आत्याबाईला मिशा असत्या तर…

11


>> दि. मा. प्रभुदेसाई 

कुप्रसिद्धांचे  उदात्तीकरण करण्याची हुक्की केव्हा केव्हा काहीजणांना येत असते. ‘‘जीना पंतप्रधान झाले असते तर हिंदुस्थानची फाळणी झाली नसती’’ हे दलाई लामांचे मतप्रदर्शन त्याच प्रकारचे आहे असे म्हणावेसे वाटते. जीना धर्मनिरपेक्ष होते. ते अभक्षभक्षण, अपेयपान करत, ते इस्लामचे नियम पाळीत नसत वगैरे भलामण यापूर्वीही झालेली आहे आणि त्यावरूनच हिंदुस्थानची फाळणी झाली नसती असा निष्कर्ष काढला जातो. काही वर्षांपूर्वी त्यांचा मुंबईतील बंगला स्मारक म्हणून जतन करावा यासाठीही काहीजणांनी गळा काढला होता.

खरे म्हणजे एखाद्या धर्मपीठाचार्यांनी परागंदा अवस्थेत राजकारणातील अशा वादग्रस्त विषयावर मतप्रदर्शन करावे की नाही, हाच एक प्रश्न आहे. तत्कालीन राजकारणात आपल्याला महत्त्व मिळत नाही हे लक्षात आल्यावर ते वाढवण्यासाठी पाकिस्तानचे भूत जीनांनीच उभे केले आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात वेळोवेळी खोडा घातला हा इतिहास आहे. यावरून स्वार्थासाठी त्यांनी काहीही केले असते असे म्हणण्यालाच जास्त वाव आहे. समजा ते पंतप्रधान झाले असते आणि हिंदुस्थानची फाळणी होऊ नये असे त्यांना वाटले असते तरीही त्या वेळच्या पाकिस्तानची आस असणार्‍या इतरांनी त्यांना तसे वागू दिले असते काय? या प्रश्नाचाही विचार व्हायला हवा. त्या वेळच्या परिस्थितीचाही विचार व्हायला हवा. लढ्याला कंटाळलेले काँग्रेस नेते कोणतीही तडजोड करून स्वातंत्र्य मिळवायला उतावीळ झाले होते असेही म्हटले जाते. यावरून जीना पंतप्रधान झाले असते तर फाळणी झाली नसती असे म्हणण्यात काही तथ्य नाही. हा प्रकार आत्याबाईला मिशा असत्या तर अशातला आहे. मात्र एका वेगळ्याच अर्थाने लामांचे म्हणणे खरे ठरण्याची शक्यता होती. ती म्हणजे फाळणी न होता पूर्ण हिंदुस्थानच पाकिस्तान झाला असता. सध्याच्या राजकीय पक्षांची धोरणे पाहता पुढील काही वर्षांत तसेही होऊ शकेल, असे म्हणण्यास बराच वाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या