वारसा तस्करीशी एकहाती लढा


>>डॉ. कुमुद कानिटकर

युनेस्कोतर्फे १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिन साजरा होतो. त्यामागचा हेतू उदात्त असला तरी ‘वारसा तस्करी’च्या माध्यमातून देशोदेशीच्या ‘वारशा’ची लूट केली जात आहे. हिंदुस्थानही त्याला अपवाद नाही. मात्र या वारसा तस्करीविरुद्ध एक शिलेदार वर्षानुवर्षे एका व्रतस्थपणे लढा देत आहे आणि हिंदुस्थानी सांस्कृतिक वारशाची तस्करी थांबविण्याचा, वारसा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘वारसा’ हा शब्द जसा आपल्याला परिचित आहे तसा ‘तस्करी’ हा शब्ददेखील, पण जर कुणी ‘वारसा तस्करी’ असे म्हटले तर ‘हा काय बुवा नवीन प्रकार’ अशी आपली पहिली प्रतिक्रिया असेल. अर्थात हा प्रकार इतर तस्करींएवढाच भयंकर आहे. किंबहुना, देशाच्या सांस्कृतिक वैभवावरच घाला घालणारा आहे. त्यामुळे ‘वारसा तस्करी’शी लढा देणे, आपल्या सांस्कृतिक वैभवाचे, वारशाचे जतन आणि संवर्धन करणे हेदेखील एक ऐतिहासिक कार्य ठरते. फक्त त्याचा फारसा बोलबाला होत नसल्याने हे कार्य आणि ते करणारी व्यक्ती पडद्याआडच राहतात. प्रा. डॉ. किरिट मंकोडी हे नाव त्यापैकीच एक.

खरे म्हणजे डॉ. किरिट मंकोडी हे नाव जगप्रसिद्ध आहे ते प्राचीन इतिहास, कला व स्थापत्य, मूर्ती विज्ञान अशा अनेक शाखांमधील संशोधक म्हणून. पाटण येथील ‘राणी की वाव’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सात मजली, अप्रतिम शिल्पांनी अलंकृत विहिरींवरील त्यांचा ग्रंथ सर्वत्र प्रमाण मानला जातो. मात्र त्यांची खरी ओळख आहे ती वारसा तस्करीविरोधात लढा देणारा, ती लढाई यशस्वी करून हिंदुस्थानी सांस्कृतिक वैभवाचे संरक्षण करणारा एकांडा शिलेदार अशी. हिंदुस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी हिंदुस्थानातील कलावस्तू (art objects) निर्यात होत असत, पण स्वातंत्र्योत्तर काळात संसदेने कायदा करून पुरातन कलावस्तू निर्यात करण्यावर बंदी घातली.

त्यांची अवैध वाहतूक हा गुन्हा ठरला. मात्र हिंदुस्थानात पुरातन शिल्पांची तस्करी गांभीर्याने घेतली जात नाही. याच तस्करीविरुद्ध डॉ. मंकोडी यांचा लढा सुरू आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये तस्करी मार्गाने पोहोचलेली अब्जावधी रुपयांची शिल्पे आजपर्यंत त्यांनी सन्मानाने मायदेशी परत आणली हे याच लढय़ाचे यश आहे. त्यापैकी यक्षिणीच्या मूर्तीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तब्बल साडेसहा फूट उंचीच्या या शिल्पकृतीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक अब्ज रुपये होती. हिंदुस्थानी शिल्पकलेची सुरुवात मानल्या जाणाऱ्या भारहूत या ठिकाणची ही मूर्ती मिळवताना डॉ. मंकोडी यांना हिंदुस्थानातील प्रशासनापेक्षाही अमेरिकेतील गृहखात्याने जास्त मदत केली हे विशेष.

डॉक्टरांनी परत मिळविलेल्या ऐतिहासिक मौल्यवान वस्तूंमध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिल्पकृती व मूर्तींचा समावेश आहे. राजस्थानातील घटेश्वर मंदिरातील मंडपात कोरलेल्या छताकर आम्रवृक्षाखाली उभ्या असलेल्या महिलेची ११व्या शतकातील शिल्पकृतीही अचानक गायब झाली. डेनेव्हरच्या संग्रहालयातून डॉ. मंकोडी यांनी ती कायदेशीररीत्या परत मिळवली. राजस्थानातील एका मंदिराच्या पट्टिकेवरील २००९मध्ये गायब झालेली शिल्पे त्यांना २०१०मध्ये एका आंतरराष्ट्रीय मासिकात काही कोटी अमेरिकन डॉलर्सना विक्रीसाठी उपलब्ध असल्याची त्यांना आढळली. अमेरिकन प्रशासनाच्या सहकार्याने या शिल्पकृती आता परत येण्याच्या मार्गावर आहेत. गुजरातमधील पाटणमधून २००१मध्ये चोरीला गेलेले शिल्प त्यांना लंडनमधील एका वेबसाइटवर दिसले. पाठपुरावा करून हे शिल्प परत आणण्यात त्यांना यश आले. मंकोडी यांच्या प्रयत्नांनी राजस्थानमधील २००९ मध्ये चोरीला गेलेली युगुल शिल्पे २०१४मध्ये अमेरिकन होमलॅण्ड सिक्युरिटीने हिंदुस्थानच्या हवाली केली.

पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत साडेतीन हजारांहून अधिक वस्तू आणि वास्तू आहेत, त्याखेरीज प्रत्येक राज्याच्या अखत्यारीत आणखी वास्तू असतात. कुठेच नोंद नसलेल्या प्राचीन वास्तूदेखील अनेक आहेत. हा सर्व आपल्याला मिळालेला अमूल्य वारसा आहे. हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकाने हा समृद्ध वारसा जतन करण्यात हातभार लावावा असे आवाहन डॉ. मंकोडी करतात. मात्र तरीही त्यांना या तस्करीविरुद्ध एकाकी लढा द्यावा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल. अर्थात त्यांचा हा एकहाती लढा यशस्वी ठरत आहे हे शेवटी महत्त्वाचे.

तस्करी झालेल्या हिंदुस्थानी शिल्पकृती, मूर्तींची आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती व्हावी याकरिता डॉ. मंकोडी यांनी डेटाबेस तयार केला आहे. त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत छायाचित्रांसह संपूर्ण महिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. जगभरात कोणालाही हिंदुस्थानातील शिल्पकृती चोरल्याची माहिती मिळाल्यास ती तपासून पाहण्यासाठी ही वेबसाइट मार्गदर्शक ठरते. विशेष म्हणजे यामुळे काही आंतरराष्ट्रीय दलालांनीही संपर्क साधून त्यांच्याकडील हिंदुस्थानी मूर्तींची माहिती दिली आहे.

(लेखिका पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)