बाप्पाला फळांनी सजवूया

187

>> ज्योत्स्ना गाडगीळ

आनंदाची आरास… फळं-फुलं आपल्या सगळय़ाच बाप्पांची खूप आवडीची… मग आंबा, द्राक्ष, शहाळं या विविध फळांनी त्याला सजवायचं आणि प्रसाद म्हणून ती फळं वाटून टाकायची… खूप सुंदर कल्पना!

‘थांब खाऊ नकोस, आधी देवाला नैवेद्य दाखवू दे, मग खा!’
हे वाक्य ऐकत, बालपणी आवडता पदार्थ खाण्याआधी हातावर कितीतरी वेळा चापटी बसली असेल, हो ना?
बालवयात आपल्याला ह्या अडवणुकीचा राग येत असला, तरी मोठेपणी पहिला पगार, मिठाई, लग्नपत्रिका, समारंभाचे आमंत्रण आपणहून ईश्वरचरणी ठेवण्याचा संस्कार अंगवळणी पडतो. ज्याच्या कृपेने आपल्याला धन-धान्य, फुलं-फळं, सुबत्ता लाभते, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा त्यामागील मूळ संस्कार असतो. त्याचेच उदाहरण म्हणजे, अक्षय्य तृतीयेपासून विविध मंदिरांमध्ये देवाभोवती केलेली आंब्यांची आरास!

फळांचा राजा आंबा, आपल्या तोंडी लागण्याआधी तो देवाच्या पायी लागावा, ह्या भावनेपोटी आंब्यांची आरास करून मंदिराचा गाभारा सजवण्याची रित आहे. गेल्या काही दिवसांत पुण्याचा दगडू शेठ हलवाई, पंढरपूरचा विठोबा, दादरचा उद्यान गणेश, मुंबईची मुंबादेवी आंब्याचा साज ल्यायल्याचे छायाचित्र आपण पाहिले असेल. ही आरास समृद्धीचे प्रतीक आहे. भगवंताने देताना कधी हात आखडता घेतला नाही, मग त्याची परतफेड किंवा ऋणनिर्देश करताना आपणही कंजुषी का दाखवावी, ह्या धारणेतून ही भव्य-दीव्य आरास मांडली जाते. आरास झाल्यावर एक-दोन दिवसांनी भाविकांना फळांचे प्रसादरूपी वाटप केले जाते.

ह्याचाच अर्थ, भगवंताला अर्पण केलेल्या गोष्टी तो स्वतःकडे राखून ठेवत नाही. तशा जर त्याने ठेवल्या असत्या, तर लोकांनी नैवेद्य दाखवणेच बंद केले असते. विचार करा, नैवेद्य दाखवताना आपण ताटाभोवती पाणी फिरवतो आणि ताटावरून भगवंताच्या दिशेने एक हात फिरवत दुसरा हात काळजावर ठेवतो. ते कशासाठी? तर देवाला ताटात हात घालण्यापासून रोखण्यासाठी किंवा ताटापासून दूर लोटण्यासाठी! धडधडत्या काळीजावर हात ठेवून, डोळे बंद करत ‘ऑल इज वेल’ अशी स्वतःला हमी देतो. काही क्षणांत प्रार्थना संपवून पटकन ताट उचलून घेतो, न जाणो, तेवढय़ात ताटातला एखादा पदार्थ गायब झाला तर? नैवेद्य दाखवण्याचे असे गमतीशीर वर्णन एके ठिकाणी वाचले होते.
गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला खात्री असते, की देवाला अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टीवर तो हक्क दाखवत नाही. कारण, संतांनी म्हटल्याप्रमाणे तो केवळ ‘भावाचा’ भुकेला आहे. त्याला आपल्या भक्ताच्या मनीचे सच्चे भाव आणि परमार्थातून समाजसेवेला लावलेला हातभार जास्त भावतो.

देवापुढे ठेवलेली आंब्यांची रास गोरगरीब, रुग्णालयातील रुग्ण, अनाथालय, वृद्धाश्रम, तसेच आयुष्यात ज्यांनी अशी फळे चाखता न आलेली रस्त्यावर भटकणारी, घरदार नसलेली अनाथ मुले ह्यांच्यासारख्या समाजातील उपेक्षित थरांपर्यंत थोडीफार तरी पोहोचली, तर देवाला समर्पण केलेल्या या आंबारूपी नैवेद्याचे खऱया अर्थाने सार्थक होईल आणि दानधर्म केल्याचेही पुण्य लाभेल. देवाला केलेली आरास उपेक्षितांच्या जीवाला समाधान देणारी ठरेल.

चैत्रगौरीची आरास, वसंतोत्सवाची आरास, मंगळागौरीची आरास, गणपती-नवरात्रीची आरास ही देवासाठी असली, तरी त्या सुशोभीकरणातून आपल्यालाच जास्त आनंद मिळतो. म्हणून रोजच्या देवपूजेतही आपण आपल्या आवडीची सुगंधी फुले, सुवासिक उदबत्या, धूप-दीप, रांगोळी काढून देव्हारा सजवतो. कारण देवाऱहात तेवत असलेल्या नंदादीपामुळे अंतर्मनीचा देव्हारा उजळून निघतो.

एकूणच काय, तर हे आनंदाचे शेअरिंग आहे. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ हा अभंग प्रसिद्ध आहे. आपला आनंद दुसऱयाला वाटल्यास तो द्विगुणितच काय, तर शतगुणित होतो. सारं जीवन या आनंदसागराचा एक भाग होतं. सर्वच संतांनी दुसऱयाचं जीवन आनंदमय करण्यासाठी झटण्याची शिकवण दिलेली आहे. प्रत्यक्ष जीवनात प्रत्येकाला तिचं आचरण करणं शक्य असतं. एरव्ही आप्त-नातलगांशी, मित्रपरिवाराशी आपण आनंदाचे शेअरिंग करतो, तसे सण-उत्सवाच्या निमित्ताने हे शेअरिंग आपल्या आवडत्या दैवताशी करूया.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या