लेख : एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास

>> गणेश हिरवे

आपल्या देशात अगदी प्रारंभापासूनच एकत्र कुटुंब पद्धती राहिली आहे. आज एकविसाव्या शतकात वेगाने जग बदलत आहे व तेवढ्याच वेगाने एकत्र कुटुंब पद्धतीही विस्कळीत होत चालली आहे. सध्याच्या परिस्थितीत एका व्यक्तीचे विचार दुसर्‍या व्यक्तीशी जुळत नाहीत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक जण आपल्या मर्जीनुसार काम करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या वातावरणात वावरल्यामुळे कधी कोणत्याही गोष्टींची एकत्र सांगड घातली जात नाही. त्यामुळे आतल्या आत मनाची घुसमट होत राहते व विनाकारण कुटुंबात खटके उडत राहतात.

कित्येक घरांमध्ये सासू-सुनांचा व्यवहार एकसारखा नसतो. सासू म्हणजे सारखी सूचना करणारी व्यक्ती व सून म्हणजे सूचना न ऐकणारी व्यक्ती असे जणू समीकरणच बनले आहे. जास्त पगार घेणार्‍याच्या बाबतीत अधिक अदबीने वागले जाते व कमी मिळकत असणार्‍याला वारंवार टाळले जाते किंवा नाहक टोमणे मारले जातात. ही माणसे मनातल्या मनात कुढत राहतात व अशा कारणांमुळे एकत्र कुटुंब तुटण्याची, एकमेकांपासून फारकत, विभक्त होण्याची दाट शक्यता निर्माण होते. विनाकारण गर्व व अहंकार आपल्या परिवारालाच नव्हे तर सर्वांनाच त्रासदायक ठरतो. एकत्र कुटुंब पद्धतीत एकदुसर्‍याचे बघून अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढते. जर एखाद्या भावाने एखादी वस्तू खरेदी करून आणली असेल तर दुसराही कारण नसताना तीच वस्तू खरेदी करतो. तेव्हा अशा छोट्यामोठय़ा गोष्टींनी आर्थिक बाजू ढासळते व पुन्हा वादाला तोंड फुटते. या गोष्टींखेरीज अन्य गोष्टीही एकत्र कुटुंब पद्धतीला घातक ठरतात. इकडची चहाडी तिकडे केल्याने कित्येक गोष्टी उघड होतात. एकदा तुटलेला, दुरावलेला माणूस पुन्हा नाती जोडण्यास, एकत्र येण्यास वेळ लागतो. तेव्हा आजच्या यांत्रिक युगात हे नातेसंबंध जपणे आणखीच अवघड बनत चालले आहेत.