शतायुषी तरुण

>> डॉ. सु. भि. वराडे

मराठवाड्य़ातील पहिले सनदी अधिकारी आणि मराठवाडा विकासाचे गाढे अभ्यासक भुजंगराव कुलकर्णी हे १०१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, मराठवाडा जनता विकास परिषद, मराठवाडा विकास आणि संशोधन संस्था, ऊर्जा सहयोग, आयसीम इंजिनीयरिंग, एमबीए महाविद्यालय आणि कुलकर्णी कुटुंबीयांच्या वतीने आज १० फेब्रुवारी रोजी आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमित्त हा लेख…

बीड जिह्यातील परळी तालुक्यात गाडेपिंपळगाव येथे ५ फेब्रुवारी १९१८ ला भुजंगराव कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांना ५ फेब्रुवारी २०१८ ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी शिक्षणात कधी प्रथम श्रेणी सोडली नाही. अंबाजोगाई, संभाजीनगर व हैदराबाद या शहरांमध्ये शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणानंतर तत्कालीन निजामी राजवटीत नोकरी पत्करली. त्यात त्यांना अनेक प्रकारचे अनुभव आले. राजकीय सेवेत त्यांना अनेक दुर्धर प्रसंगांना तोंड द्यावे लागले. निजामी राजवट संपली. मराठवाड्य़ातील जनतेत स्वातंत्र्याची उषा उगवली व पारतंत्र्याची काळरात्र संपली. त्यांना सनदी अधिकारीपदाची संधी आली. ते हिंदुस्थानी प्रशासनात समाविष्ट झाले. या सेवेत असताना ते संभाजीनगरचे जिल्हाधिकारी झाले. या शहरात सुधारणा कशी करावी याच्या नियोजनाचा विचार सातत्याने केला. पुढे पुणे महापालिकेचे आयुक्त असताना आपल्या विकासाच्या दृष्टीचा उपयोग केला. जेथे गेले तेथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. महाराष्ट्र राज्याचे सिंचन खात्याचे सचिव झाले. त्यावेळेस अनेक प्रकल्पांची आखणी झाली. विकास कसा असावा याची मांडणी त्यांनी केली. ग्रामीण भागात जन्मले म्हणून त्यांना ग्रामीण प्रश्न माहीत होते. त्यात स्थलनिहाय उपाययोजना असली पाहिजे, अशी मांडणी त्यांनी अनेक वेळेस केली.

निवृत्तीनंतर ते मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. २००१ साली मराठवाडा कसा असावा, यासाठी एक चर्चासत्र लेखाद्वारे घेण्याचे नियोजन त्यांनी केले होते. त्यावेळेस मोरेश्वर सावे संभाजीनगरचे खासदार होते. भुजंगरावांनी त्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हावे म्हणून गळ घातली. सावेंनी यासाठी पुढाकार घेतला. वाल्मीमध्ये याचे चर्चासत्र झाले. उत्तम आराखडे त्यात होते. सिंचन व पाण्याची पीकनिहाय आवश्यकता कशी व किती असेल याची मांडणी त्यावेळेस केली होती. उद्योगासाठी पाणी व त्याची परिपूर्ती याचा आलेख त्यांनी दिला होता. त्याचवेळेस मराठवाड्य़ातील प्रेक्षणीय स्थळे, त्यांची जोपासना, पर्यटनासाठी सुविधा करण्यासाठी नियोजनसुद्धा केले. भुजंगराव कुलकर्णी म्हणजे गुणवंत गृहस्थ आहेत. अफाट वाचन, मनन व चिंतन सातत्याने करत राहिलेत. आजदेखील तरुणाला लाजवेल या उत्साहाने कार्यरत आहेत. गेल्या आठवड्य़ात भेटीसाठी गेलो त्यावेळेस विजय बोराडेंनी एका विकसित गावाची गोष्ट सांगितली. ते गाव म्हणजे कडवंची होय. आज त्या गावचे उत्पन्न लाखांमध्ये होते ते करोडोंच्या घरात झाले. तेव्हा ते लगेच म्हणाले, मला ते गाव पाहायचे आहे. या महिन्यातील तारीख ठरवा. इतका उदंड उत्साह विकास कार्यासाठी त्यांच्या ठायी आहे. एकात्मिक विकास कसा असावा, हे पाहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हे त्यांच्या अतुलनीय मनोबलाची साक्ष देते.

प्रत्येकाच्या जीवनात काही घटना अशा असतात की मनोबल इच्छाशक्ती दुर्बल होते असे प्रसंग भुजंगरावांवर आलेत. तरुण मुलं, सुना व त्यांची पत्नी यांच्या जाण्याने त्यांना ते दुःख सहन करावे लागले; पण त्यांनी त्यांच्या धैर्याचा मेरू खचू दिला नाही. सदैव कार्यरत राहिलेत. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाले ते 90च्या दशकात. त्याचे ते सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी कामाचा सपाटा लावला व प्रादेशिक असमतोलाची मांडणी केली. तो वेग राजकीय मंडळीला परवडणार नाही म्हणून अलिखित सूचना आल्यात की उडय़ा मारू नका. त्यांनी विकासातील असमतोलाचे निकष ठरविले. त्या निकषानुसार प्रादेशिक विकासातील दरी भरून काढण्याचे काम केले. उपाय सुचविले. मराठवाडा मागे का? त्यासाठी विविध क्षेत्रांना निधी किती लागणार, हे देखील निर्देशित केले. याच दशकात महाराष्ट्र शासनाने जल व सिंचन आयोग नेमला. त्याचे ते एक सदस्य होते. अनेक पैलूंविषयी चर्चा झाली. आयोगाच्या अहवाल लिखाणास त्यांनी मदत केली. काही प्रकरणे स्वतः लिहिलीत.

विशेष म्हणजे सिंचन विभागाची प्रशासकीय रचना कशी असावी, याविषयी सूचना केल्यात. त्या अहवालात ३२९ शिफारशी करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. या आयोगाचा मी सदस्य होतो म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा केली. ते स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत गोविंदभाई श्रॉफबरोबर काम करीत असत. काही बैठकांना मी जात असे. तेव्हा दिवंगत केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने एक ग्रंथ इंग्रजीमध्ये संकलित करावा, असे ठरले. ‘जमीन व पाणी उत्पादकता’ असे त्याचे नाव होते. संपादक समितीमध्ये डॉ. चितळे व मी होतो. या पुस्तकाला प्रस्तावना पंतप्रधान नरसिंहराव यांची आहे. ती टिपणी भुजंगरावांनी केली. त्यात काहीही बदल न करता पंतप्रधानांनी स्वीकारली. भुजंगरावजींना परमेश्वर उदंड आयुष्य देवो व त्यांची कार्यक्षमता सदैव उत्तम राहो, ही परमेश्वराला विनंती.