आकाशगंगेचा आकार

शतकभरापूर्वीचं खगोल अभ्यासाचं आकलन आणि आताचं आकलन यात खूप फरक आहे. चार-पाचशे वर्षांपूर्वी सारं विश्व पृथ्वीभोवती किंवा सूर्याभोवती फिरतं असा समज होता. हे गैरसमज टप्प्याटप्प्याने विरत गेले तरी त्या काळाला अनुसरून तत्कालीन लोकांनी विश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तो आजच्या प्रगतीशील संशोधनाचा पाया ठरला. आता ‘हबल’ नावाचा ‘तिसरा डोळा’ अवकाशात असल्यामुळे विश्वातील अनेक गोष्टींचे थेट फोटोच आपल्यापर्यंत येतायत. त्यातून बरंच काही शिकायला मिळतं.

पूर्वी अशी कल्पना होती की, आपली आकाशगंगा दीर्घिका (गॅलॅक्सी) म्हणजेच अवघं विश्व! परंतु थोडय़ाच काळात असं लक्षात आलं की आकाशगंगा (मिस्की वे) या दीर्घिकेसारख्या सर्पिलाकृती (स्पायरल) आणि काही लंबवर्तुळाकार तर आणखी काही विचित्र (इर्रेग्युलर) आकाराच्या दीर्घिकाही विश्वामध्ये आहेत आणि त्यांची संख्याही शेकडय़ात नव्हे, अब्धावधीच्या घरात आहे! विश्वाच्या विराटाकारात आपली विशाल वाटणारी दीर्घिका काहीच नव्हे. याचं आकलन आणि इतका विराट विश्वाचा आवाका जाणण्याची क्षमता ही मात्र मानवी मेंदूची ‘विश्वव्यापी’ कमाल आहे!

अमावास्येच्या निरभ्र रात्री, जिथे प्रकाश प्रदूषणही नसेल अशा भागातून आकाशात एक धूसर, परंतु तेजस्वी पट्टा, आकाशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसतो तीच आपली आकाशगंगा. या आकाशगंगेच्या ‘आत’ राहूनच आपण ती पाहू शकतो. आपल्या आकाशगंगेचा तेजस्वी भाग ‘धनु’ राशीच्या पार्श्वभूमीवर दिसतो. आपल्या आकाशगंगेचा आकार झांजेचा जोड एकमेकांवर ठेवल्यावर दिसेल तसा आहे. मधे फुगीर आणि दोन्ही बाजूला चपटा होत जाणारा. या दीर्घिकेत अब्जावधी तारे आहेत. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आपल्या सूर्याच्या 37 लाख पट वस्तुमानाचं कृष्णविवर आहे. सूर्यासह आपली ग्रहमाला या केंद्रकाभोवती 32 कोटी वर्षांत एक फेरी पूर्ण करते आणि फिरण्याचा वेग आहे सेकंदाला 250 किलोमीटर!

आपल्या दीर्घिकेचा व्यास 160,000 प्रकाशवर्षे असून तिची रुंदी सरासरी 600 प्रकाशवर्षे इतकी आहे. केंद्रकापासून आपली सूर्यमाला 26000 प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे. आकाशगंगेचा आकार ‘स्पायरल’ किंवा प्रिंगसारखा असून त्यातील दोन पट्टय़ांना जोडणाऱया ‘ओरायन ब्रीज’वर आपली सूर्यमाला बसली आहे. गॅलिलिओ गॅलिली यांनी अवकाशाकडे पहिल्यांदा दुर्बिण रोखली आणि अनेक गोष्टींची नोंद केली. त्यात मंगळ, गुरू, शनीसारख्या महत्त्वाच्या ग्रहांची नोंद तर होतीच, परंतु आपली ग्रहमालाच ज्या दीर्घिकेचा भाग आहे तेही त्यानी जाणलं. दुर्बिणीतून त्यांना चमचमणारे शेकडो तारे दिसले. नंतरच्या काळात युरेनस ग्रहाचा शोध लावणारे संशोधक विल्यम हर्शल यांनी द्वैती (बायनरी) ताऱयांची नोंद ठेवण्याबरोबरच आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाजवळ ताऱयांची गर्दी असल्याचंही म्हटलं. मात्र आपली सूर्यमाला या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असल्याचं त्याचं भाकीत नंतर संशोधनांती बदललं.

आपल्या या विशाल आकाशगंगेची माहिती आणि महती आता सांगण्याचं कारण म्हणजे गेल्याच महिन्यात या दीर्घिकेचा थ्री-डी नकाशा प्रसिद्ध झाला. त्यातून असं दिसलं की आकाशगंगेच्या लंबवर्तुळाच्या दूरस्थ कडा काहीशा वक्र, दुमडल्यासारख्या (sंaन्ज्) आहेत. दीर्घिकेच्या केंद्रकापासून जितकं दूर जावं तितकी ती ‘वक्रता’ अधिक दिसते. हा असा आकार तेथील प्रचंड ताऱयांच्या गाभ्यातील प्रचंड गतीमुळे निर्माण झाला असावा. थोडक्यात काय, तर ‘आपला’ आपल्यालाच रोज नव्याने शोध लागत आहे. त्यासाठी गेली शंभर वर्षे म्हणजे फारच थोडा काळ झाला. पुढच्या पाच-दहा हजार वर्षांत विश्वाचं आकलन उत्तम प्रकारे होईल. मात्र ते व्हायला हवं असेल तर प्रदूषणाने गांजलेल्या पृथ्वीचं आधी रक्षण करायला हवं. केवळ योगायोगाने इतकी उत्तम जीवनदायी सूर्यमाला आपल्याला लाभली आहे याचं भान यायला हवं. आता कुठे विश्वाचा सखोल शोध घेण्याची सुरुवात होतेय. एक यान सूर्याच्या अंतरंगाचा वेध घेतंय. एखादं धूमकेतूवर पोहचतंय. तिसरं अशनींचा मागोवा घेतंय असे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यापलीकडे आपल्या एका दीर्घिकेचा आणि त्याही पलीकडच्या विराट विश्वाचा आवाका पूर्णपणे लक्षात यायला प्रचंड काळ जावा लागेल. तरुण संशोधकांसमोर हे आव्हान आहे तसंच नामी संधीही आहे. विराटाचा ध्यास घेण्याची ऊर्मी मात्र हवी.