डॉ. प्रकाश वझे

>>जयेंद्र लोंढे<<

व्यवसायाने डॉक्टर, पण त्यासोबत क्रीडा क्षेत्रावरही निस्सीम प्रेम. या दोन्ही गोष्टी प्रामाणिकपणे सांभाळताना करावी लागणारी कसरत कठीण असली तरीही प्रत्येक दिवशी तोच उत्साह अन् तोच जोश, चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नाही, अशी ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ. प्रकाश वझे यांची क्रीडाजगतात खरी ओळख. मात्र ठाण्यातील दुर्दैवी अपघातात त्यांची अकाली एक्झिट झाली. शालेय मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत करणारे एक व्यक्तिमत्त्व अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मुंबईच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली.  सुरुवातीच्या काळात लालबाग परिसरात वास्तव्य करणारे प्रकाश वझे ७०च्या दशकानंतर मुलुंडमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले. तेथूनच त्यांनी आपल्या क्रीडाभक्तीला बहर आणला. घर व क्लिनिक हे एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांना दोन्ही आवडत्या बाबींवर जातीने लक्ष देता आले. विशेष म्हणजे त्यांचे ज्या गोष्टींवर प्रेम होते त्या दोन्ही माणसाच्या शारीरिक व मानसिक हिताच्याच. एकीकडे डॉक्टरकीच्या पेशाने ते जनतेला आजारापासून दूर करायचे तर दुसरीकडे खेळांद्वारे बुद्धिमत्ता व फिटनेसचे धडे द्यायचे. म्हणूनच जीवनाचे सार साध्यासोप्या भाषेत सांगणाऱ्या या व्यक्तीचे निधन काळजात चर्र करून गेले. डॉ. वझे हे क्रीडा संघटक तर होतेच, पण उत्तम आयोजकही होते. वर्षाकाठी बुद्धिबळाच्या सहा-सहा स्पर्धांचे आयोजन आपला डॉक्टरकीचा व्याप आणि अंगावर घेतलेल्या इतर कामांचा भार सांभाळून करणे हे सोपे निश्चितच नव्हते. मात्र खेळ हा रोमारोमातच मुरलेला असल्याने डॉक्टर ते शिवधनुष्य लीलया पेलायचे. महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करणारे, शालेय मुलांमध्ये बुद्धिबळाची गोडी निर्माण करणारे, वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, बॅडमिंटन, डबल विकेट क्रिकेट या खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेणारे खरे क्रीडाप्रेमी हीच मागील काही वर्षांमधील प्रकाश वझे यांची खरी मिळकत होती. अर्थात त्यांचे क्रिकेटवरही तेवढेच प्रेम होते. ते चांगले क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाजी करणे त्यांना आवडत असे. मात्र ते रमले पंचगिरीत म्हणजे अंपायरिंगमध्ये. बीसीसीआयला चांगले पंच मिळावेत म्हणून त्यांनी अंपायरिंगसाठीही खास मोफत शिबिरे घेण्यास सुरुवात केली होती. यावरूनही त्यांची खेळाप्रति असलेली दूरदृष्टी लक्षात येते. शिवाय ते फक्त त्यावरच थांबले नाहीत. कांगा लायब्ररीची मुलुंड शाखा त्यांनी त्यांच्या दवाखान्यातच सुरू केली. हे वाचनालय असंख्य क्रीडाविषयक पुस्तकांनी भरलेले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अंपायरिंगमधील सुवर्ण पदकानेही त्यांना गौरवण्यात आले होते. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पंच म्हणूनही त्यांनी काम केले होते. क्रीडा क्षेत्राबाबतची त्यांची ओढ खरोखरच वाखाणण्याजोगीच होती. अर्थात त्यांची ओढ जास्त होती ती बुद्धिबळाकडे. त्यातूनच शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन ते करीत असत. मुख्य म्हणजे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यामागे व्यावसायिक हेतू कमी आणि निखळ क्रीडाप्रेम अधिक असे, हे डॉ. वझे यांना जवळून ओळखणारे सगळेच मान्य करतील. मुलुंडला त्यांच्याशी अधूनमधून भेट व्हायची. एरव्ही फोनपर्यंतच मर्यादित असणारा आमचा संपर्क वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांची दैनंदिनी जवळून न्याहाळता आली. त्यांचे क्लिनिकही स्वच्छ व नीटनीटके असे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रात वैद्यकीय व्यवसाय करीत असताना, पेशंटच्या घरी व्हिजिट देताना त्यांच्यामध्ये असलेल्या माणुसकीचा प्रत्यय येत असे. प्रकाश वझे यांची लक्षणीय बाब म्हणजे वेळ-काळ न पाहता कोणतेही काम करण्यासाठी ते सदैव तत्पर असत. नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हताच. कमालीचा आत्मविश्वास असलेल्या या क्रीडाप्रेमी माणसावर नियतीने अचानक घाला घातला. एका चांगल्या संघटकाला राज्यातील क्रीडाक्षेत्राने गमावले आहे.