ठसा : डॉ. प्रकाश खांडगे

28


>>प्रशांत गौतम<<

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळगावच्या पंचक्रोशीस संत, शाहीर आणि तमाशा लोककलावंतांची मोठीच परंपरा लाभलेली आहे. वारकरी आणि कीर्तनकारांचाही समृद्ध वारसा या गावास लाभला. विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे, दत्ता महाडिक, दादा इंदुरीकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांच्या गावात प्रकाश खांडगे यांचा १९५७ मध्ये जन्म झाला. पुढील काळात शिक्षणासाठी मुंबई गाठली. तेथील वास्तव्यात परळमधील छोटय़ा घरात ते राहू लागले. राहायला घर तर मिळाले, पण उपजीविकेचा प्रश्न होताच. त्यासाठी खांडगे यांनी रस्त्यावर, दुकानात जाऊन पापड विकले. सतत परिश्रम आणि कठोर मेहनतीमधून एका बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर वृत्तपत्रांत व नंतर प्राध्यापकी असा प्रवास झाला. खांडगे यांचे कलावंतांचे गाव असल्याने लोककलांचे संस्कार होणे स्वाभाविकच होते. आज डॉ. प्रकाश खांडगे म्हणजे लोककलांचा चालता बोलता इतिहास, असे समजले जाते. लोककला हा त्यांचा ध्यास आणि श्वास होय. तमाशा कलावंत शंकरराव धामणीकर आणि दादा इंदोरीकर यांचा बालपणीच सहवास लाभल्याने त्यांचा या क्षेत्रातील प्रवास बहुआयामी होत गेला. ‘खंडोबा  एक जागरण’ हा प्रबंध त्यांनी पीएच.डी.साठी मुंबई विद्यापीठास सादर केला. ज्याचा सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्या नावाचा पुरस्कार लाभला. ज्या ज्या तमाशा कलावंतांच्या खांडगे यांनी भेटी घेतल्या त्यांच्याकडून त्यांनी पारंपरिक वाघ्याकडून अनेक भाषणे, कथा संग्रहित केल्या. ज्याचा उपयोग त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रबंध सादरीकरण करताना झाला. खंडोबाचे जागरण, नोहे एकल्याचा खेळ (आत्मकथन) शब्दांकन नेहा सावंत आणि भंडारा अशा महत्त्वपूर्ण पुस्तकांचे खांडगे यांनी लेखन केले. ते सध्या मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक म्हणून कार्य करतात. पुरस्कार घोषित झाल्यानंतर हा राष्ट्रीय सन्मान त्यांनी डॉ. रा. चि. ढेरे आणि अशोकजी परांजपे यांना अर्पण केला. त्यांची ही कृतज्ञतेची भावना महत्त्वाची वाटते.

 

आपली प्रतिक्रिया द्या