घारापुरीला मुक्कामी चला!

  • प्रशांत येरम

मुंबईचाच भाग असलेली घारापुरीची लेणी. आता येथे राहून येथील स्थानिक जीवनाचा आस्वादही पर्यटकांना घेता येणार आहे.

मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. त्याला एलिफंटा केव्हजही म्हणतात. पाषाणात खोदकाम करून बनवलेली ही लेणी इसवी सन ९व्या ते १३व्या शतकात निर्माण करण्यात आली. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.

मुंबईमध्ये आजही अनेक जण ही घारापुरीची लेणी पाहायला येतात. गेटवे ऑफ इंडियावरून सोमवारव्यतिरिक्त गेटवेहून सकाळी ९ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंतच इथे जाण्यासाठी लाँचेसची व्यवस्था आहे. या लेण्या पाहायच्या असतील तर तुम्हाला एक दिवस वेळ काढूनच जावं लागेल. दूर जात चाललेली मुंबई, तारापूरचे अणुभाभा केंद्र, मधूनच बोटीजवळ येणारे पांढरेशुभ्र सीगल्स अशा सगळ्या गोष्टी पाहत बोटीचा प्रवास संपवून आपण नितांत रमणीय अशा घारापुरी बेटावर येऊन पोहोचतो. लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अगदी वरपर्यंत पर्यटकांना आकर्षक करणारे कितीतरी स्टॉल्स आहेत. त्यात अगदी कानातले, बांगड्या, लहान मुलांची खेळणी, लाकडी आणि हस्तिदंत शोपीसेस असे बरेच काही पायऱ्यांच्या दुतर्फा पाहायला मिळते.

एलिफंटा लेणी म्हणजेच घारापुरीची लेणी घारापुरी या बेटावर डोंगरात आहेत. घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले.

घारापुरीत पोहोचल्यावर आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात. एक रस्ता गुंफांकडे तर दुसरा टेकडीवर जातो. गुंफांमध्ये प्रवेश शुल्क भरल्याशिवाय जाता येत नाही.

इथल्या लोकांचे मुख्य उपजीविकेचे साधन म्हणजे मासेमारी, शेती आणि नौकानयन. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एमटीडीसीने जरी सोय केलेली असली तरी इथल्या स्थानिक लोकांना कायमचा असा व्यवसाय मिळालेला नाही. पर्यटकांना इथल्या ‘ग्रामीण जीवना’चा आनंद घेता यावा यासाठी निवासाची ‘होम स्टे’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामीण पर्यटनामध्ये इथली कला संस्कृती, खाद्य संस्कृती, राहणीमान पर्यटकांना अगदी जवळून त्यामुळे इथल्या तरुणांनाही पाहता येणार आहे. शिवाय इथला रानमेवाही त्या-त्या दिवसांत पर्यटकांना चाखायला मिळणार आहे. ज्यायोगे मोठ्या प्रमाणावर उपजीविकेची सोय होणार आहे. अर्थात यासाठी इथल्या गावकऱ्यांनी एअर बीएनबी या परदेशी पर्यटन कंपनीच्या सहाय्याने इथेही ‘होम स्टे’ची सुविधा पुरविण्यात येणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर इथल्या तरुणांना रोजगारासाठी शहरात येण्याची गरज भासणार नाही. त्यांना त्यांच्याच घराजवळ राहून आपली कला पर्यटकांना दाखवता येईल.

गुंफांविषयी थोडेसे
पहिल्या मुख्य गुंफेच्या आत मध्यभागी महेश प्रतिमेची लेणी आहे. याची खोली ३.२ मीटर आणि रुंदी ६.५५ मीटर तर उंची ८.३ मीटर आहे. भिंतीच्या स्तंभामधील द्वारपालांच्या तीन भव्य मूर्ती सुस्थितीत नाहीत. याच्या डावीकडे अघोर रूप आहे. त्याच्या मुकुटात साप, विंचू आणि मेलेल्या माणसाचे डोके आहे. म्हणूनच या मूर्तीला ‘अघोर’ म्हणतात. उजवीकडील चेहरा कोमल आणि प्रसन्न आहे. केश अलंकार आणि हातात बांगड्या आणि कर्णकुंडलं आहेत. यालाच ‘वामदेव’ किंवा ‘उमा’ असं समजलं जातं. या महेश मूर्तीच्या एका बाजूला गंगाधर शिवाची मूर्ती असून दुसऱ्या बाजूला अर्धनारी नटेश्वराचे शिल्प आहे. मुख्य शिल्पापासून दुसऱ्या क्रमांकाची गुंफेमध्ये दगडात कोरलेली काही शिल्पे मिळतात. तिसऱ्या क्रमांकाच्या गुंफेच्या मध्यभागी भव्य शिवलिंग आहे. चौथ्या गुंफेत मध्यभागीही शिवलिंग आहे. पाचवी गुंफा मात्र खोल आहे. तिथे खालच्या बाजूला मोठा तलाव दिसतो. वर गेल्यावर दोन ब्रिटिशकालीन तोफा पाहायला मिळतात. इतकंच नाही, घारापुरीच्या पायथ्याशी असलेली राज बंदर, शेत बंदर आणि मोरा बंदरही दिसतात.