डॉ. द. रा. पेंडसे

अर्थशास्त्र हा विषय तसा क्लिष्ट आणि आकलनास कठीण. मात्र काहींचा हा विषयदेखील सहजसोप्या पद्धतीने मांडण्याची हातोटी असते. अर्थात त्यासाठी ‘अर्थशास्त्रा’वर तेवढीच कमांड असावी लागते. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांच्याबाबत तेच म्हणावे लागेल. टाटासारख्या देशातील जुन्या मोठ्य़ा आणि यशस्वी उद्योग समूहाचे पूर्णवेळ मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून तब्बल दोन दशके काम डॉ. पेंडसे यांनी केले. टाटा समूहात सामील होण्यापूर्वी केंद्र सरकारच्या अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्रालयात त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले. नंतर मात्र त्यांनी टाटा समूहात मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून पूर्ण वेळ काम केले. अर्थशास्त्र हा तसा किचकट आणि क्लिष्ट विषय असला तरी डॉ. पेंडसे त्यांच्या सहज सोप्या शब्दांत हा विषय लेखनाच्या आणि भाषणातून मांडत. त्यामुळे समोरची व्यक्ती, मग ती छोटय़ा पदांवरील असो की मोठ्य़ा, तिला त्याचे आकलन होणे सोपे जात असे. टाटा उद्योग समूहाचे दिवंगत सर्वेसर्वा जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यंचा विशेष स्नेह होता. टाटा समूहात प्रदीर्घ काळ साहित्याने ‘जेआरडी’ यांच्यासह नानी पालखीवाला, सुमंत मुळगावकर यांच्यासारख्या समूहातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याशीही त्यांचे स्नेहपूर्ण संबंध राहिले ही क्षणचित्रे पेंडसे यांनी आपल्या लेखणीद्वारा उत्तमरीत्या चित्रित केली आहेत.

पुण्यात १९३० मध्ये त्यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातूनच त्यांनी अर्थशास्त्र, संस्थाशास्त्र आणि गणित विषयात बी.ए. ही पदवी संपादन केली. पुढे केंब्रिज विद्यापीठातून बी.ए. आणि एम.ए. केले. ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’चे ते याच कालावधीत रिसर्च फेलो होते. मुळात कुशाग्र बुद्धी आणि अध्ययनातील दिमाखदार कामगिरी यामुळे अध्ययन करताना त्यांना अनेक मान्यताप्राप्त शिष्यवृत्त्या आणि फेलोशिप्स मिळाल्या. १९५४च्या सुमारास ते केंद्रीय व्यापार-उद्योग मंत्रालयात दाखल झाले. पुढे स्टॉक एक्स्चेंजमध्येही ते होते. १९६७ च्या सुमारास ते टाटा समूहात वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेथे ते सलग दोन दशके कार्यरत होते. पूर्णवेळ अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी त्यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखेच आहे. त्यांच्या कारकीर्दीत टाटा समूहाच्या आर्थिक व्यवहारांचा आलेख वर जाणाराच ठरला. सखोल अभ्यास, प्रचंड व्यासंग, लेखन आणि वक्तृत्वावर प्रभुत्व असल्यामुळे अर्थशास्त्रासारखा विषयदेखील समोरच्या व्यक्तीला समजणे कठीण जात नसे. त्यांचे लेखनही बहुरंगी होते. हिंदुस्थानने ‘खाऊजा’ (खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरण स्वीकारल्यानंतर देशातील बदलत्या अर्थविश्वाचे चित्रण ते लेखन आणि व्याख्यानांमधून अत्यंत सोप्या पद्धतीने आणि मार्मिकरीत्या मांडत असत. ‘खाऊजा’ धोरणाची वहिवाट त्यांनी फार पूर्वीच आपल्या लिखाणातून मांडली होती. टाटा समूहातून निवृत्त झाल्यावर डॉ. पेंडसे यांनी अनेक ठिकाणी खासगी आर्थिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले. ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी ऍडव्हाइस’ ही मान्यताप्राप्त संस्था डॉ. द. रा. पेंडसे यांचीच. त्यांच्यामुळेच ती त्या क्षेत्रात अग्रेसर राहिली. डॉ. पेंडसे म्हणजे अर्थशास्त्राचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. वक्त़ृत्व, लेखन आणि व्यासंग या तिन्ही आघाडय़ांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी अर्थशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.