ग्लोबल वॉर्मिंग नव्हे ग्लोबल कूलिंग

पाण्यामुळे पृथ्वीचे तापमान प्रमाणात राहते.

>> श्रीनिवास औंधकर, [email protected]

आपल्याला असे दिसून येते आहे की, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी हिवाळा जास्तच गारठा घेऊन आलेला आहे. थंडी एवढी कडाक्याची जाणवते आहे की, रात्रीच्या वेळी आपण हिमालयात तर नाही ना आणि दिवसा आपण पुलू मनालीला तर नाही ना असे वाटू लागले आहे. जसा अवकाळी पाऊस पडतो तशी ही अवकाळी थंडी कशी काय आली, असा प्रश्न मानवापुढे निर्माण झाला आहे. परंतु हा सारा निसर्गाच्या नियमित चक्राचा भाग आहे आणि सारे जग एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरडत असले तरी जगभरचे अभ्यासक मात्र आपली वाटचाल ग्लोबल पूलिंगकडे सुरू असल्याचे सांगत आहेत.

या वर्षी हिवाळा थोडा उशिराने सुरू झाला आहे. कारण ऑगस्टमध्ये प्रशांत महासागरावरील तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असल्याने ‘अल निनो’ची परिस्थिती निर्माण झाली होती. मागील पावसाळ्याचा विचार केला असता फक्त पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागात समाधानकारक तर विदर्भ विभागात सरासरीच्या जवळ पावसाने हजेरी लावली होती. मात्र मराठवाडा विभागातील नांदेड व हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिह्यांत पावसाने दडी मारलेली दिसली. ‘अलनिनो’च्या या तडाख्यामुळे हिवाळा कमी जाणवणार असे संकेत मिळाले व त्याचा परिणाम म्हणून परतीच्या पावसाने तसेच दिवाळीदरम्यान पडणाऱया अवकाळी पावसाने यंदा हजेरी लावली नाही. अलनिनोचा प्रभाव वाढतच जात होता. परिणामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पहाटे, सायंकाळी व रात्री वातावरण थंडीचे होते, मात्र दिवसा सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचपर्यंत चटका देणारे तीव्र ऊन पहाता हे उन्हाळ्याचे दिवस असतील असे संकेत मिळत होते.

गेल्या काही वर्षांत हिवाळ्यात हिंदुस्थानमध्ये वाहणाऱया पश्चिमी विक्षोपीय वाऱयांची दिशा पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना ते सर्वसाधारणपणे कश्मीर, हरयाणा, पंजाब, राजस्थान या भागातून येतात. मात्र आता ते अधिक दक्षिणेकडून म्हणजेच कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्राकडून ते दाखल होत आहेत. पश्चिम किनारपट्टीकडून हे वारे लाटांच्या स्वरूपात दाखल होत असल्यामुळे आपल्याला कडाक्याच्या थंडीला वारंवार सामोरे जावे लागत आहे. परिणामी महाराष्ट्रामध्ये या वर्षी अनेक ठिकाणी थंडीने थैमान घातलेले आहे. महाबळेश्वर येथे तर किमान तापमानाची नोंद शून्य अंशावर नोंदवली गेली आहे. तसेच त्यावेळी तेथे दवबिंदूही गोठलेले पाहायला मिळाले आहेत. दुसरीकडे उत्तर हिंदुस्थानातही कश्मीरमध्ये लेह-लडाख भागामध्ये तापमानात मोठी घसरण झालेली आहे. या अवकाळी थंडीचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी साधने नसल्यामुळे गोरगरीबांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडत असतात. गेल्याच आठवडय़ात दिल्ली – नोएडा भागात जोरदार गारपीट झाल्याने दिल्लीला शिमल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

थंडी वाढण्याची मुख्य कारणे
पृथ्वीवरील जीवसृष्टीचे बरेचसे नियंत्रण सूर्याकडून होत असते. म्हणून आपण सूर्याला समजावून घेतले पाहिजे. सूर्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण केले तर त्यावर काळे डाग दिसतात. त्यांनाच सौर डाग म्हणून संबोधले जाते. या डागांच्या संख्येत सातत्याने बदल होत असतो.

