लेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी

387

>>नामदेव सदावर्ते<<

[email protected]

रंगरेषांचे सुसंस्कार शालेय शिक्षणातच घडणे आवश्यक आहे. बालमनाची जडणघडण करणारे शब्दाइतकेच प्रभावी माध्यम रंगरेषा आहे. हे प्रथम शिक्षणतज्ञांनी विचारात घेऊन अभ्यासक्रमात योग्य तो बदल घडवावा. सुंदर रंगरेषांची चित्रनिर्मिती मनाला आनंद देते हे बालकाला एकदा समजले की, तो मोबाईलबरोबर खेळून वेळ वाया घालवणार नाही. वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि रेखाटनात रमेल. शालेय जीवनात चित्रकलेच्या शिक्षणामुळे मुले सहज आत्मप्रकटीकरण करतात. रंगरेषेचा वापर करून आपला कलाविष्कार घडवू शकतात.

चित्रकलेचे विश्व खऱ्या अर्थाने अद्भुत आहे. यातील सृजनशीलतेचा आविष्कार मनाला आनंद देतो. या रंग-रेषांमध्ये संवेदनशीलता जागविण्याची, विचार करण्यास प्रवृत्त करण्याची प्रचंड ताकद आहे. अशा सर्वार्थाने जीवन समृद्ध करणाऱ्या या कलेला शालेय अभ्यासक्रमात मानाचे स्थान देणे हे वैभवशाली कलापरंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात नक्कीच अपेक्षित आहे. मात्र या विषयालाच ऐच्छिक केले गेले तसतसे या कलेचे शालेय शिक्षणातील महत्त्व कमी होत चालले आहे. पूर्णवेळ चित्रकला शिक्षकांची भरती टाळण्याकडे कल राहिला आहे. असे यापुढेही घडत राहिले तर बालमनाची जडणघडण करणारे, शब्दांपेक्षाही प्रभावी असे रंग-रेषेचे माध्यम मुलांपासून कायमचे दुरावण्याची भीती आहे. महाराष्ट्रात कलाशिक्षणाचा दर्जा उत्तमच हवा. हा विषय बेदखल करणे योग्य नाही. आपली मुले चित्रसाक्षर झाली पाहिजेत. चित्रनिर्मितीचा आनंद त्यांना मिळावा. विविध चित्रे पाहणे, ती समजून घेणे त्यांना शिकविले गेले पाहिजे. कलात्मकतेची अनुभूती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. यासाठी त्यांचे चित्रकलेशी घट्ट नाते जोडा. कारण हा आनंद कुठल्याही प्रगत तंत्रज्ञानात शोधूनही सापडणार नाही.

माध्यमिक शालेय शिक्षणात रंग-रेषांना सन्मान होता त्या काळात ज्यांचे शिक्षण झाले ते भाग्यवान मानावे! सत्तर सालापूर्वी माध्यमिक अभ्यासक्रमात ‘चित्रकला’ या विषयाला खूप महत्त्व होते. शालान्त परीक्षेत चित्रकलेचे दोन विषय परीक्षेसाठी निवडता येत होते. गणित, इंग्रजीप्रमाणेच चित्रकलेलाही प्राधान्य होते. अकरावीत एसएससी परीक्षेसाठी दोनशे गुणांचे हे विषय होते. प्रात्यक्षिक चित्रकला व कलेचा इतिहास घेऊन एसएससी परीक्षा विद्यार्थी देत होते. त्याकाळी प्राथमिक शाळा खऱ्या अर्थाने ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर’, तर माध्यमिक शाळा ‘विद्यालय’ होत्या. सत्तर सालानंतर नवीन अभ्यासक्रम आला. त्यानुसार दहावीतच शालान्त परीक्षा सुरू झाल्या. यात गणित व इंग्रजी हे विषय अनिवार्य, तर चित्रकला हा ऐच्छिक झाला. तेव्हापासून चित्रकलेचे महत्त्व कमी झाले आहे.

आमच्या सुदैवाने जुन्या अभ्यासक्रमानुसार शालान्त परीक्षेत चित्रकला व कलातिहास हे विषय होते. ते घेऊन मी एसएससी उत्तीर्ण झालो. त्यानंतर डी.टी.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन येवले तालुक्यातील अंदरसूल येथील माध्यमिक शाळेत चित्रकला शिक्षक पदावर रुजू झालो.

शालेय स्तरावरील शिक्षणात कलाशिक्षणाला योग्य महत्त्व असल्याने तेव्हा प्रत्येक माध्यमिक विद्यालयात दहा वर्गांसाठी एक चित्रकला शिक्षक नेमणे बंधनकारक होते. तेव्हा अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर सरस्वती मातेचे सुंदर चित्र रंगविलेले असे. शाळा म्हणजे माता सरस्वतीचे मंदिर मानले जाई. या चित्रापुढे नतमस्तक होऊनच विद्यार्थी वर्गात प्रवेश करीत होते.

