रंगात रंगतो…

>> दिलीप जोशी
[email protected]

हिंदुस्थानी कॅलेंडरनुसार येणाऱ्या रंग पंचमीची तिथी आज आहे. पूर्वी होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी फाल्गुन वद्य पंचमी, रंगपंचमी म्हणून साजरी व्हायची. आता होळीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी (धुलिवंदनाच्या दिवशी) ‘रंगपंचमी’ साजरी केली जाते हा बदलत्या काळातील सोयीचा भाग झाला.

हिंदुस्थानी पंचागात अनेक पंचम्यांना विशेष महत्त्व आहे. वसंत पंचमी, ललिता पंचमी, ऋषी पंचमी, नागपंचमी तशीच रंगपंचमी. एकेकाळी कृषिप्रधान संस्कृतीच्या जीवनशैलीशी निगडित असलेले हे सारे सणवार. शेती हाच ज्याकाळी मुख्य व्यवसाय होता त्याकाळी भरपूर काम झाले की सण-उत्सव साजरे करण्याचा निवांतपणाही होता. निसर्गाशी जवळचं नातं सांगणारे सण जनजीवनात हर्षोल्हास निर्माण करायचे. सणाच्या निमित्ताने विशिष्ट पदार्थ, वेषभूषा, गाणी, चित्रकला, हस्तकला, रांगोळी अशा किती किती गोष्टींनी आनंदाला बहर यायचा. कवि-लेखकांपासून कारागीरांपर्यंत सर्वांच्या प्रतिभेला नाव मिळायचं. सर्व सणांची राज्ञी अर्थातच दिवाळी. तो उत्सव प्रकाशाचा. तसाच रंगांची मुक्त उधळण करणारा उत्सव म्हणजे रंगपंचमी. यामध्ये गावातल्या सगळ्य़ा मंडळीचा सहभाग असायचा. उत्तर हिंदुस्थानात रंगपंचमीचं विशेष कौतुक. प्राचीनकाळी वनस्पतीजन्य असलेले विविध प्रकारचे रंग बनवले जायचे. गुलाल, हळद किंवा फुलांचा रस यापासून तयार केलेले हे रंग परस्परांवर उडवताना कोणताही धोका नसायचा. लहान-मोठी सारी गावकरी मंडळी एकदिलाने वय विसरून या रंगोत्सवात रंगून निघायची. घरून निघतानाच चेहरा दुपारी आरशात बघितला तर स्वतःलाच ओळखू येणार नाही, इतका बदललेला असायचा.

परस्परांची चेष्टा-थट्टा करत सारा दिवस रंगसंगतीने घालवण्याची कल्पना ज्या कुणा पहिल्यांदा स्फुरली तो धन्य! श्रीकृष्णाच्या कथानकापासून रंगपंचमीच्या सणाचं महत्त्व अधिक प्रत्ययकारी झाल्याचं दिसतं. रंगसोहळा म्हणजे गोकुळातला कान्हा आणि गोपी अनिवार्यच. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ यातला खटय़ाळ भाव आजपर्यंत टिकलेला. ‘होळी खेळत नंदलाल ब्रजमे’ म्हणत सारा परिसर ताल धरत रंगाची उधळण करायचा.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. रंगपंचमीच्या सणाला योगायोगाने राजस्थानात होतो. जयपूर-उदयपूरच्या संस्थानी भागातही उत्साहाने रंगलेली रंगपंचमी पाहायला मिळाली. त्यावेळी सोबतचा वृद्ध गाइड सांगत होता. ‘पूर्वी राजस्थानातले राजे-महाराजे फार मोठय़ा प्रमाणावर हा सण साजरा करायचे. राजाने तर उंच जागी अनेक रंगांसाठी टाक्या आणि मोठ्य़ा दगडी पन्हळी बांधून बाहेरच्या बाजूला असलेल्या सखल भागात विविध रंगांचे ‘धबधबे पडतील अशी व्यवस्था खास रंगपंचमीसाठी केली होती. या पन्हाळीना बसवलेली कलात्मक फिरक्यांची दगडी झाकणं दूर केली की रंगाच्या धारा कोसळायच्या आणि हजारो लोक त्या रंगवर्षेत न्हाऊन निघायचे. माझा मित्र विश्वास भट याला एकदा त्या जागी जाण्याची संधी मिळाली होती.

केवळ रंग उडवण्यासाठीचा ‘महाल’ बांधणं ही कल्पनाच रोमांचक. आम्हाला ठाऊक आहे ती राज कपूरच्या आर. के. स्टुडिओतली अनेक सिनेकलाकारांची रंगाच्या खास हौदात बुड्य़ा मारणारी रंगपंचमी. ती मात्र धुळवडीच्याच दिवशी व्हायची. म्हणजे होळीच्या दुसऱया दिवशी. गेल्या २ फेब्रुवारीला झाली तशी. मुंबईसारख्या शहरात औद्योगिक क्रांतीने एक वेगळंच वातारण निर्माण केलं. गिरण्या आणि कारखाने यांची आधुनिक संस्कृती आली. कृषी संस्कृतीत सूर्योदयाबरोबर सुरू होणारी कामं सूर्यास्ताला संपायची. नव्या औद्योगिक संस्कृतीने घड्य़ाळाच्या काट्य़ावर कामाच्या तीन ‘पाळ्य़ा’ बसवल्या. सुट्टी आणि निवांतपणाचा काळ संकोचला. पण आनंद तर साजरा करायचाच. यातून मग धुळवडीलाच रंग उडवण्याची प्रथा सुरू झाली ती आजतागायत तशीच आहे.

या विविधरंगी प्रथेचा बेरंग करणाऱ्या काही घटना घडतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. चेहेऱ्याला घातक ठरणारे, सहज धुतले न जाणारे घातक रंग वापरणं हा या रंगोत्सवाचा अपमानच आहे. आता नव्या पिढीत त्याबाबतची जागृती होताना दिसतेय. गुलबक्षीच्या फुलांसारख्या रंगीत फुलांचे रंग मुलंही बनवायला शिकतायत ही चांगली गोष्ट. जीवनात रंग तर हवेतच. समूहाने त्याचा आनंद सोहळा करावा हेसुद्धा छान. पण सणातला मुक्तपणा म्हणजे बेबंदशाही नव्हे आणि कोणाला रंगवणं म्हणजे विद्रूप करणं नव्हे. एरवी रंगांच्या या सणासाठी आजकाल परदेशी पाहुणेही हिंदुस्थानात येतात. आपल्या परंपरेचे प्रामाणिक रंग त्यांना दिसले तर ते उद्याच्या जगाला अधिक भुलवतील खुलवतील.

आपली प्रतिक्रिया द्या