प्रत्येक सौर साखळीच्या प्रारंभी सूर्यावरील सौर डागांची संख्या वाढत जाते आणि 5 ते 6 वर्षांनंतर सौर डागांची संख्या कमी होत जाते. जेव्हा सौर डागांची संख्या वाढत जाते तेव्हा सूर्यावर वर्षाला दोनशेपेक्षा अधिक सौर डाग असू शकतात आणि जेव्हा सौर डागांची संख्या कमी होत जाते तेव्हा ती शून्यापर्यंत कमी होते. सूर्यावरील सौर डागांची संख्या, आकारमान, सौर डाग टिकण्याचा कालावधी घटत जातो तसेच सूर्यावर सौर डाग नसल्याच्या दिवसांची संख्याही वाढत जाते.

सूर्यावरील सौर डागांची सध्या 24 वी साखळी सुरू आहे. ही 24 वी साखळी सन 2020च्या शेवटी पूर्ण होणे अपेक्षित होते. 2021 मध्ये पुढील 11 वर्षांसाठी 25 वी साखळी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सूर्यावरील ही साखळी कमी काळाची ठरेल अशी शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी 60 टक्के दिवस व यावर्षी आतापर्यंत 62 टक्के दिवस सूर्याच्या पृष्ठभागाचे fिनरीक्षण केले तर सौर डाग निर्माण झालेले नाहीत, असे दिसून येते. आतापर्यंत उपलब्ध माहितीचा इतिहास पाहता सन 1560 ते 1600 आणि 1790 ते 1830 या प्रत्येकी 40 वर्षांच्या कालावधीत सूर्यावर सौर डाग अत्यंत कमी होते आणि या दोन्ही 40 वर्षांच्या दोन टप्प्यात छोटय़ा कालावधीची हिमयुगे पृथ्वीवर अवतरली होती. आता सौरसाखळीची पुढील 40 वर्षांची वाटचाल सुरू झालेली आहे. ही वाटचाल पाहता आगामी छोटय़ा हिमयुगाची सुरुवात झालेली आहे.

गेले काही वर्षांपासून युरोप, अमेरिका, रशिया, सैबेरिया आणि चीनसारख्या उत्तर ध्रृवाजवळ असलेल्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात थंडी वाढत चालली आहे तसेच आस्टेलिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका या सारख्या देशांमध्ये गेल्या 20 वर्षांतील सर्वात निच्चांकी तापमान होते. एवढेच नव्हे तर सहारासारख्या वाळवंटी प्रदेशात बर्फवृष्टी होते आहे, अशी बर्फवृष्टी झाल्याची नोंद 30 वर्षांपूर्वीची आहे. उत्तर हिंदुस्थानातही मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी, गारपिटीच्या घटना घडताना दिसत आहेत. अमेरिकेच्या नायगारापासून श्रीनगरच्या दल सरोवरापर्यंत पाणी गोठवण्याची प्रक्रिया सगळीकडे घडलेली आहे. उत्तर ध्रृव ते चीनपर्यंतच्या प्रदेशात ही गोठावण्याची प्रक्रिया असेल. याचा अर्थ जगाची वाटचाल ग्लोबल वार्मिंगकडे नव्हे तर ग्लोबल पूलिंगकडे होत आहे. साधारणतः 2012 मध्येच या छोटय़ा हिमयुगाला प्रारंभ झालेला असून सौरसाखळीतील प्रतिवर्ष सौर डागांची घटत जाणारी संख्या पहाता आगामी छोटे हिमयुग 2032 ते 2042 सालापर्यंत असू शकते.

