लेख : हनुमान जन्मोत्सव

10

>>ऍड. पुनीत चतुर्वेदी<<

19 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्म दिवस आहे. आपल्याकडे सर्वत्र हनुमान जयंती असा उल्लेख केला जातोहनुमान चिरंजीव असल्याने जयंती म्हणणे योग्य नाही. तर हनुमान जन्मोत्सव असा उल्लेख करणे गरजेचे आहे.

संपूर्ण हिंदुस्थानात हनुमानाचा जन्मदिवस जल्लोषात व मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. बहुतेक लोक या दिवसाचा उल्लेख हनुमान जयंती असा करतात. पण भाविकांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की, जयंती अशा व्यक्तींची केली जाते त्यांचे निधन झाले आहे. मात्र हनुमान तर चिरंजीव आहे. म्हणूनच त्यांच्या जन्म दिवसाचा जयंती असा उल्लेख करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हनुमान चिरंजीव आहेत याची माहिती फार कमी लोकांना माहिती आहे. पण हनुमान कसे चिरंजीव झाले हे त्याहूनही कमी लोकांना माहिती आहे. त्यासाठी रामायणाच्या किष्किंधा कांडमध्ये डोकावून पाहावे लागेल. हनुमान जेव्हा बालक स्वरूपात होते तेव्हा सूर्याला फळ समजून ते गिळंकृत करण्यासाठी आकाशात झेपावले. पण जर हनुमानाने सूर्याला गिंळकृत केले तर संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल, या जाणिवेने भयभीत होऊन देवांचा राजा इंद्राने हनुमानावर वज्रास्त्राने प्रहार केला. वज्रास्त्राच्या प्रहाराने हनुमानाच्या जबडय़ावर जखम झाली व काही क्षणासाठी हनुमान मूर्च्छित झाले.

इंद्राने वज्रास्त्र सोडल्याने हनुमानाचे पिता वायुदेव हे संतप्त झाले आणि पृथ्वीवरून विरक्त होण्याची घोषणा केली. पृथ्वीवरून वायू नाहीसा झाला तर पृथ्वीतलाचे संपूर्ण जीवनच संपुष्टात येईल, या विचाराने विचलित होऊन इंद्रदेव हे वायुदेवाची समजूत काढण्यासाठी  प्रकट झाले आणि हनुमानाला झालेल्या जबडय़ाच्या जखमेवरून त्यांनी हनु(जबडा) व मान(विलक्षण) असे नाव दिले आणि असे वरदान दिले की, माझ्या वज्राच्या प्रहाराने ज्याचा अंत होऊ शकला नाही त्याला कोणतेही अस्त्र-शस्त्र मारू शकणार नाही. या वेळी वायुदेवाचा क्रोध शांत करण्यासाठी स्वतः ब्रह्मा-विष्णू-महेश प्रकट झाले व ब्रह्माचे ब्रह्मास्त्र, विष्णूचे सूदर्शनचक्र व शिवाचे त्रिशूळ या अस्त्रांचाही हनुमानावर कोणताही परिणाम होणार नाही असे वरदान दिले. अशाच प्रकारे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये देखील भगवान श्रीराम यांनी स्वतः हनुमानाला चिरंजीव होण्याचे वरदान दिल्याचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे या कथांचा आधार घेतला तर ही गोष्ट स्पष्ट आहे की, हनुमान हे चिरंजीव आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्म दिवसाला जयंती असे संबोधणे म्हणजे शास्त्राला खोटय़ात पाडण्यासारखे आहे. तेव्हा हनुमानाच्या जन्मदिवसाला हनुमान जन्मोत्सव म्हणणे अधिक योग्य होईल.

(लेखक हे मुंबई हायकोर्टात ऍडव्होकेट आणि

धर्मशास्त्राचे प्रवचनकार आहेत.)