मराठी मने आणि क्रांतीचा वारसा

>> चंद्रकांत शहासने

या महाराष्ट्रभूमीला पूर्वापार स्वातंत्र्याचे वेड आहे. येथील माणसांना गुलामीची चाहूल सर्वप्रथम लागते हा इतिहास आहे. या गुलामी विरोधात लढण्याची ऊर्मी येथेच उत्पन्न होते. मग शेंडी तुटो की फांदी तुटो, मर्द मराठा त्या अन्यायाशी लढतो, शत्रूस मारता मारता मरेतो झुंजतो, पण मागे हटत नाही. ‘प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात, परंतु प्राणाहूनही प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना! जेव्हा याच भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा यज्ञ चेतविण्यास, बलिवेदीचा खेळ खेळण्यास तयार होतात. मराठी मनाची हीच विचारधारा आहे.
मराठी हा शब्दच मुळी क्रांतीला आमंत्रण देणारा आहे.

मराठी रक्तात सामाजिक बांधिलकी आहे. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी मी स्वार्थ त्याग करायला तयार आहे ही जाणीव महाराष्ट्रभूमीत अधिक जोपासली जाते. याची प्रचीती आपणास हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात अधिकतम जाणवते. हिंदुस्थानचा स्वातत्र्यलढा केवळ १८५७ पासून धरला जातो. काही विद्वान तर १९४२ चा लढा हाच स्वातंत्र्यलढा मानतात नि तसा प्रचार करता करता रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती झाली नि ‘चले जाव’ बोलताच इंग्रज हिंदुस्थान सोडून पळून गेले असा पुरस्कार करतात.

या महाराष्ट्रभूमीला पूर्वापार स्वातंत्र्याचे वेड आहे. येथील माणसांना गुलामीची चाहूल सर्वप्रथम लागते हा इतिहास आहे. या गुलामी विरोधात लढण्याची ऊर्मी येथेच उत्पन्न होते. जी कार्य प्रवृत्तही येथेच होते. मग शेंडी तुटो की फांदी तुटो, मर्द मराठा त्या गुलामी, अन्याय्य तत्त्वाशी लढतो, शत्रूस मारता मारता मरेतो झुंजतो, पण मागे हटत नाही. या लेखात मी मराठी हा शब्द महाराष्ट्रभूमीत जन्मलेल्या सर्वांसाठी, महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर खेळून राष्ट्रकार्य करणाऱ्या प्रवृत्तीसाठी वापरलेला आहे. हा शब्द जातीवाचक नाही. मराठी मने जशी अन्यायाविरोधात लढताना सशस्त्र लढ्य़ाला कचरत नाहीत तशीच बौद्धिक लढाईतही मराठी क्रांतिकारक मागे राहिलेले नाहीत व नव्हते. यासाठी आपण येथील क्रांतीचा वारसा अभ्यासताना प्रथम ज्ञानेश्वर माऊलीच्या संत परंपरांचा आढावा घेऊ या. ज्ञानेश्वर माऊली! विश्वाचं, ज्ञानाचं भांडार जे संस्कृतात होतं ते सर्वसामान्यांना समजावं म्हणून माऊलींनी ते मराठीत आणलं. इतकचं नव्हे तर पहिला मोर्चा काढला तो पांडुरंगाच्या दरबारावर! पंढरपूरकडे!! मागणे काय होते?

अवघाची संसार सुखाचा करीन!
आनंदे भरीन तिन्ही लोक।।
जाईन गे माये, तया पंढरपूरा ।
भेटेन मोहरा आपुली या।।

या संपूर्ण विश्वात स्वर्ग-मृत्यू-पाताळात पण सर्वजण सुखी राहावेत. विश्वाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून एक तरुण तपस्वी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत अठरापगड जातींना एकत्र घेऊन सामाजिक संघटन करत करत पदयात्रा, दिंडी घेऊन विठुरायांच्या दरबारात जातो. याला क्रांतीच म्हणावयास हवी. आजही अठरापगड जाती स्वयंशिस्तीने लाखोंच्या संख्येने समाजहित जपाची मागणी करण्यासाठी त्या विठुरायाकडे जातात ही चिरकाल टिकणारी क्रांती करणारे पहिले आहेत ते ज्ञानेश्वर अर्थात ज्ञानोबा माऊली! ज्ञानोबा माऊलीच्यासह केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र ते पेशावर सामाजिक समरसतेचा, राष्ट्रवादाचा प्रसार करणारे गुरू नामदेव आपणास दिसतात. पंजाबच्या धैर्य, शौर्याच्या इतिहासाची बीजे गुरू नामदेवांनी गुरुनानक देवांच्या माध्यमातून रूजवली आणि या देशाच्या सीमावर्ती वायव्य प्रांतात क्षात्रतेजाचा मराठी बाणा, शीख बंधूंच्या माध्यमातून रूजविणारे संत, महान तपस्वी गुरू नामदेव होते.

