‘एस कॉर्नर’ची दहशत


>> गजानन चेणगे

पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिह्यात असलेल्या खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस कॉर्नर’ची दहशत गेली अठरा वर्षे प्रवाशांच्या मनावर आहे. या कॉर्नरने आजवर शंभरावर निष्पाप जिवांचे बळी घेतले आहेत व शेकडोंना कायमचे जायबंदी केले आहे. प्रत्येक वेळी अपघात झाला की या अपघाती वळणाबद्दल चर्चा होते आणि नंतर पुन्हा सगळे शांत होते.

वीस वर्षापूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा दुपदरी होता. पण दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व त्याबरोबरीने वाढणारी वाहने यामुळे रस्ते वाहतूक अधिक जोखमीची होत गेली. वाहनसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांचा विकास न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूककोंडीची समस्या उग्र स्वरूप धारण करत गेली. यातून रस्त्यांच्या विकासाची आवश्यकता प्रकर्षाने भासू लागली.

पुणे ते सातारादरम्यान सातारा जिह्यात असलेल्या खंबाटकी घाटातून पूर्वी दुहेरी वाहतुक सुरू होती. त्यामुळे अधूनमधून गंभीर अपघातांची मालिका सुरू असायची. काही वेळेस कमीअधिक प्रमाणात जीवितहानी होत होती. कधी कधी वाहतूककोंडीमुळे घाट जाम होण्याच्या घटना घडत असत. एकेक दिवस ही कोंडी फुटत नसे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत असे. यावर उपाय म्हणून वीस वर्षांपूर्वी तत्कालीन युती शासनाच्या काळात खंबाटकीतून सातारा बाजूकडून पुण्याकडे जाणाऱया वाहनांसाठी नवीन बोगद्याला मंजुरी मिळाली. युद्धपातळीवर बोगद्याचे व मार्गाचे काम पूर्ण करण्यात येऊन बोगदा व मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. २००१ मध्ये या मार्गावरून वाहतूकही सुरू झाली. त्यामुळे घाटावरील ताण कमी होण्यास मदत झाली. वाहतूककोंडीची समस्या कमी झाली. वाहतुकीला वेग आला. पण नंतरच्या काळात हाच वेग जीवघेणा ठरू लागला. अतिवेगाचे नवे संकट त्या ठिकाणी घोंगावू लागले. पुण्याकडे जाताना बोगदा ओलांडल्यानंतर जवळपास खंडाळय़ापर्यंत तीक्र उतार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांना वेग राहतो. पुन्हा याच उतारावर अत्यंत धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराचे वळण आहे आणि तेच वाहनचालक तसेच प्रवाशांचे कर्दनकाळ ठरले आहे. उतारावरून प्रचंड वेगात येणाऱया वाहनाला चालक नियंत्रित ठेवू शकत नाही. साहजिकच त्याचा ताबा सुटून प्राणघातक अपघात होतात. वर्षातील बाराही महिने या वळणावर अपघातांची मालिका सुरू असते. आजवर या ‘ब्लॅक स्पॉट’ला अत्यंत भीषण असे ११६ अपघात झाले आहेत. त्यामध्ये शंभरावर जण प्राणास मुकले असून २७३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

आताही १० एप्रिलच्या पहाटे एस कॉर्नरवर झालेला अपघात हा आजवरचा सर्वाधिक मोठा अपघात ठरला. कर्नाटकातील विजापूर जिह्यातून शिरवळला मजुरांना घेऊन चाललेला आयशर टेंपो या ठिकाणी भयानकरीत्या उलटून त्यात १८ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाले. अशा प्रत्येक भीषण अपघातानंतर हा ‘एस कॉर्नर’ चर्चेत येतो. लोकांचा उद्वेग व्यक्त होतो. या वळणावर उपाययोजनांवर गरमागरम चर्चा होते. जसजशी घटना जुनी होत जाते, तशी ती पुन्हा विस्मरणात जाते. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसल्याने एस कॉर्नरवरील मृत्युसत्र थांबत नाही. हे वळण कर्दनकाळ बनून आपले अक्राळविक्राळ रूप दाखवत आहे. सातत्याने या मार्गावरून प्रवास करणाऱयांना या वळणाच्या भयानकतेविषयी कल्पना असल्याने ते येथून जाताना काळजी घेऊन, पण दहशतीच्या छायेतून जातात. तथापि, ज्यांना या वळणाविषयी फारसे माहीत नाही, ते निष्पाप जीव येथे नाहक आपले प्राण गमावून बसतात.

वळणाची बांधणी सदोष
एस वळणाची बांधणी सदोष झाल्याचे पुनःपुन्हा सिद्ध झाले आहे. या पापाला जबाबदार कोण, या ठिकाणच्या मृत्युसत्राला जबाबदार कोण या प्रश्नांची उत्तरे अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. सातारा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आजवर असंख्य पत्रे लिहून अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे हे धोकादायक वळण काढून रस्ता सरळ करण्याची विनंती केली. ग्रामस्थ, विविध पक्ष- संघटना यांनीही यासाठी सतत आग्रही भूमिका घेतली. आंदोलने, उपोषणे केली. मात्र महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी कधीच हा विषय गांभीर्याने घेतला नाही. अत्यंत जुजबी उपाययोजना वगळता या ठिकाणी काहीही ठोस झाले नाही. आता परवाच्या भीषण दुर्घटनेनंतरही मूळ दुखणे तसेच ठेवून किरकोळ उपाययोजनांची मलमपट्टी सुरू आहे. हे अतिशय संतापजनक आहे.

जिल्हा प्रशासनाने याबाबत अनेकदा संबंधित विभागांची बैठक बोलावून ‘एस कॉर्नर’चे गांभीर्य ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. प्राधिकरणाने २०१५ मध्ये हे वळण काढून रस्ता सरळ करण्याचा निर्णय घेतला. प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाने तसा प्रस्ताव तयार करून दिल्लीला वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. मात्र सरकारी कामाला गती नाही. ही कामे लाल फितीत अडकून वर्षानुवर्षे धूळ खात पडतात. तोच न्याय या कामाच्या वाटय़ाला आलेला दिसतो आहे.

उत्तर पश्चिम अटलांटिक महासागरातील बर्मुडा ट्रँगलच्या परिसरात गेलेली प्रचंड मोठी जहाजे, विमाने गायब होतात अशा रहस्यकथा आपण आजवर अनेकदा वाचत, ऐकत आलो. अशा ठिकाणाबद्दल लोकांच्या मनात अनामिक भीतीचे भूत घर करून बसते. रहस्य वाटाव्यात अशा घटना घडतात, तेव्हा हे भय डोके वर काढते. तेथील घटनांवर आपले नियंत्रण नाही, पण खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस कॉर्नर’वर होणारे अपघात तर मानवनिर्मितच आहेत. यात कसलेही रहस्य दडलेले नाही. मात्र तरीही अपघात, त्यात जाणारे हकनाक बळी, न होणारी उपाययोजना, ढिम्मच राहिलेली संबंधित शासकीय यंत्रणा हा एक ‘यक्षप्रश्न’ लोकांना पडला आहे. तूर्त तो अनुत्तरीत असला तरी आवश्यक उपाययोजना करून त्याचे उत्तर देणे सरकारला सहजशक्य आहे. मात्र ते मिळत नाही तोपर्यंत ‘एस कॉर्नर’ नावाच्या दहशतीच्या सावटाखालीच वाहनचालकांना तेथून वाहने चालवावी लागणार आहेत.