लेख : साने गुरुजींचा वारसदार

292

>>आनंद ईश्वर नांगरे<<

स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांची आज (9 जानेवारी) 100 वी जयंती. साने गुरुजींचा वारसा पुढे चालवणारे तसेच संस्कार करण्याचे काम करणाऱ्या साने गुरुजी कथामाला, साने गुरुजी विद्यालय, अमरहिंद मंडळ, वसंत व्याख्यानमाला, साने गुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट आदी संस्थांचे जनक म्हणून प्रकाश मोहाडीकर यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कार्याची माहिती देणारा लेख.

दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ या ओळी कानावर पडल्या की, डोळय़ांसमोर येतात साने गुरुजी आणि वात्सल्याने, करुणेने ओथंबलेले त्यांचे तेजस्वी डोळे. गुरुजींच्या डोळय़ांत साऱ्या विश्वाला सुखी आणि सुसंस्कारित करण्याची अनंत स्वप्ने होती. माणुसकीवर नितांत श्रद्धा असणारे साने गुरुजी देशातील दीनदलितांसाठी, गोरगरीबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि निरागस लहान मुलांसाठी आयुष्यभर चंदनासारखे झिजले. साने गुरुजी परिसाप्रमाणे होते. त्यांच्या सहवासात जे जे आले त्यांचे सोने न होता ते स्वतःही परिस झाले. गुरुजींचे स्वप्न आपल्या डोळय़ांत साठवून त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा वारसा संपूर्ण आयुष्यभर अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने जतन करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रकाश मोहाडीकर.

प्रकाशभाईंच्या अणूरेणूत साने गुरुजीच सामावले होते. त्यांच्या हृदयात गुरुजींबद्दल अपार भक्ती, विचारात गुरुजींचे तत्त्वज्ञान आणि डोळय़ांत गुरुजींची अपूर्ण राहिलेली अनंत उज्ज्वल स्वप्ने होती. स्वप्न पाहण्यासाठी झोपावे लागते, पण गुरुजींची ही स्वप्ने प्रकाशभाईंनी जागेपणीच पाहिली होती आणि म्हणूनच ही सारी स्वप्ने आपल्या डोळय़ांत साठवून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रकाशभाई आपल्या 94 वर्षांच्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत धडपड करीत राहिले. साने गुरुजी प्रकाशभाईंची माऊली होती. त्यांचे गुरू होते. त्यांचे सर्वस्व होते. म्हणूनच साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलाचा उल्लेख होतो तेव्हा डोळय़ांसमोर उभे राहतात ते प्रकाश मोहाडीकर. प्रकाशभाई हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या प्रदीर्घ जीवनाचा आलेख पाहिला तर लक्षात येते की, प्रकाशभाईंचे सारे आयुष्य ‘साने गुरुजी’ या शब्दांच्या आणि तेजाच्या वलयाभोवती फिरत होते.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या यज्ञकुंडात आयुष्याच्या समिधा टाकायला निघालेला एक स्वातंत्र्यसैनिक, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन कल्पकतेने कथामाला निर्माण करणारे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे संस्थापक, वसंत व्याख्यानमालेचे जनक, कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवनचे सर्वेसर्वा, शिक्षक संघाचे आमदार, नगरसेवक, शिक्षक संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते, पंडित नेहरूंच्या उपस्थितीतील लाखो विद्यार्थ्यांच्या बालक मेळाव्याचे आयोजक, मूठ मूठ धान्यातून बाबा आमटे यांच्या गोकुळ प्रकल्पाला भरीव निधी पोहोचविणारा सहृदयी नागरिक, सीमेवरील सैनिकांना दिवाळीचा फराळ पोहोचवणारा कृतज्ञ, साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक, मुख्याध्यापक, सेनापती बापटांसोबत स्वच्छता मोहिमेत हातात झाडू घेऊन रस्ते साफ करणारे स्वच्छता सेवक, साने गुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्टचे संस्थापक, अमर हिंद मंडळाचे निर्माते असे कितीतरी वेगवेगळे पदर असणारे प्रकाशभाईंचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या समृद्ध आणि कृतार्थ जीवनाची साक्ष देतात.

