एका नाट्यप्रलयाला उजाळा…


– दुर्गेश आखाडे

१९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवली ती प्रतिभासंपन्न नाटककार प्र.ल.मयेकर यांच्या संहितांनी. अग्निपंख… दीपस्तंभ… रातराणी… पांडगो इलो रे बा इलो… काळोखाच्या सावल्या एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृतींनी रंगभूमीवर आला होता प्रलयकारी नाटकांचा सुवर्णकाळ. प्र. ल. अर्थात प्रभाकर लक्ष्मण मयेकर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले आहेत ते प्र.ल.या लघुपटातून…

ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांचा जन्म राजापूरमधील कोंभेवाडीतला. चौथीपर्यंतचे शिक्षण कोंभेवाडीत झाल्यानंतर प्र.लं.चा थेट मुंबईपर्यंतचा प्रवास झाला. मुंबईतील युनियन हायस्कूलमधल्या ग्रंथालयाने प्र.लं.च्या वाचनाची भूक भागवली.

मुंबई ही त्यांची कर्मभूमी होती, तरीही प्र.लं.ची नाळ मात्र रत्नागिरीशी जोडलेली होती. सेवानिवृत्तीनंतरही प्र.ल. मयेकरांनी कर्मभूमी सोडली आणि जन्मभूमी रत्नागिरी गाठली. रत्नागिरी शहरामध्ये वास्तव्य असताना त्यांचा रत्नागिरीतील रंगकर्मीशी स्नेह जुळला. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीशी त्यांचं एक नातं निर्माण झालं. बेस्टनंतर समर्थ रंगभूमी ही माझी संस्था असं प्र. ल. त्यावेळी सांगत तेव्हा रत्नागिरीकरांनाही त्याचा अभिमान वाटायचा. या समर्थ रंगभूमीसाठी त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेकरिता यांनी नवं कोर कुंतीपार्थिवा हे नाटक लिहिलं. समर्थ रंगभूमी प्र.लं.च्या ऋणात कायम राहिली. या ऋणानुबंधातूनच जन्मला आला प्र.ल.हा लघुपट. ‘प्र.ल.’ प्रतिभासंपन्न नाटककाराचा इतिहास रंगभूमीवर वावरणाऱ्या आणि रंगभूमीवर येणाऱ्या प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. समर्थ रंगभूमीने या लघुपटातून मांडलेले समग्र प्र.ल. भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे

प्र.लं.च्या सिद्धहस्त लेखणीच्या वैशिष्टय़ांवर हा लघुपट प्रकाशझोत टाकतो. १९८० मध्ये ‘आतंक’ हे प्र.ल. मयेकरांचं पहिलं नाटक राज्य स्पर्धेच्या रंगमंचावर आलं. १९८३ साली बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्र.लं.च्या “मा अस् साबरिन” या नाटकाने पहिलं यश संपादन केलं आणि मग रंगमंचावर दर्जेदार नाटकांचा प्रलय आला. राज्य नाट्य स्पर्धेत बेस्टच्या नाटकांचा एक दबदबा निर्माण झाला. नाटकातील व्यक्तीरेखेची भाषाशैली हे प्र.ल.मयेकरांचं आणखी एक वैशिष्ट्य. “अथ मनुस जगन हं…” ‘जंगल्याची भाषा’ या नाटकात पाहायला मिळते. जंगल्याच्या भाषेची निर्मिती प्र.लं.नीच केली. कारण अशी भाषा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बोलली जात नाही.

