फॅशनेबल दिग्दर्शक

280

>> रोहिणी निनावे, [email protected]

विक्रम फडणीस हे नाव मी अनेक वर्ष ऐकून होते. फॅशन डिझायनर…सेलिब्रिटी…! त्याच्या नावाभोवती एक वलय आहे. त्याच्याशी कधी भेट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली. मनावर दडपण होतं, पण विक्रम अतिशय साधा आहे. एकदम टू द पॉईंट बोलणारा.

‘हृदयांतर’ चे संवाद लिहिले असल्याने मी त्याने दिगदर्शित केलेल्या या चित्रपटाची सगळी प्रक्रिया बघितली आहे. पहिलाच चित्रपट त्याने ज्या सफाईने दिग्दर्शित केला, ते बघून कुणी म्हणणार नाही की हा त्याचा पहिला प्रयत्न आहे.

आत्तापर्यंत विक्रमने एकच चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि ‘स्माईल प्लीज’ हा त्याने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला, एका वेगळ्या विषयावरील चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.

तरीही मला त्याची मुलाखत घ्यावीशी वाटली कारण कधी कधी एक प्रयत्नही माणसाला आणि त्याच्या आसपासच्या माणसांना खूप काही शिकवून जातो…समृद्ध करून जातो. फॅशन डिझायनर ते दिग्दर्शक हा प्रवास ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना असेल असं मला वाटलं.

ठरलेल्या वेळी मी विक्रमच्या अंधेरी वेस्टच्या नव्या ऑफिस मध्ये पोहोचले. त्याच्या ऑफिसचं इंटिरिअर खूप हटके आहे.

अप्रतिम असे डिझायनर ड्रेसेस हँगरला लावले होते.

नेहमीप्रमाणे विक्रमने मुद्याला हात घालत विचारलं, करायचं सुरू? मी हसले म्हटलं, हो.

मी विचारलं, या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय पार्श्वभूमी होती? घरातलं कुणी या क्षेत्रात होतं का?

विक्रम म्हणाला, नाही, माझे आई वडील दोघेही डॉक्टर होते, त्यामुळे साहजिकच डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार अशी अपेक्षा असते. पण मला मेडिसिनला जायचं नव्हतं.

या दरम्यान मी एम. टी. वी., फॅशन टी.वी. बघण्यात रमत होतो. वाटलं हे काही वेगळंच जग आहे. कॉलेजला असतानाच माझ्यामध्ये फॅशन कोरिओग्राफीची आवड निंर्माण झाली होती. त्यानंतर मी घरातल्या एका फंक्शनसाठी कपडे डिझाईन केले जे सगळ्यांना आवडले आणि मग मला कॉन्फिडन्स आला की आपल्याला यातलं कळतं.

मी कॉलेजच्या काही शोजसाठी ही काम केलं. माझं ते काम बघून प्रसिद्ध मॉडेल मेहेर जेसिया म्हणाली, तू फिल्मसाठी काम का करत नाहीस? मला ब्रेक मिळाला तोच मोठंमोठय़ा फिल्ममध्ये. पहिली फिल्म केली कमल हसनची हिंदुस्तानी, यात मी उर्मिला मातोंडकरचे कॉस्च्युम्स केले.

मग एकापाठोपाठ फिल्म्स सुरू झाल्या आणि खूप लहान अवधीतच माझं फॅशन कोरिओग्राफर म्हणून नाव झालं. मी सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार या टॉपच्या हिरोंचे कपडे डिझाईन करत होतो. सलमान खानचे कपडे मी 17 वर्ष केले आहेत.. बीवी नंबर वन, सलामे इष्क, दुल्हन हम ले जायेंगे, ऐतराज, तेरे नाम, हसीना मान जायेगी, तर अक्षय कुमारच्या रावडी राठोड, वक्त, नमस्ते लंड़न असे अनेक चित्रपट केले.

मी म्हटलं मग आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? विक्रम म्हणाला.. आधी ते शुअर नव्हते, पण जसजसं मला यश मिळत गेलं.. त्यांची खात्री होत गेली की माझी निवड योग्य होती आणि मग त्यांनी मला फक्त प्रोत्साहनच दिलं. ‘हृदयांतर’च्या प्रीमिअरच्या वेळी विक्रमच्या आई वडिलांच्या डोळ्यात होतं ते फक्त कौतुक. स्वतः विक्रम हासुद्धा अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच तो हृदयांतर सारखा भावस्पर्शी चित्रपट बनवू शकला.

मी म्हटलं दिग्दर्शक व्हावं असं कधीपासून वाटायला लागलं?

विक्रम म्हणाला अगदी सुरुवातीपासूनच. फॅशन डिझायनर म्हणून मी जिथे शूट असायचं तिथे जायचो. चित्रपट बनायची प्रक्रिया जवळून बघत होतो. वेगवेगळ्या तंत्रज्ञाच्या संपर्कात येत होतो. क्रू किती महत्त्वाचा आहे हे त्याच वेळी कळलं. माझी खूप मित्र मंडळीही झाली. खूप चांगली माणसंही मला भेटली. मी फॅशन डिझायनिंग खूप केलं होतं, आता मला सिनेमा करायचा होता. माझ्या मनात असलेल्या गोष्टीवर.

