फटके आणि फटाके – …तेव्हा मैदानावरचं वैरही संपतं

द्वारकानाथ संझगिरी

वसीम अक्रम या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाबद्दल मला नितांत आदर आहे. मी एलन डेविडसनला पाहिलं नाही, पण पाहिलेला सर्वोत्कृष्ट डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणजे वसीम अक्रम.

पण माणूस म्हणून तो परवा माझ्या मनातून उतरला. हिंदुस्थान – पाकिस्तान सामना संपल्यावर बाबर आझमने विराट कोहलीकडे जर्सी मागितली, ती विराटने दिली म्हणून तो चिडला. त्याचं म्हणणं, त्याने ती ड्रेसिंग रूमच्या एकांतात मागायला हवी होती. मॅच हरल्यानंतर मैदानावर मागितल्याने पाकिस्तानात चुकीचा संदेश गेला.

बुलशिट!

किंबहुना योग्य संदेश गेला. मॅच संपली की, मैदानावरचं वैर संपतं. खेळात हार आणि जीत होत असते. महत्त्वाची असते दोस्ती.

फुटबॉलमध्ये एक परंपरा आहे. मॅच संपल्यावर जिंकलेल्या खेळाडूंकडून हरलेल्या मॅचचे खेळाडू जर्सी घेतात आणि ती दिली जाते. मेस्सी, रोनाल्डोसारखे महारथी देतात आणि स्वीकारतातसुद्धा.  तेव्हा त्यात पराभवावरच्या जखमेची खपली निघत नाही. किंबहुना, दोस्तीच्या प्रेमाचं हळुवार मलम चोळलं जातं.

हा अक्रम पूर्वी असा नव्हता. एका पराभवाने तो इतका बदलला? हिंदुस्थानी संघ हा सर्वच बाबतीत पाकिस्तानी संघापेक्षा कितीतरी पटीने ताकदवान आहे. हिंदुस्थानच्या आजच्या संघात मी एकही पाकिस्तानी संघाचा खेळाडू हिंदुस्थानी संघात  उधारीवरही घेणार नाही.

बाबर आझम नाही, रिझवान नाही की शाहीन आफ्रिदी नाही.  शाहीन आफ्रिदीला वसीम अक्रम व्हायला अजून किमान दोन जन्म घ्यावे लागतील. निदान या जन्मात संधी दिसत नाही. पराभव हा होणार होता. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं पूर्णपणे टाळणं ही गोष्ट मला फारशी पटली नसली तरी अख्खा पाकिस्तान अहमदाबादला पाठिंबा द्यायला आला असता तरी पाकिस्तानला जिंकणं सोपं नव्हतं. मुळात ती गुणवत्ता संघात लागते. हिंदुस्थानची गुणवत्ता, हिंदुस्थानचा फॉर्म, संघाचा समतोल, अनुभव हा सध्या पराकोटीला आहे. त्याचा गर्व करू नये. गर्वाचं घर कसं आणि कधीही खाली होऊ शकतं हे अफगाणी संघाने शिकवलं जगाला. त्यात आपणही आलो.

पण दहापैकी साडेनऊ वेळा आपण जिंकू शकतो. अर्धा टक्का मी नशीब नावाच्या गोष्टीला दिला. कधी चार चांगले चेंडू पडू शकतात, झेल सुटू शकतात, हाराकारी होऊ शकते. गेल्या पाच- सात वर्षांत पाकिस्तानची हालत झाली आहे. तिथलं राजकीय वातावरण गढूळ आहे. परदेशी संघ अलीकडे मात्र तेथे जायला लागले आहेत, त्यांना हिंदुस्थानएवढय़ा स्पर्धा मिळत नाहीत. वसीमच्या काळाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी दोन्ही संघ बऱयाचदा समतोल होते. त्यामुळे जिंकल्यावर होणारा आनंद वेगळा होता.

वसीमला माहीत नाही का?

आणि त्याला हिंदुस्थानातील पाकिस्तानी खेळाडूंचे संबंध ठाऊक नाहीत का? वसीमनेच झहीर खान, नेहरा, आर. पी. सिंग वगैरेंना गोलंदाजीच्या बाबतीत मदत केली आहे. अझरची ग्रिप झहीर अब्बास याने बदलली आणि अझर वेगळाच फलंदाज झाला. 1996 साली इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थान पहिली कसोटी हरल्यानंतर लॉर्ड्सला चक्क जावेद मियांदाद हिंदुस्थानी नेटमध्ये मदत करायला आला होता.

दुश्मनी टॉस झाल्यावर असू दे. मॅच संपली, हार-जीत झाली की, मैत्रीचं वातावरण असावं. ते नकोच असेल तर दोन देशांनी खेळूच नये. मग वर्ल्ड कप असो की आणि काय!

बाबरने विराटकडे जर्सी मागून आणि त्याने देऊन  जगासमोर चांगला आदर्श ठेवला.

कुरुक्षेत्रावर दिवसाची लढाई संपल्यावर कौरव-पांडवांच्या शिबिरातले सैनिक एकमेकांना भेटत. मात्र युद्ध सुरू असताना दयामाया दाखवत नसत.

हीच आपली संस्कृती आहे.