणि तेच फोटो शेयरही करत असतो आणि याच मोबाईलचा वापर आपण अनेकदा प्रवास करण्यासाठीही करत असतो. असा हा मोबाईल जर चोरीला गेला आणि जर त्यात काहीही सुरक्षाप्रणाली लावली नसेल तर काय होऊ शकते याची फक्त कल्पनाच केलेली बरी. गेल्या काही दिवसात एक मोठ्या प्रकारचा गुन्हा घडतोय. तो म्हणजे सिम स्वॅप. आर्थिक गुन्हेगार अनेक लोकावर सोशल नेटवर्किंगचा वापर बेमालूमपणे करून नजर ठेवत असतात आणि त्यांची माहिती गोळा करतात. एकदा माहिती गोळा झाली की मोबाईल ऑपरेटरकडे जावून सिम कार्ड बदलण्यासाठी अर्ज केला जातो आणि जुन्या क्रमांकाचे नवीन सिम कार्ड मिळवले जाते. मग त्या व्यक्तीच्या बँक किंवा इंटरनेट खात्याचा पासवर्ड बदलणे किंवा नवीन डेबिट, क्रेडिट कार्डची मागणी करणे असे अनेक बदल केले जातात.

अशी होते मोबाईलवरून फसवणूक

सायबर चोरांना लोकांचे बँक डिटेल्स किंवा आधार, पॅन डिटेल्स आपणच वेगवेगळ्या सोशल वेबसाईट्सवर शेअर करतो. आपली खासगी माहिती बारीक नजर ठेवून सायबर चोर गोळा करत असतात. त्यानुसार बनावट कागदपत्रे तयार होतात. मग मोबाईल ऑपरेटर कंपनीशी संपर्क साधला जातो. तेथे मोबाईल सीम ब्लॉक करण्याची विनंती केली जाते. दिलेली कागदपत्रे खरी असल्यामुळे मोबाईल ऑपरेटर कंपनी आधीचे सीम ब्लॉक करून नवे सीम देते.

ऍप्स घेताना सावधान

सायबरचोर तर आता जास्तच हुशार झाले आहेत. त्यांनी लोकांना चुना लावायचा नवीनच प्रकार सुरू केला आहे. त्या प्रकाराला कुणीही बळी पडू शकतो. जर तुम्हाला घरातील लाइटचे बिल भरायचे आहे आणि तुमच्या मोबाइलवर एक मेसेज आला की तुमचे लाइट बिल भरा आणि 50 टक्के सूट मिळवा तर तुम्ही भरालच ना? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या मेसेजमधली मोबाइल ऍप्स इंस्टल करायची आहे, मग बरेच लोक मेसेजवर म्हटल्यानुसार असले मोबाइल ऍप्स इंस्टॉल करतात. मग एकदा का तुम्ही असल्या ऍप्सचा वापर केला की तुमचे पैसे आणि माहितीदेखील जाते. त्यामुळे कोणतेही ऍप इन्स्टॉल करताना विचार करून मगच त्यावर निर्णय घ्या. उगीचच आपली खाजगी माहिती कुठल्याच ऍपला पुरवू नका.

सावध राहा

  • संगणकाप्रमाणे मोबाइलवर ऍण्टी व्हायरस ऍप असलेच पाहिजे. मोबाइलला पासवर्ड किंवा बायोमॅट्रिक सुरक्षा लावा.
  • कोणताही गेम किंवा ऍप इंस्टॉल करण्यापूर्वी ते तुमच्या मोबाइलमधली कोणती माहिती गोळा करतात ते तपासून घ्या.
  • अनोळखी मेसेजवरील लिंकवर क्लीक करू नका. आपला मोबाइल अनोळखी माणसाला वापरायला देवू नका.
  • गरज नसताना लोकेशन सर्व्हिस बंदच करून ठेवा. कुणालाही आपले लोकेशन सर्व्हिस शेयर करू नका.
  • कोणतीही बँक फोन करून तुमचा पासवर्ड किंवा जन्मतारीख विचारत नाही. त्यामुळे अशी माहिती शेयर करू नका.
  • शेवटी एकच… आपल्या मोबाइलमधून झालेल्या कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती लगेच आपल्या बँकेला कळवा.

लेखक संगणकतज्ज्ञ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या