गृहसंकुलांत अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण!

>>पुरुषोत्तम कृ आठलेकर

अलीकडे वारंवार आपण इमारत, हॉटेल्स, दुकाने यांना दुर्दैवाने लागलेल्या आगीच्या बातम्या वाचतो आणि अनुभवत आहोत. त्यात नाहक बळी जातात तर काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यासाठी सर्वांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करून जागृत राहणे अत्यावश्यक आहे. बहुतेक वेळा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट, गॅस सिलिंडर, केरोसीन, डिझेल अशा ज्वालाग्राही वस्तू व पदार्थांचा साठा योग्य त्या ठिकाणी केलेला नसतो तसेच त्याचा वापर कोणतीही काळजी न घेता, सुरक्षित साधनांचा वापर न करता आपण निष्काळजीपणाने आपण आपले व्यवहार पार पाडत असतो. अशानेच दुर्घटनांना सामोरे जावे लागते. म्हणूनच फायर मार्शल तयार करण्यासाठी अग्निशमन दलाची प्रशिक्षणाची नवी योजना सुरू झाली असून अग्निशमन दलाचे जवान सोसायटीत जाऊन योग्य ते प्रशिक्षण देणार आहेत. अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींना तोंड देण्यासाठी कसे सज्ज राहावे, सोसायटीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा कशी वापरावी, फायर पंप कसा वापरावा, अलार्मची ओळख, कोणती आग कशी विझवायची या सार्‍या प्रकारचे आवश्यक ते प्रशिक्षण या फायर मार्शलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

इमारती किंवा लहान दुकानातून आत बाहेर प्रवेश करण्यासाठी एकच मार्गक्रमिका असल्यामुळे जास्त सतर्क राहण्याची गरज असते. जेव्हा आपण अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा खालील सुरक्षा साधने जवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

1) स्मोक अलार्म  सिस्टम,

2) फायर हायड्रंट सिस्टम,

3) सेंड बकेट,

4) पाण्याचा होस पाइप,

5) मीटर बॉक्सची सुरक्षित जागा इ.

सर्व साधन योग्य त्या ठिकाणी ठेवून या सर्व वस्तूची देखभाल व व्यवस्थापन दर तीन महिन्यांनी करून घेणे गरजेचे असते. आज जर आपण सरासरी लोकांकडे पाहिले तर बहुतेकांकडे विद्युत उपकरणे असून त्याचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही उपयुक्त साधने बसविणे बंधनकारक आहे.  ही केवळ बसवून चालत नाही तर अग्निशमन दलाच्या फायर फायटिंग अधिकारी किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडून इमारतीमधील रहिवासी, दुकानातील कर्मचारी किंवा कारखान्यातील कामगार यांना योग्य ते प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देणेसुद्धा बंधनकारक आहे. इमारती वा सोसायटी येथे जेव्हा वर्षातून तीन-चार वेळा सभा होतात त्याच वेळेला अशा प्रशिक्षणाचे आयोजन करणे अधिक उपयुक्त होऊन त्यामधील साक्षरता अधिक व्यापक होईल. सेफ्टी फर्स्ट या भूमिकेतून सर्वांनीच यासंबंधीची माहिती प्रशिक्षण घेतली तर त्यांना दैनंदिन जीवनात व व्यवहारात त्याचा फायदा होऊन तो अधिक सतर्क व जागृत राहून काम करू शकतो.

तसेच कोणत्या उपकरणाचा केव्हा वापर करावयाचा यासंबंधीसुद्धा काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याबद्दलसुद्धा माहिती घेऊन प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासंबंधीचे नियम, निकष याचेसुद्धा काटेकोरपणे पालन होणे महत्त्वाचे आहे. हीच वस्तुस्थिती औद्योगिक क्षेत्रात असून तेथे रासायनिक पदार्थ हा एक घटक असतो जो अतिज्वालाग्रही असून अत्यंत धोकादायक असतो इतकेच काय, पण त्याचा पर्यावरणावरसुद्धा परिणाम होतो. त्यासाठी फार कडक नियम व निकष आहेत, पण त्याचे पालन न केल्यामुळे अलीकडेच डोंबिवली एमआयडीसी येथे झालेले दोन भीषण स्फोट ज्याचे सावट आजही आहे. इमारत, हॉटेल्स, दुकाने, कारखाने येथील अग्निसुरक्षेसंबंधी कोणतीही तडजोड असू नये. अथवा कोणताही शॉर्टकट असता कामा नये. आज सुरक्षेसंबंधी आपण जागृत आहोत, पण सतर्क नाही आहोत, साधने आहेत पण वापरात नाही, साधने असतील तर देखभाल व्यवस्थापन नाही आणि सर्व साधने असतील तर योग्य माहिती प्रशिक्षण नाही. म्हणूनच दुर्दैवाने दुर्घटना घडतात. अपघात हा अपघात असतो, पण आपण सतर्क, जागृत व प्रशिक्षित असलो तर अपघातावर मात करू शकतो व जीवहानी वाचवू शकतो. पण त्यासाठी योग्य त्या प्रशिक्षणाची गरज व व्यापक जनजागृतीची गरज आहे.

[email protected]