ठसा : महान ढोलकी वादक पंडित विधाते

14

>>संजय क्षीरसागर

अष्टपैलू ढोलकीवादक पंडित विधाते यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने हा लेख.

संगीतप्रधान मराठी चित्रपटांतील गाण्यांसाठी अफलातून ढोलकी वाजविणारे महान ढोलकीवादक पंडित विधाते यांनी वसंत पवार, विश्वनाथ मोरे, लक्ष्मण वेरळेकर, बाळ पळसुले, प्रभाकर जोग, पांडुरंग दीक्षित, राम लक्ष्मण, अनिल अरुण, ऋषिकराज अशा अनेक  संगीतकारांच्या गाण्यांसाठी ढोलकी वाजविली. दिग्गज संगीतकार राम कदम यांच्या तर जवळजवळ सर्वच गाण्यांसाठी पंडितजींनी ढोलकी वाजविली. पंडित विधाते हे राम कदम यांचे अत्यंत लाडके असे ढोलकीवादक होते. शाहीर दादा कोंडके सादर करीत असलेल्या वसंत सबनीस लिखित ‘छपरी पलंगाचा वग’ (विच्छा माझी पुरी करा) या इतिहास घडविलेल्या वगनाटय़ाला पंडित विधाते यांच्याच ढोलकीचे चार चांद लागले होते, तर दादू इंदुरीकर यांच्या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या ‘गाढवाचं लग्न’ या तुफान लोकनृत्य वगनाटय़ाच्या प्रत्येक प्रयोगावेळी फक्त आणि फक्त पंडित विधाते यांचीच ढोलकी विद्युल्लतेसारखी कडाडली होती. निळू फुले यांनी अमृत गोरे यांची कथा-कल्पना असलेल्या ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या 70 एम.एम. वगनाटय़ाचे अगणित प्रयोग केले. त्यावेळी रसिकांनी हे वगनाटय़ अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या वगनाटय़ामध्येदेखील पंडित विधाते यांचीच ढोलकी कडाडली होती. पंडितजी व निळू फुले यांची खूप घनिष्ठ मैत्री होती.

पंडित विधाते यांनी काही हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठीही ढोलकी वाजविली आहे. ‘पत्थर के सनम’ या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेल्या हिंदी चित्रपटातील ‘कोई नहीं है, फिर भी मुझ को ना जाने किस का इंतजार’ या गाण्यात वहिदा रेहमान थिरकली ती पंडितजींच्याच ढोलकीच्या ठेक्यावर. ‘पत्थर के फूल’ (संगीतकार – राम लक्ष्मण) चित्रपटातील ‘कभी तू छलिया लगता है’ या गाण्यामध्ये सलमान खान व रविना टंडन यांनी जी धमाल केली आहे ती पंडित विधाते यांच्याच ढोलकीच्या साथीने. ‘नगिना’ चित्रपटातले अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेले व लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा’ हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यामध्ये श्रीदेवीने बिजलीसार कडाडणाऱ्या ढोलकीवर बेभान होऊन नृत्य केले आहे. तीही ढोलकी पंडित विधाते यांनीच वाजविली आहे. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या इतिहास घडविलेल्या ‘पिंजरा’मधील सर्वच गाण्यांमध्ये पंडित विधाते यांच्या ढोलकीचे योगदान महत्त्वाचे म्हणावे लागेल. पिंजरा’तीलच लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’ या शास्त्राrय संगीतावर आधारित असलेल्या ‘माइलस्टोन’ गाण्यामध्ये पंडित विधाते यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सुमधुर बासरीच्या साथीने वाजविलेली क्लासिकल ढोलकी म्हणजे एक चमत्कार आहे. सर्व प्रकारचे ताल ते ढोलकीवर लीलया वाजवायचे. भक्तिगीते, भावगीते, भजने, अभंग, लोकगीते, कोळीगीते, लावण्या, कवाल्या, रागदारीवर आधारित व पाश्चिमात्य सुरावटीमध्ये बांधलेली गाणी अशा सर्व प्रकारच्या गाण्यांसाठी पंडित विधाते यांनी सफाईदारपणे ढोलकी वाजविली आहे. दुर्दैवाने पंडितजींचे छायाचित्र कोठेच उपलब्ध नाही; परंतु त्यांना आपण ‘पिंजरा’ चित्रपटामध्ये पाहू शकतो. व्ही. शांताराम यांनी पंडितजींना ‘पिंजरा’मध्ये ढोलकीपटूची भूमिका करायला लावली होती. ‘पिंजरा’मध्ये आपल्या वेळोवेळी मंचावर जे ढोलकीपटू ढोलकी वाजविताना दिसतात तेच विधाते आहेत. कलाक्षेत्रातील राजकारणापासून ते कायम अलिप्त राहिले. एखादे गाणे चांगले जमून आल्यावर त्या गाण्याला उद्देशून ते ‘काय पाखरू आहे…’ असे विनोदाने म्हणत व रेकॉर्डिंग स्टुडिओत हास्यकल्लोळ उडे. असा हा महान कलाकार पिंपरी-चिंचवड नवनगरपालिकाही झाली नव्हती तेव्हापासून सांगवी गावात वास्तव्यास होता. हा अवलिया कलाकार अडीच दशकांपूर्वी ढोलकीला अबोल करून कायमचा निघून गेला.