मी विचारलं… सिनेमा मराठीमध्ये करायचं मनात होतं की हिंदी मध्ये?

विक्रम म्हणाला, हिंदीमध्ये!.. पण दोन मुलींच्या आईचा रोल करायला कुणीच तयार नव्हतं. अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणी असलेल्या अभिनेत्री ही, मला खूप वाईट वाटलं. मराठीमध्ये असे काही ब्लॉकेजेस नाहीत… मराठी मधले कलाकार रोल कसा आहे ते बघतात, त्याची लांबी रुंदी बघत नाहीत, मी कशी दिसेन, माझी इमेज बदलेल का अशी भीती बाळगत नाहीत. ते प्रयोग करण्यावर विश्वास ठेवतात. सुबोध भावेने स्वतःच्या लूकवर किती प्रयोग केले आहेत. वेगवेगळ्या भूमिका तो करतो आहे. मुक्त बर्वे बद्दल काय बोलू? हृदयांतर काय किंवा स्माईल प्लीज काय? तिच्याशिवाय हे चित्रपट होऊच शकले नसते.

हृदयांतर माझा पहिला चित्रपट होता, मराठी इंडस्ट्रीमध्ये मी कुणाला ही ओळखत नव्हतो…पण एक एक माणूस जोडून मी टीम बनवली.

मला आठवतंय, संवादांच्या बाबतीतही विक्रम काही बाबतीत खूप आग्रही होता. असं म्हणजे असंच त्याला हवं असायचं. विक्रम कॅप्टन ऑफ द शिप होता. त्याचं प्लॅनिंग इतकं परफेक्ट होतं की खूप कमी वेळातच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. प्रत्येक डिपार्टमेंटकडून काम करून घेण्याची क्षमता जी दिग्दर्शका कडे असावी लागते, ती त्याच्यात पुरेपूर आहे.

मी म्हटलं तेव्हा चित्रपटाच्या मुहूर्ताला शाहरुख खान, म्युजिक लाँचला ऐश्वर्या आणि हृतिक आले होते यावरून तुझ्यावर टीका ही झाली होती. हृतिकने तर छोटासा रोलही यात केला होता. त्यावरून ही त्याच्या ग्लॅमरचा तू वापर केलास असं काही जण म्हणाले. विक्रम म्हणाले, मी काही हे मुद्दाम केलं नाही. आम्ही इतकी वर्ष सोबत काम करतो आहोत. ते माझे मित्र आहेत, त्यांनी स्वतःहून यायची तयारी दाखवली मग मी नाही का म्हणायचं? मराठीमध्ये थोडं ग्लॅमर आलं तर काय बिघडलं… त्या सगळ्यांना माझ्यासारखंच, मराठी सिनेमा आणि मराठी कलावंतांबद्दल नितांत आदर आहे.

मी विचारलं, मराठी सिनेमा आजच्या घडीला कसा आहे? आणि त्यात काही काळानुसार दिग्दर्शक म्हणून बदल व्हावेत असं तुला वाटतं का?

विक्रम म्हणाला मराठी सिनेमा सातत्याने बदलतो आहे आणि त्यात होणारे बदल हे खूप स्वागतार्ह आहेत असं मला वाटतं.

मी विचारलं तुझ्या नव्या फिल्मबद्दल थोडं सांग…

विक्रम म्हणाला, ही फिल्म मी माझ्या आईला डेडिकेट केली आहे, तिच्यावरून मला हा विषय सुचला. विषय डिस्क्लोज करत नाही, पण एवढं सांगेन की ही एक फॅमिली फिल्म आहे. अतिशय भावपूर्ण.. ज्याला आपण स्लाइस ऑफ लाईफ म्हणतो अशी. यात मुक्त बरोबर प्रसाद ओक आणि ललित प्रभाकर हे दोन अनुभवसंपन्न गुणी कलाकारही आहेत. आणि आय होप लोकांना हा चित्रपट ही आवडेल. विक्रमने मला या चित्रपटाचे काही अंश दाखवले. खूपच छान झाला असणार हे सिनेमा हे त्याची झलक बघूनच कळलं, एक सीन बघताना डोळे नकळत पाणावले. विक्रम स्वतः ही खूप इमोशनल असल्याने तो भावना उत्तमरीत्या मांडू शकतो.
मी विचारलं फॅशन डिझायनिंग, डिरेक्शन खेरीज कशाची आवड आहे?

विक्रम म्हणाला मला ट्रव्हलिंगची खूप आवड आहे, आणि कामाच्या निमित्ताने ती आवड पूर्ण होतेही!

सुस्वभावी, सुशिक्षित, आई वडिलांवर खूप प्रेम करणारा, डाऊन टू अर्थ आणि हँडसम असलेला विक्रम मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे.

त्याच्या कामावर त्याचं अतिशय प्रेम आहे. विक्रमला आगामी ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी विक्रमचा निरोप घेतला!

आपली प्रतिक्रिया द्या