नामदेवांच्या शिकवणुकीतूनच गुरू गोविंदसिंहजींनी
सकल जगतमें खालसा पंथ जागे।
जगे धर्म हिंदू, तर्क न धूंद बाजे।।

हा मंत्र देत मुगल आक्रमकांना सातत्याने वायव्य प्रांतात थोपवून धरले. आजही हजारोंच्या संख्येने राष्ट्रासाठी बलिदानासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी करण्यात शीख बंधूंचा जो वारसा आहे तो गुरू नामदेवांच्या क्रांतिकारी विचारांचा आहे. संतांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर झाले. राजे शहाजी, जिजाऊमाता यांची अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द हा महाराष्ट्र भूमीचा विशेष गुण आहे. आक्रमकांना परतवून लावताना पातशाही स्वतःच्या अंगावर घेत, पातशाहींकडे चाकरी करत असताना एकीकडे आपल्या पुत्राला अन्यायी सत्तेविरोधात लढण्यासाठी बळ देण्याचे बाळकडू देणारी राष्ट्रनीती केवळ शहाजी-जिजाऊ माँसाहेबच यशस्वीपणे अमलात आणू शकतात. ही राजनीती यशाकडे झेपावताना स्वराज्य स्थापन करते हा मराठी क्रांतीचा गुण विशेष! या कालखंडात जगद्गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास यांचे कर्तृत्व जाणवते.

कमी अधिक प्रमाणात स्वातंत्र्यलढ्य़ात मराठी क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती, गनिमी कावा याचाच आधार घेतल्याची उदाहरणे आहेत. कमी ताकद वापरून शत्रूच्या मर्मावर आघात करण्याची उपजतबुद्धी आजही सैन्यदलात वापरताना दिसतात. स्वातंत्र्यलढ्य़ाच्या घटनांचा आढावा घेतला तर मराठी साम्राज्याच्या अस्तापासूनच १८१८ मध्ये पहिला सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला तो लहूजी उस्ताद या पुण्यातील पैलवानाने. नगर जवळील अकोले भागात रामजी भांगरा आणि करिवा यांनी १८१८ नंतर २० वर्षे इंग्रजांना झुंजविले. १८५५ ते १८५९ मध्ये वीर भागोजी नाईक नांदूर-शिंगोटे भागात लढत होता. खान्देशात खाजा नाईक, उत्तर पुणे-नगर भागात राघोजी भांगरे, नर्मदा खोऱ्यात भीमा नायक, गढ मांडल्याचा शंकरशहा, अक्कलकुवा भागातील कुवरसिंह वसावा, गोंडवनात बापूराव शेडमाके, संताळचा भागीरथबाबा या वनवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांविरोधात पहिले सशस्त्र लढ्य़ाचे रणशिंग फुंकले. यातूनच १८५७ चा स्वातंत्र्यलढा उभा राहिला. याचे नेतृत्वही मराठी देशभक्तांकडेच होते. क्रांतिवीर रंगो बापूजी गुप्ते यांनी १८५७च्या लढ्य़ाची बांधणी केली. साताऱ्याच्या छत्रपतींचा यास पाठिंबा होता. लढ्य़ात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे व अनेक मराठी संस्थानिक आघाडीवर होते. १८५७ नंतरचा कालावधी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र लढ्य़ाचा असून यातूनच हुतात्मा चापेकर बंधू जन्मास आले, लोकमान्य टिळक उदयास आले. त्यामुळे हा क्रांतीचा वणवा अखिल हिंदुस्थानभर पसरला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा सशस्त्र लढा हिंदुस्थानबाहेर नेला. विदेशातून इंग्रजांना आव्हान देण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून अभिनव भारत, गदर, भारतीय रिपब्लिकन आर्मी, अनुशिलन समिती अशा बलाढ्य़ सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना पंजाब, बंगाल, मध्य प्रदेशात उदयास आल्या. याच संघटनांतून पुढे नेताजी सुभाषचंद्रांची आझाद हिंद सेना निर्माण झाली. हिंदुस्थानी सैन्याचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण ही राजनीती सावरकरांनी मांडली व कार्यान्वित केली. पहिला अस्पृश्यता निवारण झालेला रत्नागिरी जिल्हा हा स्वा. सावरकरांमुळे झाला असे इंग्रजांचे अहवाल आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्य़ात मराठी बाण्याच्या त्यागातून एक नवा विचार रूजविला गेला. तो होता स्वतःच घराला आग लावायची, त्या आगीत स्वातंत्र्यसूर्य उगविण्याची प्रतीक्षा करत, सर्वस्वाची आहुती देत शत्रूस मारता मारता मरेतो झुंजायचे.

हाच विचार प्रत्येक मराठी क्रांतिकारकाने जोपासला. यातूनच मराठी मनाच्या धारणांचे मूल्यमापन करताना एक तत्त्व सिद्ध होते. ‘प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात, परंतु प्राणाहूनही प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना! जेव्हा याच भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा यज्ञ चेतविण्यास, बलिवेदीचा खेळ खेळण्यास तयार होतात. मराठी मनाची हीच विचारधारा आहे.
(लेखक देशभक्तकोशकार तसेच मराठी भाषा विश्व, पुणेचे अध्यक्ष आहेत)