चित्रकला शिक्षकाचे अस्तित्व शाळेच्या भिंतीवरील फळय़ावर असलेल्या रंग-रेषांमुळे प्रकट होई. सुविचार, सुभाषिते, दिनविशेष, बोधकथा आणि चित्ररेखाटने असलेले भित्तीफलक विद्यालयांचे भूषण होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभातफेरीसाठी क्रांतिकारकांची चित्रे असलेले चित्रफलक पाहून नागरिकांनाही क्रांतिकारकांचे स्मरण घडवले जात असे.

महापुरुषांची तैलचित्रे अनेक शाळांमध्ये कलाशिक्षक तयार करीत असत. चित्रांतील रंग-रेषेतून नैतिक मूल्याचे शिक्षणही देता येते हे अनेक विद्यालयातील भिंतीचित्रांतून दिसून आले आहे. सुंदर हस्ताक्षर असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान होत होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेली हस्तलिखीते रंग-रेषांचे सुंदर अलंकारच होते.

मी विद्यार्थी असताना आमच्या शाळेत चार ‘चित्रकला शिक्षक’ होते. त्यापैकी एक प्रभाकर झळके सर हे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. हे सर्व कलाशिक्षक आपल्या रंग-रेषेतून शालेय आवार आकर्षक करीत तसेच विद्यार्थ्यांवरही सुसंस्कार करीत होते. सन 1966 व 67 या वर्षी सरकारी चित्रकला परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चित्रकलेची आवड वाढत गेली. चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या रेखाटनांची नक्कल करण्याची आवड निर्माण झाली. ‘मार्मिक’ साप्ताहिकाचेही आकर्षण निर्माण झाले. विनोदी रेखाटनांतून हसविणारी रंग-रेषाही मन प्रसन्न करणारी ठरते. केवळ रेषेच्या माध्यमातून मानवी जीवनातील हास्यासह विविध भावभावना प्रकट होतात हे पाहून रेषेचे महात्म्य अपरंपार आहे हे लक्षात येत गेले.

शब्दांपेक्षाही रेषांमधून अधिक स्पष्टपणे विचार प्रकट करता येतात हा रेषेचा चमत्कार आहे. चित्रकलेतील स्मरणचित्र हा माझा आवडता विषय आहे. तसेच व्यंगचित्रे, हास्यचित्रे, राजकीय व्यंगचित्रे आवडते विषय झाले. ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांतून रेषांचे अमर्याद सामर्थ्य प्रकट होत असे. प्रमाणबद्ध वास्तववादी रेखाचित्रांना रंगांची जोड मिळाल्यावर अत्यंत आल्हाददायी चित्राकृती निर्माण होते. चित्रकार दलाल, रंगसम्राट मुळगावकर, आचरेकर आदी महान चित्रकारांची चित्रे नेत्रसुखदायी, आनंददायक असतात.

रंग-रेषांचे सुसंस्कार शालेय शिक्षणातच घडणे आवश्यक आहे. बालमनाची जडणघडण करणारे शब्दाइतकेच प्रभावी माध्यम रंग-रेषा आहे. हे प्रथम शिक्षणतज्ञांनी विचारात घेऊन अभ्यासक्रमात योग्य तो बदल घडवावा. सुंदर रंग-रेषांची चित्रनिर्मिती मनाला आनंद देते हे बालकाला एकदा समजले की, तो मोबाईलबरोबर खेळून वेळ वाया घालवणार नाही. वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि रेखाटनात रमेल.

शालेय जीवनात चित्रकलेच्या शिक्षणामुळे मुले सहज आत्मप्रकटीकरण करतात. रंग-रेषेचा वापर करून आपला कलाविष्कार घडवू शकतात. केवळ चित्रकार, शिल्पकार नाही, तर एक रसिक नागरिक निर्माण होण्यासाठी शालेय स्तरावर या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेत वर्गसंख्येनुसार या शिक्षकांची नेमणूक करावयास हवी.

महाराष्ट्राला रंगरेखाकलाकारांची समृद्ध परंपरा आहे. व्यंगचित्रकार, कमर्शिअल आर्टिस्ट, लॅण्डस्केप आर्टिस्ट, व्यक्तिचित्रणकार, शिल्पकार या सर्व कलाप्रकाराच्या हजारो व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होत्या व आजही आहेत. रंग-रेषेच्या सुसंस्कारात समाज समृद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळांमधून हे सुसंस्कार बालमनावर घडावेत ही अपेक्षा.

(लेखक हे सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या