प्रासंगिक : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10

>>विलास पंढरी<<

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आजही सर्व जगाला सदैव स्फूर्ती देणारे, दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कामगारविषयक, स्त्रियांसाठी, धार्मिक व इतर विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे.

या हिंदुस्थानी सुपुत्राला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेच्या 300 वर्षांतील ‘सर्वात हुशार विद्यार्थी’ असे संबोधून त्यांचा पुतळा उभारून ‘ज्ञानाचे प्रतीक’ असा त्यांचा गौरव केला. त्यामुळे विदेशातही एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ. आंबेडकर मान्यता पावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 च्या दशकामध्ये हिंदुस्थानच्या सामाजिक व राजकीय पटलावर पदार्पण करत चार दशके विविध क्षेत्रांत योगदान दिले. ते प्रकांडपंडित होते. अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी अशा भूमिकांमधून त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासावर आपला आगळावेगळा ठसा उमटवला.

सर्वांना मूलभूत हक्क देत कर्तव्येही नमूद करणाऱया, सामाजिक आणि भौगोलिकदृष्टय़ा विभक्त झालेल्या देशाला एक करणाऱया आणि हिंदुस्थानच्या प्रत्येक सज्ञान नागरिकाला मतदानाचा अधिकार देणाऱया घटनेची निर्मिती केली. या त्यांच्या कार्याबद्दल सर्व हिंदुस्थानी ऋणी तर आहेतच, पण आजच्या त्यांच्या 128 व्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील सर्वच घटकांसाठी केलेल्या कामांची उजळणी करणे उद्बेधक ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. नोकरी करणाऱया स्त्रियांसाठी आज मिळणारी प्रसूती काळातील सहा महिन्यांच्या भरपगारी रजेची तरतूद केली, मुलींना वडिलांच्या संपत्तीमधे समान अधिकार मिळवून दिला, नियोजन आयोगाची स्थापना केली, पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.

देशात प्रथम त्यांनी जलनीती तयार केली व नद्या जोडणी प्रकल्प आखला, पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे देशात अजूनही काही भागांत पूरसदृश परिस्थिती व काही भागांत पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत. आठ तास डय़ुटी, त्यापेक्षा जास्त काम करावे लागल्यास ओव्हरटाइम, आपल्याला आता मिळणारी आठवडय़ातून एक सुट्टी ही बाबासाहेबांचीच देणगी आहे. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत व संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मजूरमंत्री असताना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली. स्त्राrभ्रूणहत्या करू नये यासाठी जनजागृती, देशाला उपराजधानीची गरज आहे हे सांगणारे व देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौरऊर्जेपासून चालणारे जलविद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या त्यांच्या योजनांची अजूनही अंमलबजावणी मात्र झालेली नाही. बाबासाहेबांनी आयुर्विमा महामंडळाची व एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला जातीभेदाचा प्रचंड त्रास होऊनही हिंदू धर्माचा द्वेष कधी केला नाही. राजकारण करीत असताना त्यांनी धार्मिक प्रश्नांना राजकारणाचा स्पर्श होऊ दिला नाही हे आजच्या राजकीय पक्षांनी लक्षात घेतले असते तर देशात एकही जातीय दंगल झाली नसती. सर्वच दृष्टीने वंदनीय असलेल्या ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सतत प्रेरणादायी राहील.