‘अग्निपंख’ मधील रावसाहेब आणि बाईसाहेब यांची १९४८ सालातील कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा, ‘रातराणी’मधील ऍना स्मिथ हीच अँग्लोइंडियन स्पीकिंग, ‘पांडगो’मधील तात्याचा मालवणी बाज, तक्षकयाग मध्ये अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारी भाषा, ‘कुंतीपार्थिवा’मधील पौराणिक भाषा त्यांच्या पात्रांच्या भाषाशैलीतच त्या व्यक्तिरेखा लपलेल्या असायच्या. ‘सवाल अंधाराचा’मधील नायकाचा राकटपणा, ‘रानभूल’मधील रंगाचा रांगडेपणा, रातराणीमधील सॅलीचा कावेबाजपणा, निव्वळ भाषाशैलीमुळे वेगळा वाटणारा ‘सोनपंखी’मधील डबलरोल, मानवी प्रवृत्ती.. भावना… कथानकात धक्के देत रंगमंचीय चतुराई दाखवणारं ‘दीपस्तंभ,’ मराठी माणूस आणि परप्रांतीयांवर भाष्य करणारं ‘मि. नामदेव म्हणे,’ प्रख्यात नाटककार वसंत कानेटकरांच्या सकंल्पनेवर आधारित ‘हासू आणि आसू…’ मराठी रंगभूमीनंतर हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारं डॅडी आय लव्ह यू, शरद पवारांच्या जीवनावरचं ‘सत्ताधीश…’ भुताची नाकेबंदी केल्यानंतर चौथी भिंत तोडून पळणारे भूत….मोज्यांच्या वासालाच घाबरून पळणारे भूत अशा भन्नाट कल्पना असणारं ‘पांडगो इलो रे बा इलो…’, ‘रानभूल’ आणि ‘दीपस्तंभ’ ही नाटकं पुनर्जीवित होऊन नव्या पिढीतल्या नाट्यरसिकांसमोर आली.

नाटकांबरोबरच प्र.लं.च्या एकांकिकाही गाजल्या. आय कन्फेस, अतिथी, रक्तप्रपात, होस्ट, अब्द शब्द, अतिथी सारख्या अर्ध्या तासात चिरेंबद होणाऱ्या एकांकिका. महाभारताचे उत्तर रामायण आणि रावणायन सारख्या विनोदी एकांकिका आजही स्पर्धा गाजवतात. चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांनी केलं. पुत्रवती चित्रपट लेखनासाठी स्क्रीन आणि फिल्मफेअर ऍवार्डही प्र.लं.नी पटकावले स्क्रीन त्याचबरोबर रथचंदेरी, दुरावा आणि दुहेरी या दूरचित्रवाणी मालिकांचे लिखाण करत प्र.ल.मयेकरांनी सर्व माध्यम व्यापून टाकली. अलीकडच्या चित्रकथी मालिकेच्या काही पटकथा प्र.ल.नी लिहिल्या.

मसीहा हा प्र.ल.चा पहिला कथासंग्रह राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार पटकावणारा ठरला. त्यानंतर काचघर हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला. अग्निपंख, रातराणी, दीपस्तंभ आणि पांडगो इलो रे बा इलो ही नाटके पुस्तक स्वरूपात प्रकाशित आहेत. प्र.ल.मयेकरांच्या संहितानी महाराष्ट्राच्याही सीमा ओलांडत भाषेच्या सीमा पार केल्या. रेशमगाठ, राजारानी, अंतरपट, जुगलबंदी, प्रेम घिरय्या आणि डॅडी आय लव्ह यू ही नाटके गुजराती रंगभूमीवरही गाजली. इन्सान अभी जिंदा है, सुखा सैलाब, अंदमान, रेवती देशपांडे, कहाँ गुम हो गयी कमली आणि तिनका तिनका प्यार ही नाटकं हिंदी राज्य नाटय़स्पर्धेत गाजली.

प्र.ल.मयेकरांचा हा इतिहास पुन्हा एकदा नाट्यरसिकांसमोर आला आहे. या लघुपटाची निर्मिती समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील, चित्रीकरण अजय बाष्टे, संगीत योगेश मांडवकर, ध्वनीमुद्रण उदयराज सावंत, निवेदन अविनाश नारकर, प्रमोद पवार व अभिनेत्री मयूरी जोशी यांनी केले आहे. प्र.लं.च्या या सुहृदयांनी त्यांच्या लघुपटाला साहाय्य करीत प्र.लं.चे अविष्कार या लघुपटातून उलगडले आहेत.