अनेक संस्था, संघटना प्रकाश मोहाडीकर  यांनी स्थापन केल्या आणि त्या नावारूपाला आणल्या. त्यांची प्रत्येक संस्था असो की संघटना, या साऱ्यांच्या निर्मितीमागे त्यांचा हेतू मात्र एकच होता आणि तो म्हणजे साने गुरुजींच्या स्वप्नांची परिपूर्ती. प्रकाशभाई कोणत्याही एका क्षेत्रात स्थिर राहिलेच नाहीत. पाणी जसे मार्गातील डोंगर, दऱ्या, खाचखळगे भरून पुढे पुढे वाहत राहते तसे एखाद्या निर्मळ झऱ्याप्रमाणे प्रकाशभाई आयुष्यभर पायाला भिंगरी बांधून, विविध उपक्रम आणि योजना राबवून त्या पूर्ण करण्यासाठी धडपडत, झटत राहिले. अत्यंत निःस्वाथीं वृत्ती, सामाजिक बांधिलकीचे ऋण आणि ध्येयवेडा सेवाभाव ही सारी गुरुजींची वैशिष्टय़े प्रकाशभाईंमध्येही उतरली होती.

दातृत्व हा प्रकाशभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक होता. त्यांना विविध पुरस्कार आणि सत्कारातून मिळालेला जवळ जवळ 36 लाख रुपयांचा निधी प्रकाशभाईंनी विविध सेवाभावी संस्थांना दान केला. 10 जानेवारी 1994 रोजी साने गुरुजी, विनोबा भावे आणि गांधी यांच्या मंगल व पेरणादायी विचारांचा सर्वदूर प्रचार करण्यासाठी प्रकाशभाईंनी मंगलयात्रा सुरू केली. रामकृष्ण बजाज यांनी याकामी प्रकाशभाईंना सर्वतोपरी सहकार्य केले. समाजसेवेच्या या महान कार्यात सहचारिणी उषाताई मोहाडीकर यांची समर्थ साथ त्यांना आयुष्यभर लाभली.

10 जानेवारी 1994 ते मार्च 1998 या कालावधीत प्रकाशभाईंनी महाराष्ट्रातील 8 जिल्हे पिंजून काढले. असंख्य शाळा, सेवाभावी संस्था यांना भेटी देऊन त्यांच्यात देशप्रेम, समानता, संस्कार आणि अंधश्रद्धा याबाबत जागृती अन् प्रबोधन केले. त्यांचा हा प्रयोग त्या काळी अत्यंत प्रभावीपणे यशस्वीही झाला. शाळांकडून आणि समाजाकडूनही या मंगलयात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मंगलयात्रेत विविध सभांमधून प्रकाशभाई विद्यार्थी, शिक्षक, महिला, पालक अन् नागरिक यांच्याशी गप्पागोष्टी आणि गाण्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्तम संवाद साधत असत. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा म्हणजेच जवळ जवळ सहा-सात तास अत्यंत तळमळीने ते लोकांशी ओघवते बोलत. शाळेतील मुलांना अत्यंत सुरस संस्कारक्षम गोष्टी रंजकतेने सांगत. पूज्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या आठवणीतून सर्वधर्मसमभाव, देशप्रेम, समाजनिष्ठा, गरीबांबद्दल सहानुभूती, हुंडाबळी व अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादींबाबतचे संस्कार लाखो मुलांवर प्रभावीपणे रुजविण्यासाठी  प्रकाश मोहाडीकरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

प्रकाशभाईंच्या ओघवत्या, भावपूर्ण वक्तृत्व शैलीमुळे सर्व श्रोते भारावून जात. या मंगलयात्रेत प्रकाशभाईंनी महाराष्ट्रातील 8 जिह्यांत 867 सभा घेतल्या, 20 लाख रुपयांच्या संस्कारक्षम वाङ्मयाची विक्री केली. त्यातून 14 लाख विद्यार्थी, 3500 शिक्षक, 2700 महिला आणि 10 हजार नागरिकांपर्यंत प्रकाशभाईंनी ही प्रबोधनाची ज्योत पोहोचविली. या मंगल विचारांच्या प्रकाशात समस्त मंडळी उजळून निघाली. प्रकाशभाईंनी ‘मायमाऊली साने गुरुजी’ हे गुरुजींच्या आठवणींचे सुंदर पुस्तक लिहिले. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि लाखो प्रतींच्या रूपाने साने गुरुजी घराघरांत पोहोचले. अशा या देवमाणसाने 19 मे 2012 रोजी या जगाचा निरोप घेतला. इथे जन्मणारा प्रत्येक जण जाणार आहे, पण प्रकाशभाईंसारखी देवमाणसे कधीही जात नाहीत. ती त्यांच्या सत्कर्मांच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात अढळ स्थान मिळवून अजरामर झालेली असतात.

आपली प्रतिक्रिया द्या