बालपणीचे मैत्र

>> दिलीप जोशी

[email protected]

स्मरणरंजन करणाऱ्या प्रत्येकाला आपला भूतकाळ आठवतच असतो. स्वतःशीच विचार करण्याचे चार निवांत क्षण सापडले की, मनाचं पाखरू कुठल्या कुठल्या क्षणांची याद देतं. तरुण वयात केव्हा तरी बालपणीची आठवण येते आणि उतारवयात तर आठवणींचा भूतकाळच मागे उरलेला असतो. सगळ्य़ांच्या सगळ्य़ाच आठवणी रम्य असतील असं सांगता येत नाही. ते परिस्थितीनुसार घडतं. काहींना पूर्वायुष्यातल्या आठवणीत सुवर्णकाळ दिसेल तर काहींना तो कालखंड आठवूच नये असंही वाटेल.

परंतु बालवयातली एक समान (कॉमन) गोष्ट म्हणजे त्यावेळची मित्रमंडळी. थोडं आठवून पाहिलं तर लक्षात येईल की, लहानपणी आपलीही समवयस्कांशी सहज मैत्री व्हायची. आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कोणताही अडथळा (मोठ्य़ांनी मनात भरवला असेल तर) अजिबात नसायचा. म्हणून तर मुलांना निरागस म्हटलं जातं. ‘चाइल्डलाइक’ (चाइल्डिश नव्हे) वृत्ती आयुष्यभर जोपासता आली तर उत्तमच, पण ते सर्वांनाच जमत नाही. बालपण मागे पडतं, तारुण्य येतं. त्याची धुंदी काही काळ अवघं जीवन व्यापून टाकते. विलक्षण उत्साहाचा तो सुवर्णकाळ असतो. त्यानंतरचा काळ थोडा धीम्या गतीने जाऊ लागतो. मित्रमंडळी, नातेवाईक, अगदी घरातली मुलंही त्यांच्या व्यवसायानिमित्त दूरदेशी जातात आणि सांजसावल्यांची सोबत उरते. त्याचाही आस्वाद आणि आनंद कसा घ्यायचा किंवा संध्याकाळही समाधानी कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या मनोधारणेवर (माइंड सेट) अवलंबून असतं. आमच्या वेळी असं होतं असं मागची पिढी सांगत राहते. या आठवणींच्या खजिन्यात बालपणीच्या घट्ट मैत्रीच्या आठवणी असतील तर त्या मनाला सुखावतात. त्या काळात दोन बालकांचा सूर सहज जुळतो. आम्ही एकदा कौटुंबिक सहलीला एका खेड्य़ात गेलो होतो. परदेशातून आलेले दोन नातेवाईक आणि त्यांच्या दोन छोट्य़ा मुली होत्या. पाच-सात वर्षांच्या त्या मुलींचं अमेरिकन ‘ऍक्सेंट’चं मराठी आणि जिथे आम्ही गेलो होतो त्या घरातल्या मुलींचंही तिथल्या बोलीशी नातं सांगणारं मराठीतलं बोलणं. परदेशी पाहुण्यांना चिंता वाटत होती की, मुली कशा काय जुळवून घेतील? आश्चर्य म्हणजे तिथे गेल्यावर तास-दोन तासांत त्या मुली प्रशस्त अंगणात गावातल्या मुलींबरोबर चक्क सागरगोटे खेळू लागल्या. त्यांचे ‘संवाद’ शब्दांपेक्षा, व्याकरणी भाषेपेक्षा हावभावातून रंगत होते. आपल्या संभाषणात त्या तल्लीन झाल्या होत्या. तिथे कुणालाच ‘इंग्लिश येईल का किंवा ‘मराठी समजतं का’ असा ‘कॉम्प्लेक्स’ नव्हता. त्या चार दिवसात ती मुलं मोठ्य़ानाच बरंच शिकवून गेली. निघताना या दूरदेशींच्या, औटघटकेच्या छोट्य़ा मैत्रिणी गळ्य़ात पडून रडल्या. त्या म्हणत होत्या, ‘‘तुम्ही अमेरिकेला आमच्याकडे या’’ आणि या म्हणत होत्या, ‘तुम्ही इथेच राहा.’ दोन्हींपैकी काहीच शक्य नाही हे लक्षात आल्यावर मन हेलावून निरोपाचे हात हलवले गेले. काळ पंधरा वर्षे पुढे सरकला आणि पुन्हा त्या मुली हिंदुस्थानात आल्या. आता फेसबुक, ऍप वगैरेंचा जमाना आला होता. या गावातल्या मुलींकडेही ती गॅझेट्स होतीच. पुन्हा एक कौटुंबिक ट्रिप झाली. आम्ही आता ‘वयस्क’ होतो. त्या तरुण मुलींना आता ते गावचं घर कसं वाटेल असं वाटत होतं, पण पुन्हा तेच घडलं.

