माणसातील देवत्वापुढे नतमस्तक होणारा नास्तिक

>>डॉ. जीवन पिंपळवाडकर
[email protected]

मराठवाड्यातील प्रख्यात विचारवंत, प्रकांडपंडित गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचा आज ३६ वा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचे शिष्योत्तम व साहित्यिक, रंगकर्मी डॉ. जीवन पिंपळवाडकर यांचा कुरुंदकरांच्या थोरवीतील एक वैशिष्ट्यपूर्ण पैलूची ओळख करून देणारा हा लेख…

थोर समाजसेवक बाबा आमटेंनी गुरुवर्य नरहर कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर सद्गदित होऊन लिहिलेल्या ‘मुक्या अश्रूंचे अभिवादन’ या हृदयस्पर्शी कवितेत कुरुंदकरांची थोरवी सांगताना लिहिले आहे, ‘आपले नास्तिक्य गर्जून सांगितलेस, पण दोस्ता, तुझे आस्तिक असणे मला कळले होते.’ देवत्व ओळखण्याची एक खूण संत तुकोबारायांनी सांगितलेली आहे. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ तसेच विंदा करंदीकरांची एक कणिका आहे. ‘माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला, परदुःखाने रडला प्राणी, देव प्रकटला त्याच ठिकाणी.’ देवत्वाची ही लक्षणे ज्या माणसांमध्ये आढळतील अशांसमोर नतमस्तक होऊन स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी आपला आस्तिक्यभाव दाखवून दिला आहे. गोपाळ गणेश आगरकरांच्या थोरवीचे निराळेपण ‘देव न मानणारा देवमाणूस’ अशा शब्दांत सांगितले जाते. कुरुंदकरांचे नास्तिक्य याच प्रकारचे होते. माणसामधील देवत्वापुढे विनम्र होण्यामागील आस्तिक्य फार मोलाचे असते. स्वतःला नास्तिक म्हणविणारी ही माणसे थोर माणसांच्या विचारापुढे, जीवनकार्यापुढे आणि कर्तृत्वापुढे अशी विनम्र असतात की, जणू एखाद्या भक्ताने परमेश्वरासमोर लीन व्हावे. थोर माणसांचे अलौकिक, लोकोत्तर कार्य, जीवनशैली, तत्त्वांसाठी, निष्ठेपायी भौतिक सुखांचा त्याग करण्याचे विलक्षण धाडस यांमध्ये आढळणारे देवत्व कुरुंदकरांसारख्या नास्तिकांना नतमस्तक करते. माणसांत आढळणाऱ्या अलौकिक कर्तृत्वाने, जीवननिष्ठेने प्रभावित होण्यासाठी सहिष्णुता, मनाचा मोठेपणा व सुसंस्कृतपणा लागतो. माणसे कशी वाचावीत, त्यांना कसे समजून घ्यावे, नेमकेपणाने त्यांची थोरवी कशी ओळखावी, त्यांच्या मोठेपणाचा मागोवा कसा घ्यावा हे कुरुंदकरांचे खास वैशिष्ट्य होते.

‘व्यक्तिपूजा : एक चिकित्सा’ या लेखात कुरुंदकर म्हणतात, श्रद्धांची तपासणी करणे, समाजात दैवताचे स्थान प्राप्त झालेल्यांचा चिकित्सक अभ्यास करणे हे सोपे काम नाही. मनात आदर असणाऱ्या माणसांकडून परिपूर्णतेच्या अपेक्षा करण्याची तशी आवश्यकता नसते. ते ज्या क्षेत्रात आहेत तेथील त्यांचा मोठेपणा शोधण्याचा प्रयत्न व्हावा एवढीच आपली अपेक्षा आहे. सॉक्रेटीसवरील लेखात ते इतर कुणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटीसबरोबर नरकात राहणे आपल्याला चांगले वाटेल म्हणतात. यातून त्यांना जाणवलेला सॉक्रेटीसचा मोठेपणा स्पष्ट होतो. शिवरायांचे मोठेपण ही वाटचाल करण्यात आणि वाटचाल आपण यशस्वी करू शकतो, हा विश्वास चेतविण्यात असतो…. असे विचार एका लेखात मांडले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उज्ज्वल ध्येयवाद व कठोर वास्तववाद, भारतभूमीवरील त्यांचे असीम प्रेम व विज्ञानावर श्रद्धा ठेवणारे विसाव्या शतकातील त्यांचे बुद्धिवादी मन, त्यांची आत्मार्पणाची भूमिका असे पूर्ण सावरकर, सर्व भव्यता, उंचपणा व द्रष्टेपणा यांसह समजून घेतले पाहिजेत, तर ती प्रेरणा पुढील अनेक दशके आपले मार्गदर्शन करील, अशी अपेक्षा ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या लेखातून व्यक्त करतात.

