ठसा : कृष्णा सोबती

4

>> प्रशांत गौतम 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांच्या निधनाने स्त्रियांचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान सशक्तपणे मांडणारी बंडखोर लेखिका काळाच्या पडद्याआड गेली आहे. 1950च्या सुमारास ‘कहानी लामा’पासून सोबती यांनी आपल्या साहित्य लेखनास प्रारंभ केला. तेव्हापासून अखंड सुरू असलेला प्रवास वयाच्या 94 व्या वर्षी थांबला. 18 फेब्रुवारी 1925 साली तत्कालीन गुजरात राज्यात आणि आताच्या पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीनंतर सोबती यांचे जन्मगाव असलेल्या गुजरात प्रांताचा काही भाग पाकिस्तानात गेला. देश विभाजनानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या.

1950 साली लेखनास प्रारंभ केल्यानंतर पुढील काळात वैविध्यपूर्ण, आशयसंपन्न आणि दर्जेदार साहित्य निर्मिती केली. खास करून ‘मित्रो मरजानी’, ‘डार से बिछडी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’, ‘दिलो दानिश’, ‘समय सरगम’ आदी साहित्यनिर्मिती केली. यातील ‘समय सरगम’ आणि ‘जिंदगीनामा’ या साहित्यकृती आजही हिंदी साहित्यात अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जातात. सोबती यांच्या साहित्यामधून स्त्रियांचे भावविश्व, स्त्रियांची वेदना, त्यांचा स्वाभिमान सशक्तपणे, प्रभावीपणे मांडण्यात आला. अशा प्रकारचे लेखन करताना संवेदनशीलता आणि सजगता असली पाहिजे, ती त्यांच्यात होतीच. सोबती ज्या काळात हिंदी साहित्यात दमदार लेखन करीत होत्या, त्या काळात पुरुष लेखकांचे जास्त वर्चस्व होते. अशा काळात मध्यमवर्गीय स्त्रियांविषयी लेखन करणे हे धाडसच होते. जेव्हा स्त्रियांच्या साहित्यास फार स्थान नव्हते, अशा प्रतिकूल काळात कृष्णा सोबती यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. नुसती सुरुवात करून त्या थांबल्या नाहीत, तर एक बंडखोर लेखिका म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हिंदी साहित्यात महादेवी वर्मा, सुभद्राकुमारी चौहान यांच्यानंतर कृष्णा सोबती यांनी आपली लेखनमुद्रा उमटवली. हिंदी साहित्य क्षेत्रात कमलेश्वर, मोहन राकेश, भीष्म साहनी, निर्मल वर्मा यांच्यासारखे एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक त्यांच्या साहित्य लेखनाने गाजत असणार्‍या काळातही कृष्णा सोबती यांनी ठसठशीत लेखन करून वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले. एकाचवेळी स्त्रियांचे भावविश्व संवेदनशील मनाने टिपणे आणि त्याचबरोबर दुसर्‍या बाजूस साहित्य लेखनातून बंडखोर भूमिका घेणे, ही बाब नव्या पिढीत लेखन करणार्‍यांसाठी अनुकरणीय होती. सोबती यांचा आदर्श घेत हिंदी साहित्यातील कितीतरी नव्या प्रतिभावंत लेखकांनी आपल्या साहित्य लेखनासाठी नुसता आदर्श घेतला नाही, तर साहित्य लेखनातून बुलंद आवाज अभिव्यक्त केला.

सोबती यांच्या ‘जिंदगीनामा’ या साहित्यकृतीचा 1980 साली साहित्य अकादमीने सन्मान झाला, तर 2017च्या सुमारास एकूणच हिंदी साहित्यातील योगदानासाठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त झाला. सोबती यांनी कथा, दीर्घकथा-कादंबरी या साहित्य प्रकारात स्त्री ओळख आणि लैंगिकता या अनुषंगाने लेखन केले. ते लेखन विलक्षण गाजले. लेखनावर चर्चाही झडल्या.

कृष्णा सोबती यांचे ‘छन्ना’ हे पुस्तक जानेवारी महिन्याच्या 11 तारखेस जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित झाले. हे पुस्तक म्हणजे साठ वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली पहिली कादंबरी होय. त्या काळात प्रसिद्ध न झालेली कादंबरी प्रदीर्घ कालखंडानंतर वाचकांच्या भेटीस आली. कृष्णा सोबती यांनी कथा, दीर्घकथा, कादंबरी, कविता या वाङ्मयप्रकारातून लेखन केले. डार से बिछडी (1958), मित्रो मरजानी (1967), यारों के यार (1968), तीन पहाड (1968), बादलों के घेरे (दीर्घ कादंबरी) (1980), ऐ लडकी (1991), हे कथा-दीर्घ कथासंग्रह, त्याचप्रमाणे सूरजमुखी अंधेरे के (1972), जिंदगीनामा (1979), दिलो दानिश (1993), समय सरगम (2000) या कादंबर्‍या हिंदी साहित्यात वाचकप्रिय आहेत. तसेच हम हशमत (तीन भाग), सोबती का सोहबत, शब्दों के आलोक मे सोबती वैद संवाद, मुक्तिबोध : एक व्यक्तित्त्व सही, लेखक का जनतंत्र, मार्फत दिल्ली, बुद्ध का कमंडल : लद्दाख यासारखी साहित्यसंपदाही सोबती यांच्या नावावर आहे.

हिंदी साहित्यात लेखनासाठी मौलिक योगदान दिल्याबद्दल सोबती यांचा साहित्य अकादमी, ज्ञानपीठसह कच्छ चुडामणी, शिरोमणी, शलाका, हिंदी साहित्य अकादमी, साहित्य अकादमी अशा पुरस्कारांनी गौरव झाला. केंद्र शासनाने सोबती यांना पद्मभूषण पुरस्कारही देऊ केला होता. मात्र सोबती यांनी त्यास नकार कळवला होता. सोबती यांच्या निधनाने हिंदी साहित्यातील क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.