गावातल्या मुलींशी त्यांची गळाभेट झाली. जणू काही कालच भेटल्या होत्या इतक्या सहजतेने. आता शाब्दिक उच्चारांचा थोडा फरक असला तरी बोलणं होत होतं. खूप गप्पा, गाणी झाली. त्यांच्या आईने मुद्दाम शिकवलेली मराठी गाणी त्यांनी म्हटली. या मुलींनाही इंग्लिश गाणी समजत होती. जाताना त्यातली एक म्हणाली, ‘मैत्रीने आम्हाला ‘रिच’ बनवलंय!’ मैत्रीची ‘श्रीमंती’ अशी असते. बालपणीच ती काळजात रुजली तर आयुष्यभर टिकते. आठवणींतूनही उभारी येते. माझे अनेक मित्र आज परदेशात आहेत. आमच्या खगोल संस्थेचे विद्यार्थी तर मोठय़ा संख्येने जगभर गेलेत. संशोधनाच्या क्षेत्रात आहेत, पण जेव्हा केव्हा हिंदुस्थानात येतात तेव्हा संस्थेत येऊन आवर्जून भेटतात. मध्ये पाच वर्षे गेली की पंधरा हे आमच्या लक्षातही येत नाही. मी फेसबुक किंवा ऍपवर नसल्याने मला वर्षा-दोन वर्षांनीच त्यांची ख्यालीखुशाली कळते आणि त्या वेळचं भरभरून बोलणं पुढे दोन वर्षे मानसिक ऊर्जा देण्याइतकं ठरतं. अर्थात ही मंडळी माझी अगदी बालपणीची मैत्री असलेली नव्हेत. त्यांच्या नवतारुण्यात विद्यार्थी म्हणून ती भेटली आणि आता प्रौढ होताना समवयस्क नव्हे, पण मैत्रीच्या पातळीवर बरोबरीला आली. मैत्री ठरवून करता येत नाही. फूल उमलावं तशी ती सहज फुलावी लागते. हे एक नातं मनाने जोडलेलं असतं. किंबहुना मनं जुळली तरच मैत्री होते. अमेरिकेतल्या एका विद्यापीठात ‘संशोधन’ झालं की, बालपणीची मैत्री मनं समृद्ध करते. ती ऊर्जा तरुण वयात मानसिक समस्या सोडवताना उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांना मित्रांमध्ये खेळू, बागडू द्या. आता प्रश्न इतकाच आहे की, बरीच मुलं (आमच्या काळातल्या) लगोरी, विटीदांडू खेळण्याच्या वयात हातात स्मार्टफोन घेऊन बसलेली दिसतात. या तंत्रज्ञानाचा नेमका परिणाम पुढच्या पिढीवर काय होतोय याचा अंदाज अजून जगाला आलेला नाही. कदाचित आगामी काळात हे ‘वेड’ ओसरेल. कारण त्यातलं नावीन्यही ओसरलेलं असेल. मग पुन्हा माणसं माणसांशी अगदी शिळोप्याच्या भरपूर गप्पा करायला जमतील. मुलं बालसुलभ पद्धतीने भाषेचा बाऊ न करता संवाद साधतील. तसं घडलं तर ते मनःशक्ती वाढवणारं आहे असं आता म्हटलं जातंय. कारण निरोगी मनासाठी निखळ मैत्री ऊर्जा देणारी ठरतेच.