लेख : मुद्दा : दुष्काळ, परिणाम आणि उपाय

534

>> चंद्रकांत आ. दळवी

‘नेमेचि येतो पावसाळा’ अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असे म्हणावे असे वाटते. आता आपल्या महाराष्ट्रातील नेहमीचे दुष्काळी जिल्हे कोणते याचे एकदा एखाद्या तज्ञ अभ्यास समितीतर्फे निरीक्षण-परीक्षण करून त्यावर ‘महाराष्ट्र शासन’ आणि ‘केंद्र शासन’ यांनी संयुक्तरीत्या अगदी युद्धपातळीवर उपाययोजना करावयाला हव्यात. म्हणजे हा दुष्काळाचा प्रश्न कायमचा सुटेल आणि आपला महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होईल.

माझ्या मते पहिला उपाय म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या पावसाळ्यात अगदी भरभरून वाहतात व त्याचे ते वाढीव पाणी त्याचा काही उपयोग न होता शवटी ते पाणी समुद्राला जाऊन मिळते ते नद्यांचे पाणी अडवायला पाहिजे म्हणजे त्या पाण्याचा वापर आपणास करता येईल. त्यासाठी प्रथम आपण नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर राबवायला पाहिजे म्हणजे त्याचा आपणास फायदा होईल.

माझ्या मते दुसरा उपाय म्हणजे अरब राष्ट्रांत जे समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून पिण्यास किंवा इतर व्यवहारात वापरले जाते त्याच धर्तीवर आपल्याकडेही असे प्रकल्प राबवून दरवर्षी भेडसावणारा हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपात सोडविता येईल.अर्थात हे प्रकल्प राबविण्यासाठी मोठा खर्च येईल, परंतु खर्च एकदाच होईल आणि वर्षानुवर्षाचा दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपात सुटेल व हे काम अगदी चांगले आणि फायदेशीर होईल आणि माझा महाराष्ट्र कायमचाच टँकरमुक्त होईल.

माझ्या मते तिसरा उपाय म्हणजे ‘शेततळी’ निर्माण करणे. त्यासाठी शेतीतील पाणी जाणकार मंडळींचा सल्ला घेऊन जेथे नैसर्गिकरीत्या पाण्याचे स्रोत आहेत अशा ठिकाणीच ही शेततळी निर्माण करणे. म्हणजे पावसाचे पाणी तर जमा होईलच, परंतु तेथे नैसर्गिक पाण्याचे झरे असतील तर त्या शेततळ्यांत कायमस्वरूपात पाणी जमा राहील आणि त्या पाण्यात मत्स्यशेती करून दोन-चार गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्या मत्स्यशेतीमुळे सुटू शकेल आणि तेथील शेतकरी बांधवांना त्यातून आनंद मिळेल.

तसेच आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींना वर्षाला 100 झाडे लावणे व ती झाडे त्या त्या ग्रामपंचायतीने त्या झाडांची सेवा करून जगविणे, असा प्रत्येक ग्रामपंचायतीला कोटा ठरवून द्यावयाचा. त्यामुळे काही वर्षांनी ती झाडे मोठी होतील व आपला महाराष्ट्र हिरवागार होईल. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल आणि वायुप्रदूषण कमी होऊन स्वच्छ आणि शुद्ध हवा भरपूर प्रमाणात मिळेल. गावाचा विकास होईल आणि गावाचा रोगराईपासून बचाव होईल.

वरील या दुष्काळी कामासाठी इमानदार आणि निष्कलंक माणसांची नियुक्ती करावी नाहीतर या कामाला 100 कोटी मंजूर होतील, पण 10 कोटी खर्च केला जाईल व 90 कोटी रुपये आपल्या खिशात घालून तेथे भ्रष्टाचार केला जाईल. याबाबत सावध राहावे लागेल व हे काम चांगल्या रीतीने कसे होईल हे पाहावे लागेल. तसेच या दुष्काळी कामासाठी इतरही काही लोकांच्या सूचना असतील तर त्याचा योग्य सूचनांचा विचार व्हावा व त्यावर योग्य कारवाई करावी.

 

आपली प्रतिक्रिया द्या