थंडीचा जागतिक परिणाम
उत्तरेकडे थंडीमुळे केवळ दिल्लीत 350 जणांना तर संपूर्ण देशात 1260हून अधिक जणांना प्राण गमवावे लागला आहे. हे प्रकार आपल्याकडेच घडतात असे नाही; यंदाच्या वर्षी चीन, जपान, युरोप, अमेरिका व कॅनडा येथेही अवकाळी थंडीच्या कडाक्यामुळे 750 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांतील थंडीचे रेका@ड मोडीत निघत आहेत. सोलार मिनिममच्या काळात वैश्विक किरणांचा पृथ्वीवरच्या वातावरणात होणारा शिरकाव वाढल्यामुळे पृथ्वीवरील वातावरण थंड होण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. सध्या सूर्यावरील सौर डाग कमी कमी होत चालले असल्यामुळे आता वारंवार शीतलहरी येऊ लागल्या आहेत.

युरोपमध्ये थंडीमुळे अशा प्रकारचे मृत्युतांडव घडून आले आहे. कडाक्याच्य थंडीमुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत तसेच रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. शेती क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे केवळ हवामानाच्या दृष्टीनेच नव्हे तर अर्थकारणाच्या अंगानेही याचा विचार व्हायला हवा. कारण येणाऱया काळात किमान 2032 ते 42 पर्यंत प्रत्येक हिवाळ्यात अशाच प्रकारचा थंडीचा कडाका जाणवत राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात पीक पध्दतीत बदल करून उत्तरेकडील भागातील शेतीच्या पीक पद्धती स्वीकाराव्या लागतील, असे वाटते.

रेल्वे वहातुकीवर लक्ष केंद्रित करावे
यासंदर्भात आणखी एक मुद्दा आवर्जून मांडावासा वाटतो. तो म्हणजे आपल्या देशातील अर्थकारणामध्ये रेल्वेचे महत्त्व मोठे आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीसाठीही रेल्वे सेवेचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असतो. मात्र तापमानातील घसरणीमुळे रेल्वेच्या रुळांना तडे जातात आणि त्यामुळे रेल्वे अपघात घडण्याची शक्यता असते. युरोपमध्येही असे प्रकार घडले आहेत. आपल्याकडेही मनमाड ते नांदेडदरम्यान गेल्या दोन महिन्यांत सहा-सात रेल्वे रुळांना तडे गेल्याचे दिसून आले आहे. 2011 मध्ये मी याचे भाकीत केले होते. तशा घटना आता घडताना दिसत आहेत. त्याचाही विचार होणे आणि त्यासंदर्भातील योग्य त्या उपाययोजना होणे आवश्यक आहे

जागतिक तापमानवाढ ही केवळ ओरड
गेल्या दोन दशकांपासून जागतिक तापमानवाढ याविषयी जागृती निर्माण करताना अनेक दाखले दिले जात होते. यात IPCC चे शास्त्र्ाज्ञ सन 2035 पर्यंत हिमालय वितळून जाणार असल्याचे भाकीत सांगताना दिसून येत होते, मात्र आता त्यांनी ही मर्यादा 2035 पासून वाढवून 2090 अशी केली आहे. मुळातच हिमालयातील अनेक बर्फाच्छादित पर्वतांच्या रांगांना याचा फटका बसलेलाच नाही. आपल्याकडे सर्वसाधारणपणे 7 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हंगाम सुरू राहतो. त्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात होते. मात्र कमाल आणि किमान तापमानातील सध्याची स्थिती पाहता यंदा उन्हाळा लवकर सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. अलीकडील काळात वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरांचे तापमान वाढत चालले असले तरी शहरांच्या बाहेर गेल्यानंतर मात्र कमाल तापमानामध्ये फारशी वाढ झालेली दिसून येत नाही. स्थानिक पातळीवर होणाऱया बदलांचा परिणाम हवामानावर होत असतो. त्याचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ जागतिक तापमान वाढत आहे, असा दावा करण्यात काहीच अर्थ नाही.

(लेखक एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आहेत)