पर्यावरणपूरक विवाह!

आपले विवाह सोहळे जर पर्यावरणपूरक झाले तर निसर्गाची खरोखरच जपणूक होईल.

विवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या विधींच्या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक करता आली तर ? … हा विचार कोणीही करत नाही, मात्र निसर्गाचे आणि धार्मिक विधींसाठी लागणाऱया वस्तूंची जपणूक करण्याचा मार्गाने वाटचाल ‘इको फ्रेंडली विवाह’च्या माध्यमातून करता येऊ शकते.

लोकांमध्ये पर्यावरणाचे भान राखले जावे आणि भविष्यकाळाचे भान ठेवून विवाहासाठी वापरल्या जाणाऱया अक्षता, केळीची पाने, प्लास्टिकचे ग्लास, ताटे, पिशव्या इत्यादी वस्तूंची नासधूस, त्यासाठी होणारा अनाठायी खर्च टाळता यावा, या उद्देशाने इको फ्रेंडली विवाहसोहळ्याची संकल्पना लोकांमध्ये रुजू व्हायला हवी, असे ही योजना अंमलात आणणारे अमिता कॅटरर्सचे संचालक शशांक कदम सांगतात.

लग्नाच्या या समारंभात पाहुण्याच्या पाहुणचारासोबत दिखाव्याला अधिक प्राधान्य असते. केवळ एक परंपरा म्हणून लग्नाचे स्वरूप मर्यादित न राहता त्यातून संपत्तीचे प्रदर्शन कसे करता येईल याकडेही अधिक लक्ष दिले जाते. लग्नात मांडल्या जाणाऱया थाटात पर्यावरणाचे कोणतेही भान न ठेवता अनाठायी खर्च केला जातो. या गोष्टींना अशा पद्धतीने लग्न समारंभ साजरे केल्यामुळे आळा बसू शकतो, यासाठी ३५ वर्षे जुन्या असलेल्या अमिता कॅटरर्स, यांनी पर्यावरणाशी सुसंगत राहण्यासाठी इको फ्रेंडली विवाहसोहळय़ाच्या माध्यमातून सर्वच वयोगटाच्या व्यक्तिंपर्यंत पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश ते देत आहेत.

इकोफ्रेंडली लग्नसोहळा
या लग्नसोहळय़ात कापड आणि पुनर्विनीकरण कागदाने ५०० इको फ्रेंडली कापडी आणि कागदी टोपल्यांमध्ये अक्षतांऐवजी झेंडू, गावठी गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात. गावठी गुलाबाच्या पाकळ्यांना सुगंधही छान असतो. प्रत्यक्षात अक्षता वधू-वरांपर्यंत पोहोचतातच असे नाही. म्हणून अक्षता फुलांच्या पाकळ्या वापरल्या तर त्यांचा मंद सुगंध संपूर्ण सभागृहात पसरतो. अक्षता म्हणून वापरण्यात येणारा तांदूळ पुण्याजवळील शंकर महाराज अन्नछत्र येथे दान केला जातो. शिवाय एका वेळी १५०० ते १६०० ग्लासेस वापरले जातात. या ग्लासांचा बराच कचरा लग्न पार पडल्यानंतर साचतो. तसेच विवाह सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर भले मोठे केळ्याचे खांब लावलेले असतात, त्याऐवजी इथे विवाह जोडप्यांच्या हस्ते केळ्याचे झाड लावण्यात येते. त्यामुळे वधु-वरांकडून वृक्ष लागवडही होते. प्रत्येक लग्नात आठवण म्हणून दोन झाडे सिंधुदुर्ग येथे असलेल्या कृषी पर्यटन केंद्रात लावली जातात किंवा विवाहित जोडपेदेखील ही केळीची झाडे घेऊन जाऊ शकतात. लग्न समारंभावेळी बरेचसे अन्न वाया जाते. अशावेळी उरलेले अन्न गरजुंपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘फुड फॉर ऑल’ या अॅपचा वापर केला जातो. या ऍपद्वारे योग्य व्यक्तिला संपर्क केला जातो. त्याद्वारे लग्नानंतर शिल्लक राहिलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येते, या लग्नाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, असे कदम यांचे म्हणणे आहे.

इतरही वैशिष्टय़पूर्ण उपक्रम
या इको फ्रेंडली विवाहाच्या माध्यमातून आमच्याकडील फुलांच्या पाकळ्या, अन्न माध्यमातून कंम्पोस्ट खताची निर्मिती करणे, सौर ऊर्जेचा वापर करून डेकोरेशनसाठी त्याचा वापर करणे तसेच जिथे सर्व्हिस लाईट, डेकोर लाईट आहे, अशा ठिकाणी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करून इतरही पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची इच्छा शशांक कदम व्यक्त करतात.