मुद्दा : विकास प्रकल्प आणि पर्यावरण!

210

>> पुरुषोत्तम कृ आठलेकर

आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करत असतो. केवळ एका दिवसाचे महत्त्व न जपता आपण आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य व सुरक्षा या दृष्टिकोनातून पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल आणि वाढते प्रदूषण याचे दूरवर दुष्परिणाम होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नैसर्गिक संपतीचा होत असलेला विनाश, वाढते शहरीकरण, रासायनिक उद्योग ही जरी प्रामुख्याने करणे असली तरी तंत्रद्यानात होत असलेले बदल व अत्याधुनिक सेवा-सुविधांच्या माध्यमातून आपण समतोल राखून विकास साधू शकतो. निसर्गाने आपल्याला हवा, पाणी, जमीन या तीन  जीवनावश्यक गोष्ठाr दिल्या आहेत आणि त्या पूर्णपणे मोफत दिल्या आहेत. त्याचा वापर उपयुक्तता याचा विचार करून आपण आपल्या भविष्यासाठी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याच बरोबरीने ज्या निसर्गाने आपल्याला ही जी काही संपत्ती दिली आहे त्याचा नाश होता कामा नये ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विकास प्रकल्पाचा विचार करतो तेव्हा उपलब्ध जमिनीमधून तो साधावयाचा असतो. कधी कधी विकास प्रकल्पासाठी जमिनी हस्तांतरित कराव्या लागत असतात. अशावेळी योग्य सहकार्याच्या भूमिकेतून विकास प्रकल्पामध्ये अडथळा येणार नाही अशी रास्त भूमिका घेणे गरजेचे आहे. आज बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. उत्पादन क्षेत्रेसुद्धा कमी होत चालली आहेत. केवळ सेवा क्षेत्रे विस्तारित चालली आहेत. वाढते आधुनिकीकरण आणि दिवसागणिक तंत्रज्ञानात होत चाललेले बदल यामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा कमी होत आहेत. अशा वेळी राष्ट्रीय विकास प्रकल्पाना प्राधान्य मिळणे आवश्यक आहेत विकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला पूरक असे लघु उद्योगांनासुद्धा चालना मिळते. अनेकांना रोजगार मिळतो, कुटुंब व्यवस्था सुखी-समाधानी होते, राज्याचा महसूल वाढतो, देशाच्या तिजोरीत भर पडते सुदृढ़ आर्थिक व्यवस्थेतून नवीन विकास प्रकल्पांचा नियोजन होऊ शकते. परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे विकास प्रकल्प रद्द होऊ लागले आहेत हे देशाला परवडणारे नाही. याचा अंतर्मुख आपण सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. प्रदूषणमुक्त लघु व मोठय़ा उद्योगांना चालना मिळाली पाहिजे. रासायनिक उद्योग प्रकल्पाच्या बाबतीत सुरक्षा व आरोग्य यांना प्राधान्य मिळालेच पाहिजे. त्याबाबतील नियम, अटी याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. विकास, प्रकल्प हे झालेच पाहिजे, पण त्याचबरोबरीने पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याचासुद्धा विचार आवर्जून केला गेला पाहिजे. इतकेच नव्हे तर अगदी छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत आपल्याला प्रदूषण कसे टाळता येईल याचा प्रत्येकाने विचार करण्याची खरी गरज आहे. तसा विचार आचार अमलात आणला गेला तरच निसर्गाने दिलेल्या या नैसर्गिक संपतीच्या जोरावर आपण आपले आयुष्य अधिक समृद्ध करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या