ठसा : मृणाल सेन

>>प्रशांत गौतम<<

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, संवेदनशील, वास्तववादी दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या निधनाने सत्यजित रे, हृत्विक घटक यांच्या परंपरेतील अखेरचा दुवा निखळला आहे. समांतर चित्रपटांचा आधारवड कोसळला आहे. खरे तर बंगाली भाषेतील समृद्ध वाङ्मयाने चित्रपटसृष्टीही भरून पावली आहे आणि एकूण दिग्दर्शनातील सर्वाधिक चित्रपट सेन यांनी बंगाली भाषेतच दिग्दर्शित केले आहेत. हिंदुस्थानची चित्रपटसृष्टी समृद्ध आणि संपन्न करण्यात मृणाल सेन यांचे अद्वितीय योगदान राहिले आहे. 1955 च्या सुमारास सेन यांनी ‘रातभोर’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. पहिली कृती देवाला अर्पण याप्रमाणेच घडले. कारण या पहिल्यावहिल्या निर्मितीस प्रतिसाद मिळाला नाही आणि कोणतीही प्रसिद्धी लाभली नाही. मृणाल सेन यांच्या जागी दुसरा-तिसरा कुणी दिग्दर्शक असता तर खचून गेला असता. चित्रपट निर्मितीच्या फंदात पडायचे नाही असेही ठरवले असते. पण सेन हार मानणारे नव्हते. पहिल्या अपयशातून भरारी घेत त्यांनी 1960 च्या सुमारास ‘बैशे श्रावण’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ याप्रमाणे सेन यांच्या अभिजात आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीच्या पाऊलखुणा जाणकारांच्या लक्षात आल्या. अर्थातच ‘बैशे श्रावण’ हा चित्रपट कमालीचा गाजला. सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करण्याची सेन यांची विलक्षण हातोटी होती. त्यामुळेच त्यांना हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील एका नव्या पर्वाचे जनकही मानतात ते खरेच आहे. 1969 च्या सुमारास सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भुवन शोम’ या चित्रपटामुळे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळवून दिली. याच चित्रपटासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी पहिला ‘व्हॉइस ओव्हर’ दिला होता. हा चित्रपटही रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. 1960 च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे त्यांना दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख प्राप्त झाली. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’ त्याचे दिग्दर्शन सेन यांनी केले आणि 2002 च्या सुमारास त्यांनी ‘आमार भुवन’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला. प्रारंभीच्या काळात जो उत्साह, चैतन्य होते तेच वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा होते. सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या 20 चित्रपटांना राष्ट्राrय आणि बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. या देदीप्यमान कारकीर्दीने बंगाली भाषेचाच नव्हे तर हिंदुस्थानच्या संपन्न कला परंपरेचा अभिजात दर्जा वाढवला. 14 मे 1923 च्या सुमारास फरीदपूर येथे जन्म झालेल्या सेन यांचा प्रवास वयाच्या 95 व्या वर्षी विसावला.

रातभोर (1955), नीले आकाशेर नीचे (1958), बैशे श्रावण (1960), पुनश्च (1961), अबाशेषे (1963), प्रतिनिधी (1964), आकाश कुसुम (1965), माहीर मनीषा (1966), भुवन शोम (1969), इंटरह्यू (1970), इच्छापुरण (1970), एक अधुरी कहानी (1970), कोलकाता (1971), पदातिक (1973), कोरस (1974), आकाश 3 री कथा (1977), परशुराम (1978), एक दिन प्रतिदिन (1979) अकलेर संथाने (1980), चलचित्र (1981), खारिज (1982), खंडहर (1983), तस्वीर अपनी अपनी (1984) जेनेसिस (1986),  दस साल बाद (1986), एक दिन अचानक (1986), महापृथ्वी (1991), अंतरीन (1993) आमार भुवन (2002) यासारखे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. सेन यांच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनास फारसे यश अथवा प्रतिसाद लाभला नसला तरी ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटास मात्र लोकाश्रय मिळाला. त्याचे कारण असे की, या चित्रपटात लोकांना हवे ते होते. लोकभावना, लोकप्रतिबिंब होते. वास्तवाचा संदर्भ हा साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून आला होता. ज्या चित्रपटाने बंगाली भाषेत ओळख मिळाली त्या ‘भुवन शोम’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा आवाजही होता आणि उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळय़े यांच्या प्रमुख भूमिकाही होत्या. हलकीफुलकी शैली असली तरी चित्रपटाच्या मूळ गाभ्याला अजिबात धक्का सेन यांनी लागू दिला नव्हता. म्हणूनच या चित्रपटास आंतरराष्ट्राrय पुरस्कार लाभला. एवढेच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या रसिकांनाही दर्जेदार, अभिजात वास्तववादी चित्रपटाचा परिचय झाला. मनोरंजनाची वेगळी वाटही या चित्रपटाने दाखवली.

हिंदी चित्रपटसृष्टीस सत्यजित रे, हृत्विक घटक आणि मृणाल सेन या त्रिकुटाने दिलेले योगदान मौलिक आणि महत्त्वपूर्ण ठरले. 70 ते 80 च्या दशकात समांतर चित्रपटांच्या चळवळीतही या त्रिकुटाचे महत्त्वपूर्ण योगदान समजले जाते. सेन यांनी तर बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात ठसठशीत योगदान दिले. त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांना सामाजिक अधिष्ठान तर होतेच, एवढेच नव्हे तर राजकीय विषयदेखील प्रभावीपणे मांडण्यात त्यांचे वेगळे कसब होते. त्याच अनुभवाचा लाभ त्यांना 1998 ते 2003 या काळात राज्यसभेचे सदस्य असतानाही झाला. साहित्यात सेन यांना रस होता आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्यासाठी प्रयोगशील दृष्टी होती. म्हणूनच त्यांच्याकडून एकापेक्षा एक सरस आणि श्रेष्ठ आशयघन चित्रपट निर्माण होऊ शकले. सेन यांनी आपल्या अनेक चित्रपटांतून गरिबी, दुष्काळ, प्रेम, मत्सर, आशा, भूक मांडली. याद्वारे त्यांनी जगभरात हिंदुस्थानातील दारिद्रय़ाचेच दर्शन घडवले अशीही टीका त्यांच्यावर झाली, पण त्यांनी टीकाकारांच्या प्रश्नांना फार महत्त्व दिले नाही. जगण्याचे प्रश्न त्यांनी कलात्मक पद्धतीने जगासमोर आणले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनातून मानवी जीवनाचे परिपक्व दर्शन घडवले. कारण चित्रपटांच्या कथा हा मानवी जीवनाच्याच वेध घेणाऱ्या होत्या. जगण्याची उत्सुकता होती. त्यात मनाची संकुचित प्रवृत्ती नव्हती. 1940 च्या दशकात बंगालमध्येही स्वातंत्र्य, फाळणी यांचे वातावरण होते, याच काळात तरुणपणात सेन यांच्यावर रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, शरदचंद्र, कार्ल मार्क्स, चेकॉव्ह यांच्या साहित्याचा प्रभाव होता. सेन यांच्या या भरीव योगदानाचा राष्ट्राrय-आंतरराष्ट्राrय पुरस्काराने सन्मान झाला आणि केंद्र सरकारने 1981 च्या सुमारास ‘पद्मभूषण’ या नागरी सन्मानाने त्यांचा गौरव केला. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मायबाप रसिकांवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे ‘मृणाल पर्व’ आता इतिहासजमा झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या