बुद्धिदेवता हयग्रीव

>>प्रतीक राजूरकर

पृथ्वीला अनाचारापासून वाचवण्याचे महत्कार्य हयग्रीव या देवतेने केले असे आपली परंपरा सांगते. ज्ञानाचे रक्षण करणारी बुद्धिदेवता म्हणून हयग्रीव उपासना केली जाते. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीने या देवतेची उपासना होते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या या उपासनेनिमित्त हयग्रीव या अश्वमुखी देवतेसंबंधित कथा आणि परंपरा जाणून घेऊया.

ज्ञानानन्द मयं देवं निर्मल स्फटिकाकृतिं
आधारं सर्वविद्यानं हयग्रीवं उपास्महे

हय म्हणजे अश्व आणि ग्रीव म्हणजे मान असलेले हयग्रीव हे बुद्धीrची देवता संबोधली गेलेली आहे. त्यांच्या मांडीवर लक्ष्मी विराजित असून चार हातात शंख, चक्र, पद्म आणि पुस्तके आहेत. स्फटिकरूप असलेल्या हयग्रीव यांचा श्वेत रंग आहे. दक्षिण हिंदुस्थानात अत्यंत लोकप्रिय असे हे दैवत आहे. काही हिंदू कथांनुसार ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी हयग्रीव यांना आपला गुरू मानले आहे. अश्वमुख असलेले हयग्रीव यांचे शरीर हे मानवाचे आहे.

हयग्रीव उपासना ही प्रामुख्याने ज्ञानार्जन करण्यापूर्वी विशेषकरून विद्यार्थ्यांकरिता केली जाते. अक्षय्य तृतीया आणि श्रावण पौर्णिमेला हयग्रीव जयंती साजरी होते. दक्षिण हिंदुस्थानात श्रावण पौर्णिमेला तर उत्तर हिंदुस्थानात अक्षय्य तृतीयेला जयंती साजरी होते. एकाहून अधिक वेळा हयग्रीव अवतरल्यामुळे हा फरक असावा किंवा बुद्धीची देवता असल्याने बुद्धिमत्ता अक्षय्य असावी म्हणून अक्षय्य तृतीया तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र असल्याने आणि हिंदू संस्कृतीमध्ये चंद्राला मनाचे कारकतत्व संबोधण्यात आले आहे. त्याकारणास्तव हा दोन वेगवेगळय़ा जयंती मानल्या जात असाव्यात असा तर्क निघू शकतो. काही ठिकाणी नवरात्रीत नवव्या दिवशी विशेष उपासना करण्याची परंपरासुद्धा आहे. प्रसिद्ध ‘ललितासहस्रनाम’ हे हयग्रीव यांनी सांगितल्याचे वर्णन आहे. हयग्रीव हे हयशीर्ष म्हणूनसुद्धा संबोधले जातात.

महाभारत, भागवत पुराण, मत्स्य पुराण, देवी भागवत, ब्रह्मांड पुराण आणि गरुड पुराणात हयग्रीवबाबत विस्तृत माहिती आहे. त्यामध्ये विविध कथांचा उल्लेख आढळतो. श्रीविष्णू हे हयग्रीव रूपात अनेक प्रसंगी अवतरल्याचे विविध पुराण कथातून स्पष्ट होते. सर्व कथांमध्ये हयग्रीव हे श्रीविष्णू अवतार म्हणूनच वर्णिले आहेत. दक्षिण हिंदुस्थानात संत वादिराजस्वामी, राघवेंद्र स्वामींसारख्या संतांचे हयग्रीव हे आराध्यदैवत आहे. संत वादिराज पंढरपूरला असताना साक्षात हयग्रीवांनी त्यांना दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. राघवेंद्र स्वामींचे आराध्यदैवत पंचमुखी हनुमानातील एक मुख हे हयग्रीवांचे आहे. द्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार करणाऱया अनेक संतांनी हयग्रीवबाबत अनेक श्लोक आणि मंत्र सिद्ध केले आहेत. त्यामध्ये ‘लक्ष्मी हयग्रीव सहस्रनाम’, ‘हयग्रीव संपदा स्तोत्र’ इत्यादींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अथर्ववेदातील हयग्रीव उपनिषद आहे त्यात ब्रह्मदेवाने नारदाला धर्म उपदेश केलेला आहे. दोन भागांत विभागलेले ‘हयग्रीव उपनिषद’ हे 108 उपनिषदांपैकी एक असून दक्षिण हिंदुस्थानात लोकप्रिय आहे.