‘आई’वर लिहिताना संकटाच्या वेळी तिचे धैर्य कसे उफाळून येई व ती कशी कर्तव्यकठोर बनत असे ते सांगतात. प्रतिकूल परिस्थितीत पत्नी प्रभावती कुरुंदकरांनी हिंमत देऊन कसे खंबीर केले हे सांगताना ‘गड्या धार फार तिखट आहे’, या हमीद दलवाईच्या अभिप्रायाचा उल्लेख ते करतात. मामा ना. गो. नांदापूरकर यांना अभिवादन करताना त्यांच्या चिकित्सक आणि श्रद्धाळू वृत्ती, सनातनीत्व आणि उदात्त, जिद्द, ताठरपणा, आक्रमकता आणि हळवेपणा, अत्यंत तुसडी भाषा, कुजकेपणा आणि गाढ वात्सल्य या परस्परविरोधी गुणांचे ते चमत्कारिक मिश्रण असल्याचे सांगतात. आपले विद्यागुरू भालचंद्र शंकर कहाळेकरांना ते ‘महाराज’ असे संबोधतात, पण लेखाला शीर्षक ते ‘माझे माक्र्सवादी गुरू’ असे देतात.

‘लोकांना विचार कसा करावा’ हे शिकवा. विचार कसा करावा हे जमले तर सत्यापर्यंतचा आपला प्रवास तेच करतात ही आपल्या गुरूंची बहुमोल शिकवणूक कुरुंदकर गुरुजींनी आपल्याही जीवननिष्ठेचा भाग कशी बनवली ते आम्ही अनुभवले आहे. अहिंसेचे उपासक असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांना ते ‘अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक’ म्हणून ते कसे निर्भयपणे सशस्त्र आंदोलनाचे दायित्व स्वीकारणारे आणि त्या लढ्याचे मार्गदर्शन करणारेही होते याबद्दल विवेचन करतात. मराठवाड्याचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांत घडणाऱ्या घडामोडी समजून घेण्यासाठी आणि या भागातील जनतेच्या ठणकवणाऱ्या सर्वच प्रश्नांना अनंत भालेरावांनी ‘मराठवाडा’ या नियतकालिकांच्या रूपाने व्यासपीठ निर्माण करून दिले, हे त्यांचे फार मोठे कर्तृत्व असल्याचे स्पष्ट करीत हैदराबाद आंदोलनातील त्यांच्या योगदानाबद्दल भरभरून लिहितात.
स्वतःला जडवादी म्हणवून घेणाऱ्या गुरुवर्य कुरुंदकरांजवळ असणारी परमतसहिष्णुता हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण थोरपणा होता. आपल्या मतांच्या प्रतिपादनातील आग्रहापेक्षा माणसातील माणूसपण त्यांना महत्त्वाचे वाटे. माणसांशी असणारे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते जपण्याला, त्याला समजून घेण्याला त्यांनी सदैव अग्रक्रम दिला. ते म्हणत, उगीच कुणाशी भांडत बसण्यात आपल्याला स्वारस्य नाही. स्वतःच्या नास्तिकतेचा अभिनिवेश आपण बाळगला नाही. आस्तिक्य असणाऱ्या आपल्या माणसांकरिता, त्याच्या आनंदासाठी, समाधानासाठी आपण देवळात जातो. देवाच्या पाया पडतो. धार्मिक समारंभांना उपस्थित राहतो. होता होई तो धार्मिक समारंभ करीत नाही, पण पत्नीने करा म्हटला तर तेही करतो.

महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, संस्कृतचे गाढे व्यासंगी व रसचर्चेवर अधिकारवाणीने बोलणारे एकनाथ महाराज खडकेकर तसेच संस्कृतचे अनेक अभ्यासक, आस्तिकतेने व श्रद्धेने जीवन जगणाऱ्या अनेक विद्वानांसमोर निष्ठेने नतमस्तक होताना गुरुवर्यांना मी पाहिलेले आहे. आपण होऊन आस्तिकांच्या, आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन कुरुंदकर गुरुजींनी त्यांच्या मुलावर, विश्वासवर व्रतबंध संस्कार केले. विशेष म्हणजे, या विधीच्या प्रसंगी पौरोहित्य करणारे गुरू जे मंत्र म्हणत होते त्यावेळी हा जडवादी, स्वतःला नास्तिक समजणारा बुद्धिवादी गृहस्थ विश्वासला त्या मंत्रांचे अर्थ समजावून सांगताना आम्ही पाहिला आहे. त्याकरिता आपल्याच माणसांकडून असहिष्णू वृत्तीने झालेली टीका सहन केली. टीका करणाऱ्यांना जे म्हणावयाचे होते ते गुरुवर्यांना माहीत नव्हते अगर त्यांचे मतपरिवर्तन झाले होते किंवा ते दांभिक होते, असा त्याचा सोयिस्कर व सोपा निष्कर्ष काढणे म्हणजे त्या ज्ञानसूर्याला काळवंडण्याचा दुर्दैवी प्रयत्न होता. याचे क्लेश त्यांना निश्चितच झाले असणार; पण केवळ ज्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम आहे, आदर आहे त्या आस्तिक्य बुद्धीच्या आप्तस्वकीयांसाठी, जन्म देणाऱ्या मातापित्यांच्या इच्छेसाठी अपेक्षित टीकेचे कालकूट पिण्याचे मोठे धाडस त्यांनी केले.