लीलावतीचा वारसा

92

>>शैलेश माळोदे

मी वैज्ञानिक असून एक स्त्री आहे एवढंच… प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांच्याशी दूरध्वनीवरून गप्पा मारताना नुकत्याच मिळालेल्या ‘पद्मश्री’विषयी अभिनंदन करताना ‘महिला शास्त्रज्ञ’ म्हणून खास अभिनंदन करणाऱ्यांसाठीच स्वतःचं मत व्यक्त करताना त्या सहज बोलून गेल्या. सहज म्हणावं तर नंतर त्यांनी त्याविषयीचे अगदी मुद्देसूद स्पष्टीकरण तर दिलंच, पण त्यामागील पार्श्वभूमीही विशद केली. बंगळुरू या हिंदुस्थानच्या केवळ आयटीच नव्हे तर खऱ्याखुऱ्या ‘सायन्स कॅपिटल’ (वैज्ञानिक राजधानी) असलेल्या शहरातील हिंदुस्थानी विज्ञान संस्थेत (आयआयएससी), सेंटर फॉर हाय एनर्जी या संस्थेत त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

आज हिंदुस्थानातल्याच नव्हे तर जगातील काही मोजक्या उच्च दर्जा भौतिकी शास्त्रज्ञांमध्ये प्रा. रोहिणी गोडबोले यांचा समावेश होतो. प्रा. गोडबोले यांचं शालेय शिक्षण मुलींच्या हुजूरपागा हायस्कूल, पुणे आणि त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालं. बी.एस्सी. पदवी त्यांनी विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवत 1972 साली मिळविल्यानंतर आयआयटी, मुंबईतून प्रथम क्रमांक प्राप्त करीत त्यांनी मास्टर्सदेखील मिळविली. त्यांना आयआयटीच्या मानांकित माजी विद्यार्थी म्हणूनही गौरविण्यात आलंय. सध्या वन भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि स्वित्झर्लंडमधील सर्न (सीईआरएन) येथील कोलायडर फिजिक्समध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान असून हिग्ज बोलॉन्ससारख्या अतिसूक्ष्म कणांविषयी संशोधनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सच्या ‘वुमेन इन सायन्स’ या विशेष कार्यक्रमाच्या त्या कार्यप्रवण सदस्या आहेत.

प्रा. रोहिणी गोडबोले यांनी स्त्री मुक्तीवादी शास्त्रज्ञ यासारख्या फॅन्सी शब्दात न अडकता स्त्रियांनी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात पुढे यावं आणि त्यांना लिंगभेदविरहित एक शास्त्रज्ञ म्हणून सन्मान मिळावा यासाठी खूपच आग्रही प्रयत्न केलेत. त्यांनी हिंदुस्थानी महिला वैज्ञानिकांविषयी संपादित केलेलं पुस्तक ‘लीलावतीज् डॉटर्स’ हे इंग्रजी भाषेतलं असून ते अत्यंत गाजलं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास ‘मला याविषयी खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की, आपण हे करू शकलो. लीलावती ही 12 व्या शतकात होऊन गेलेल्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांची कन्या असून ते विविध कूट गणितीय सिद्धांतांविषयी चर्चा करीत. ‘लीलावतीचाच बौद्धिक वारसा पुढे घेऊ जाणाऱ्या हिंदुस्थानी महिला वैज्ञानिक या तिच्या कन्यकाच नाही का?’ असं विचारत प्रा. गोडबोले पुस्तकाच्या शीर्षकावर प्रकाश टाकतात.

सुरुवातीला प्रा. गोडबोले यांनी विज्ञान संशोधनातील महिला या मुद्दय़ाकडे फारसं, विशेषतः एक कळीचा मुद्दा म्हणून लक्ष दिलं नव्हतं. याविषयी बोलताना त्यांनी त्यामागची पार्श्वभूमी विशद केली ती अशी… ‘‘2001 साली मला ‘वुमेन इन फिजिक्स’ परिषदेत भौतिकशास्त्रात संशोधन करताना स्त्रियांना येणाऱ्या अनुभव आणि अडथळय़ांविषयी व्याख्यान देण्याकरिता आमंत्रित करण्यात आलं होतं. मला आठवतं की, जगातल्या विभिन्न भागांतून जवळपास दहाएक जणांना बोलाविण्यात आलं होतं. पाश्चिमात्य राष्ट्रांतली विद्यापीठं जपान, चीनचे विज्ञानमंत्री आणि इजिप्तची एका महिला शास्त्रज्ञ वगैरे. संयोजक हे एक मोठी वैज्ञानिक संस्था असल्यामुळे जगातल्या विभिन्न भागातले लोक उपस्थित होते. माझं भाषण झाल्यावर अनेक महिला माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, जेव्हा तुम्ही बोलत होतात तेव्हा आम्ही त्याच्याशी अशा रीतीनं जोडले गेलो की तुम्ही ज्या परिस्थितीत सर्व केलंय तर आम्हीही करू शकतो.’’ प्रा. गोडबोले यांना आपल्या आजूबाजूची परिचयातील उदाहरणांद्वारे लोकांना प्रोत्साहित करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच मग इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्समधील महिला वैज्ञानिकांची समिती अस्तित्वात आली.

‘कुटुंब वा जोडीदाराची साथ ही एक बाब या सर्व शास्त्रज्ञांमध्ये सामायिक होती ती म्हणजे या घटकाचं महत्त्व स्त्रीच्या करीयर आणि जीवनात किती आहे हे लक्षात येतं’ असं त्यांनी सांगितलं. यासाठी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या सहचर्यातून ‘देशातील प्रथम महिला डॉक्टर’ जन्माला आल्याचं सांगायला त्या विसरत नाहीत. त्यांनी ‘ए गर्ल्स गाईड टू लाइफ इन सायन्स’ हे पुस्तकदेखील सहसंपादित केलंय.

आपल्या जवळपास चार दशकांच्या वैज्ञानिक संशोधनाच्या करीयर प्रवासात त्यांनी उच्च ऊर्जा फोटॉन्स, टॉप क्वार्कचा शोध, हिग्ज बोसॉन्स स्टॅण्डर्ड मॉडेल कणांचे सुपरसिमेट्रिक पार्टनर्स आणि या सिद्धांतामागील संकल्पनांविषयी खूप संशोधन केलंय. त्यांनी ज्ञात सिद्धांताविषयी आपल्या नवीन संशोधनाद्वारे महत्त्वाचा प्रकाश टाकला असून त्यामधूनच सर्नसारखे उच्च ऊर्जा फिनॉमेनॉलॉजिस्ट (उपपत्तीकार) म्हणून त्यांचं कार्य खूपच महत्त्वाचं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाविषयी जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानामुळे महिला वैज्ञानिकांचं काम प्रकाशात येतेय.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या