ठसा : डॉ. अनिल अवचट

4

>>प्रशांत गौतम<<

पुस्तकांचे गाव’ अशी ओळख असलेल्या भिल्लार येथे 28 वे अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलन 18 ते 20 जानेवारीदरम्यान होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट यांची यापूर्वीच निवड झाली आहे. लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रकार अशी त्यांची बहुआयामी ओळख सांगता येईल. बालसाहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भरीव योगदानाबद्दल त्यांचा साहित्य अकादमीच्या बालसाहित्य या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानही झाला आहे. शिवाय राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे सलग तीन वर्षे पुरस्कार प्राप्त करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे. विविध लेखन प्रकार हाताळत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून रिर्पोताज पद्धतीने लेखन करून ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचे लेखन जसे बहुआयामी आहे, तसेच त्यांचे कार्यही. एकूणच त्यांच्या वाटचाटीच्या संदर्भात सांगायचे तर लेखक आणि कार्यकर्ता या क्षेत्राची समांतर वाटचाल आहे. त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना विशेष भावते. डॉ. अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी व्यावसायिक पत्रकारितेस त्यांनी नेहमीच नकार दिला. समाजात असलेली गरिबी, अन्याय, भ्रष्टाचाराचे बळी ठरलेल्यांसाठी, जनतेच्या हितासाठीच त्यांची पत्रकारितेची लेखणी झिजवली. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांचे प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. केवळ सामाजिक भाष्य करणारे लेखनच केले नाही, तर विविध प्रश्नांवर लढा देत आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. म्हणूनच त्यांचे लेखन सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. ते यासाठी महत्त्वाचे आहे की, त्यांनी सर्व सामाजिक लढय़ामागील अनेक चांगल्या बाबी सातत्याने अधोरेखित केल्या आहेत. 1948 साली पुणे जिल्हय़ातील ओतुर येथे जन्म झालेल्या अवचट यानी बालपणापासून विविध छंद जोपासले. पुढील काळात वाचन, लेखन या आवडीच्या छंदाने त्यांची वाटचाल विविधांगी होत गेली. एमबीबीएसची पदवी त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीरीत्या संपादन केली आणि विद्यार्थीदशेत असल्यापासून अवचट यांनी विविध चळवळीत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. म्हणजेच लेखक आणि कार्यकर्ता या क्षेत्राचीही वाटचाल याच कालावधीत सुरू झाली. 1969 च्या सुमारास अवचट यांचे ‘पुणिऱ्या’ हे पुस्तक प्रकाशित झाले, तेव्हापासूनच त्यांनी सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून विविध ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी लेखन केले. विविध वृत्तपत्रे, वाङ्मयीन नियतकालिकांत केलेले विविध लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले. अमेरिका, अक्षरांशी गप्पा, आपलेसे, आप्त, कार्यमग्न, कार्यरत, कुतूहलापोटी, कोंडमारा, गर्द, छंदाविषयी, छेद, जगण्यातले काही, जिवाभावाचे (व्यक्तिचित्रण- मौज प्रकाशन), दिसले ते, धागे आडवे-उभे, पुण्याची अपूर्वाई, प्रश्न आणि प्रश्न, बहर शिशिराचा (अमेरिकेतील फॉल सिझन), मजेदार ओरिगामी, मस्त मस्त उतार (कवितासंग्रह), माझी चित्तरकथा, माणसं, रिपोर्टिंगचे दिवस, लाकूड कोरताना, वनात, वाघ्यामुरळी, वेद शिकवले ज्यांनी, संभ्रम, सरल तरल, सुनंदास आठवताना आणि स्वतःविषयी अशी बावीसच्या वर पुस्तकांचे लेखन, संपादन त्यांनी केले. त्यातील बहुतांश साहित्यसंपदेचा विविध महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मान झाला. अनिल अवचट यांच्यासारखी व्यक्ती जेवढय़ा सक्रियतेने सामाजिक कार्यात कार्यरत राहते, विविध आंदोलनात सहभागी होऊन सामाजिक प्रश्नांचा वेध घेते, त्याचा अभ्यास करून लेखन करते, आवडीच्या लेखन प्रांतातही मुशाफिरी करते, तेच अवचट मनस्वीपणे चित्रेही रेखाटतात. एकाग्रतेने लाकडाचे कोरीव काम कलाकुसरीने करून अप्रतिम शिल्प साकार करतात. छायाचित्रेही काढतात. ओरिगामीत व्यग्र असतात आणि सवड मिळेल तेव्हा बासरीचे सूर छेडतात. अशा विविध कलाप्रकारांतून त्यांच्या अंगभूत गुणांचीच ओळख आपल्याला पटते. एवढेच नव्हे तर यानिमित्ताने एका लेखकाची नि कार्यकर्त्याची जडणघडण याद्वारे आपल्यासमोर येत असते. अनिल अवचट यांचे नाव प्रथमदर्शनी समोर येताच लेखक, कार्यकर्ता याप्रमाणे ‘मुक्तांगण’चे कार्य आपल्यासमोर येते. मुक्तांगण परिवार आज बराच विस्तारला आहे. त्यांच्या लेखनाप्रमाणेच मुक्तांगणचे कार्य अधोरेखित करावे एवढे महत्त्वाचे आहे. पत्नी सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य सुरू केले. व्यसनमुक्तीची नवी पद्धत त्यांनी शोधली, जी आज देशभरात, जगभरातील व्यसनमुक्ती केंद्रात वापरली जाते. आयुष्याच्या प्रवासात पत्नीची साथ अर्ध्यावरच सुटली. पत्नीची आठवण विविध कार्याच्या माध्यमातून असावी, यासाठी त्यांनी पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू केले.
डॉ. अनिता अवचट स्मृतीसंघर्ष सन्मान पुरस्कार दिले जातात. आजपर्यंत पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, नागराज मंजुळे आदींना हे पुरस्कार लाभले. अनिल अवचट सध्या पुण्यातील मुक्तांगणचे व्यसनमुक्ती केंद्र संचालक आहेत. व्यसनमुक्ती कार्यात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल डॉ. अनिल अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशननेही सन्मान केला. ‘सृष्टीत सृष्टी’ या बालसाहित्यविषयक पुस्तकास साहित्य अकादमीचा सन्मान लाभला. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कारासह फर्ग्युसन गौरव, सातारा येथील रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार लाभला, तर मुक्तांगणच्या कार्याचा 2015 साली पु. ल. स्मृती सन्मान सोहळय़ात गौरव झाला. भिल्लार येथे होत असलेल्या 28 व्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड ही निश्चितच अभिनंदनीय व उल्लेखनीय समजली पाहिजे.