दक्षिण हिंदुस्थानात हयग्रीव नावाचा गोड पदार्थ असून तो अत्यंत लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात पुरणाचे आणि दक्षिण हिंदुस्थानात हयग्रीव पदार्थाचे समान महत्त्व आहे. एकदा ब्रह्मदेवास ग्लानी आली आणि ती संधी बघून मधू आणि कैटभ नावाचे दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या जवळचे वेद चोरले आणि रसातळाला घेऊन गेले. वेद वापस कसे आणायचे या विवंचनेत ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे स्मरण केले आणि श्रीविष्णू यांनी हयग्रीव अवतार घेऊन रसातळातून मधू आणि कैटभला ठार मारले (म्हणूनच श्रीविष्णूला मधुसूदन असेही संबोधले जाते) आणि वेद वापस ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. वेद हे ज्ञानाचे प्रतीक असल्याने हयग्रीव हे ज्ञानाची, बुद्धीची देवता म्हणून संबोधली गेली आहे. अश्वरूपात श्रीविष्णू अवतार हा अश्वातील वेग, प्रामाणिकता, एकाग्रता या गुणधर्मामुळे असल्याचा तर्क निघतो, जे ज्ञानार्जन करण्यास आवश्यक आहेत.

उत्तर हिंदुस्थानात ‘हयग्रीव कथा’ जी प्रचलित आहे ती या प्रकारे आहे. त्याचा संदर्भ अज्ञात आहे. एकदा पृथ्वीवर लक्ष्मीदेवींची भ्रमण करण्याची इच्छा झाली म्हणून त्या पृथ्वीवर आल्या. तिथे काही ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येत लक्ष्मीच्या भ्रमणामुळे विघ्न आले म्हणून त्यांनी लक्ष्मीला श्राप देऊन घोडीरूपात परिवर्तित केले. तिकडे श्रीविष्णू लक्ष्मी न आल्याने त्यांचा शोध घेण्यास पृथ्वीवर प्रकटले व त्यांना खरी परिस्थिती समजली. त्यावर ऋषींना त्यांनी लक्ष्मीला शाप देण्यात आल्याचे अवगत केले. त्यावर ऋषींनी साक्षात लक्ष्मीमातेस अनावधाने शाप दिल्याचे सांगून क्षमा मागितली आणि श्रीविष्णूंना अश्वरूप घेण्यास विनंती केली. श्रीविष्णूंनी अश्वरूप घेतल्यावर लक्ष्मी आपल्या पूर्व रूपात प्रकटल्या तेव्हा ऋषींनी वरदान दिले की, जेव्हा नवरदेव हा आपल्या लक्ष्मीस आणण्यासाठी जाईल तेव्हा आणि पराक्रम करण्यास जाईल तेव्हा अश्वाचा वापर हा शुभ असेल. अर्थात ही कथा कदाचित परंपरागत पद्धतीने प्रचलित झाली असावी, कारण विवाहासंदर्भात अश्वाच्या वापराची कथा पुराणात सूर्य संबंधित पण वर्णिलेली आढळते.
तिबेटी परंपरेत हयग्रीव हे रोग बरे करणारे देव असल्याची मान्यता आहे. चीन, जपान आणि काही बौद्ध राष्ट्रांत हयग्रीव यांना ईश्वरीशक्ती म्हणून मान्यता आहे.

[email protected]